कोरडवाहू शेती ही सिंचनाखाली यावी आणि त्यातून शेतकरी समृद्ध व्हावा. तसेच मजुरांच्या हाताला काम मिळावे, या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून सिंचन विहीर देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे, शासनाने मागेल त्या शेतकऱ्यांना विहीर देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे.
योजनेच्या लाभाची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली असून आता हर्टी ॲपवर विहिरीचा प्रस्ताव दाखल करता येत आहे. हा प्रस्ताव पंचायत समितीत दाखल होत आहे.
निसर्गाच्या असंतुलनामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी, शेती व्यवसाय संकटात आला आहे. तालुक्यात जलसाठे नाहीत. त्यामुळे बहुतांश शेतकरी कोरडवाहू शेती करतात. पिकांना योग्यवेळी पाणी मिळत नसल्याने अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. परिणामी, शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होत नाही. सिंचनाचे क्षेत्र वाढावे, शेतीपिकांना पुरेसे पाणी मिळावे, तसेच मजुरांच्या हाताला काम मिळावे म्हणून शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीतील १५ शेतकऱ्यांना विहिरी देण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, त्यात बदल करून आता मागेल त्या शेतकऱ्याला विहीर देण्यास सुरुवात केली आहे.सिंचन विहिरीसाठी ४ लाखांचे अनुदान देण्यात येत आहे. हर्टी अॅपवर नोंदणी केल्यानंतर विहिरीसाठी अनुदान मिळविता येते.
काय आहे हर्टी ॲप?
शेतकऱ्यांना सहजरित्या सिंचन विहिरीसाठी प्रस्ताव दाखल करता यावा म्हणून शासनाने हर्टी ॲप सुरू केले आहे. ॲप डाऊनलोड करून ऑनलाइन प्रस्ताव दाखल करता येतो.
मागेल त्याला आता सिंचन विहीर...
यापूर्वी प्रत्येक ग्रामपंचायतीला १५ सिंचन विहीर खोदकामाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, त्यात बदल करण्यात येऊन आता मागेल त्याला विहीर देण्यात येत आहे.
योजनेचे निकष काय?...
योजनेच्या लाभासाठी शेतकरी हा अल्पभूधारक असावा. त्याच्याकडे ७/१२ उतारा, ८ अ उतारा, जॉबकार्ड असणे आवश्यक आहे.
अनुदान किती?
सिंचन विहिरीच्या अनुदानात गेल्या दोन वर्षापासून वाढ करण्यात आली आहे. आता प्रत्येक लाभार्थ्यांना ४ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे.
१४८९ शेतकऱ्यांची निघाली वर्क ऑर्डर...
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून सिंचन विहीर देण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत १ हजार ४८९ शेतकऱ्यांच्या विहीर खोदकामाची वर्क ऑर्डर निघाली आहे.
६४१ विहिरींच्या कामाला प्रारंभ...
चाकूर तालुक्यातील १ हजार ६९५ शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यापैकी ६४१ सिंचन विहिरीच्या कामांना सुरुवात झाली आहे.
लाभ घ्यावा...
शेतकरी समृद्ध व्हावा म्हणून शासनाने मागेल त्या शेतकऱ्यांना सिंचन विहीर देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा.- वैजनाथ लोखंडे, बीडीओ, चाकूर.