सध्या भात कापणीची कामे वेगाने सुरू आहेत. मात्र या काळात शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे. भात कापणी करताना वारंवार विंचूदंश झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
या वर्षी परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लांबलेल्या पावसामुळे भातकापणीला उशिरा सुरुवात झाली आहे.
कधीही पाऊस कोसळत असल्यामुळे घाईघाईनेच भातकापणी केली जात आहे; परंतु भातकापणी करताना अनेकदा बेसावध असल्यामुळे विंचूदंशाचे प्रकार वाढले आहेत.
सापांबरोबरच विंचूचा दंशही घातक समजला जातो. मुळात आपल्याकडे काळा आणि लाल हे दोन प्रकारचे विंचू आढळून येतात. काळ्या विंचूचा दंश झाला तर असह्य वेदना होतात. मात्र, त्याने मृत्यू ओढवत नाही.
उपचाराअंती या वेदना शमतात. मात्र, लाल विंचवाचा दंश जीवघेणा ठरू शकतो. या विंचूला घातक समजले जाते. लाल विंचूचा दंश विषारी असतो. वेळेत वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे असते.
विंचू दंश झाल्यास आढळणारी लक्षणे
• दंशाच्या जागेवर असह्य वेदना होतात.
• त्या जागेपासून वेदना वर चढत जाते.
• दंशाच्या ठिकाणी जास्त घाम येतो.
• स्नायूंची थरथर जाणवायला सुरुवात होते.
• रक्तदाब थोडाफार वाढू शकतो.
• नाडीचा वेग थोडा मंदावतो.
कशी घ्याल काळजी?
भातकापणी करताना नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. ज्यामध्ये शेतात काम करताना पायात गमबूट वापरणे, हातात रबरी हॅण्डग्लोव्हज घालणे, डोक्याला टोपी घालणे यांसारख्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
वेळेवर उपचार आवश्यक
ग्रामीण भागात बहुतांश वेळा विंचूदंश झाला तर त्याला सुरुवातीला मांत्रिकाकडे विष उतरविण्यासाठी नेण्यात येते. मात्र यामुळे उशीर होऊन वेळप्रसंगी त्या रुग्णाच्या शरीरात विष पसरून जीवितास धोका निर्माण होतो. त्यामुळे विंचूदंश झाल्यास रुग्णाला उपचारासाठी त्वरित जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करावे. वेळेवर उपचार झाल्याने त्या रुग्णाचे प्राण वाचतील.
अधिक वाचा: Beej Prakriya : बियाणे पेरणी अगोदर कशी कराल जैविक पद्धतीने बीजप्रक्रिया