महाराष्ट्रातील काही भागात वाटाणा हे पीक खरीप हंगामात जुलैमध्ये लागवड केली जाते परंतु हे पीक थंड हवामानात येणारे असल्यामुळे महाराष्ट्रात याची लागवड ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत लागवड करणे फायद्याचे ठरते.
लागवडीसाठी जाती
१) बोनव्हिला
या जातीच्या शेंगा आकर्षक गर्द हिरव्या रंगाच्या असून शेंगातील दाणे अत्यंत गोड असतात. झाडांची उंची मध्यम असून ४५ दिवसांनी शेंगा काढणीस येतात.
२) अरकेल
या जातीच्या शेंगा आकर्षक गर्द हिरव्या रंगाच्या असून साधारणपणे ६ ते ७ सेंमी लांबीच्या असतात. झाडांची उंची जवळपास ४० सेंमी असून शेंगा लागवडीनंतर ५० ते ५५ दिवसांनी काढणीस तयार होतात.
३) मिटीओर
या जातीच्या शेंगा गर्द हिरव्या रंगाच्या असून सर्वसाधारणपणे ७ ते ८ सेंमी लांबीच्या असतात. झाडांची उंची जवळपास ४० सेंमी असून शेंगा लागवडीनंतर ५० ते ६० दिवसांनी काढणीस तयार होतात.
४) जवाहर-१
या जातीच्या शेंगा फिकट हिरव्या रंगाच्या असून सर्वसाधारणपणे ६ सेंमीपर्यंत लांब असतात. लागवडीपासून ५५ दिवसांत फुलावर येते व ९० दिवसांत शेंगा काढणीस सुरुवात होते. याशिवाय अर्ली ब्यागर, परफेक्शन न्यू लाईन, असौजी, जवाहर-४, व्ही.एल. ३, बी. एच. १, के.एल. १३६, बुंदेलखंड आणि वाई इत्यादी जाती प्रसिद्ध आहेत.
बियाणे व बीजप्रक्रिया
- पेरणीसाठी पाभरीने पेरल्यास हेक्टरी ६० ते ७० किलो बियाणे लागते.
- पण जर टोकण पद्धतीने लागवड केली तर हेक्टरी २०-३० किलो बियाणे लागते.
- पेरणीपूर्वी बियाण्यास कार्बेन्डॅझीम ३ ते ४ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम किवा कॅप्टन ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बिजप्रक्रिया करावी.
- त्यामुळे अनेक प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.
- त्याचप्रमाणे रायझोबियम कल्चर चोळल्यामुळे उत्पादनात हमखास १० -२०% पर्यंत वाढ झालेली दिसून आलेली आहे.
अधिक वाचा: PM Kisan Yojana : शेतकऱ्यांनो पीएम किसान योजनेत आले नवीन नियम वाचा सविस्तर