पौष्टिक भरडधान्य कमी पक्वता कालावधी असणारी पिके, हलक्या जमिनीत उत्तम वाढ होते. वाढीच्या काळात कमीत कमी निविष्ठा वापरून वाढ पूर्ण करतात. सुधारित तंत्रज्ञानानुसार लागवड केल्यास उत्तम प्रतिसाद देणारी व अधिक उत्पादन देणारी पिके आहेत.
बदलत्या हवामानात तग धरणारी पिके व तसेच आकस्मिक शेतीकरिता नियोजन केले जाऊ शकते. उत्तम प्रकारचे पौष्टिक गुणधर्म असल्याने आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर व भविष्यात मागणी वाढणारी पिके आहेत. या पिकांपासून उत्तम प्रतीचे धान्य व जनावरांसाठी सकस चारा मिळतो.
वरई पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान
जमीन व हवामान: या पिकाच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन उत्तम आहे. या पिकाची लागवड प्रामुख्याने महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत रांगेतील अतिपावसाच्या उप-पर्वतीय विभाग, पश्चिम घाट विभाग आणि कोकण विभागातील डोंगर उताराच्या जमिनीवर केली जाते.
पूर्वमशागत: जमिनीची खोल नांगरट करुन उभ्या आडव्या कुळवाच्या दोन पाळ्या देऊन ४ ते ५ टन शेणखत/कंपोस्ट खत याचवेळी शेतात मिसळून जमीन भुसभुशीत करावी. पूर्वी घेतलेल्या पिकाचे धसकटे, काडीकचरा व बहुवार्षिक गवताचे अवशेष वेचून शेत स्वच्छ करावे.
सुधारित वाण
फुले एकादशी
हे वाण १२० ते १३० दिवसांमध्ये परिपक्व होते. याची उत्पादकाता हेक्टरी ११ ते १२ क्विंटल असते. हे उशीरा पक्व होणारे व उंच वाढणारे वाण आहे.
कोकण सात्विक
हे वाण ११५ ते १२० दिवसांमध्ये परिपक्व होते. याची उत्पादकाता हेक्टरी १८ ते २० क्विंटल असते. हे मध्यम पक्वता व अधिक उत्पादकता देणारे पिक आहे.
बियाणे व पेरणीची पद्धत पेरणीची/लावणीची वेळ
- या पिकाचा खरीप हा प्रमुख हंगाम आहे. बियाणे पेरणी पावसाचे आगमन होताच अथवा पाण्याची सुविधा असल्यास जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात करावी.
- पिकाची लागवड मुख्यत्वे रोप लागण पद्धतीने केली जाते. रोप लागण पद्धतीने लागवड करायची असल्यास ४ ते ५ किलो बियाणे/हेक्टरी वापरावे.
- रोपवाटिका करताना गादीवाफे तयार करून त्यावर बियाणे ओळीमध्ये पेरून घ्यावे. बियाणे १.०० ते १.५ से. मी. पेक्षा जास्त खोल जाणार नाहीत याची काळजी घ्यावी म्हणजे उगवण चांगली होते.
बीज प्रक्रिया
बियाणे पेरणीपूर्वी अझोस्पिरिलम आणि अस्पर्जीलस अवामोरी या जिवाणू संवर्धकाची प्रति किलो बियाण्यास २५ गॅम प्रमाणे करावी.
रोप लावणी पद्धत
गादी वाफ्यावर रोपे २० ते २५ दिवसांची झाल्यानंतर शेतामध्ये रोपांची पुनर्लागण करावी. रोपलागण करताना दोन ओळीमधील अंतर ३०.० से.मी. (एक फूट) व दोन रोपामंधील अंतर १०.० से.मी. ठेवावे.
खत व्यवस्थापन
- पेरणीपूर्वी एक महिना अगोदर शेणखत अथवा कंपोष्ट खत ५ ते १० टन प्रति हेक्टर या प्रमाणे जमिनीत मिसळून द्यावे.
- या पिकासाठी रासायनिक खताची मात्रा ४० किलो नत्र, २० किलो स्फूरद आणि २० किलो पालाश प्रति हेक्टर याप्रमाणे द्यावे.
- अर्धे नत्र व संपूर्ण पालाश व संपूर्ण स्फुरद मात्रा पेरणी करताना द्यावी व उरलेले अर्धे नत्र पेरणी नंतर एक महिन्याने द्यावे.
आंतरमशागत
पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळात पिकाची वाढ संथ गतीने होत असल्याने तणे पिकाशी स्पर्धा करतात त्यामुळे तण नियंत्रणासाठी एक कोळपणी करुन गरजेनुसार एक महिन्याच्या आत एक खुरपणी करावी.
आंतरपिके शिफारस
पिकाचे अधिक धान्य उत्पादन आणि निव्वळ नफा मिळविण्यासाठी उप-पर्वतीय विभागात वरी/वरई पिकामध्ये कारळा ४:१ या प्रमाणात आंतरपीक घेण्याची शिफारस करण्यात आली आहे.
अधिक वाचा: Harbhara Bhaji : हरभऱ्याची भाजी आरोग्यासाठी फायदेशीर ठेवते अनेक आजारांपासून दूर वाचा सविस्तर