Join us

Water Bill: शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या बिलाचे पेमेंट करतेय एक मोबाईल ॲप, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 11:35 AM

नागपूर : सिंचन प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत मिळणारे पाण्याचे बिल (Water Bill)   पाणी वापर संस्थेकडून वसूल करण्यात येते. पाणी वापर ...

नागपूर : सिंचन प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत मिळणारे पाण्याचे बिल (Water Bill)  पाणी वापर संस्थेकडून वसूल करण्यात येते. पाणी वापर संस्था शेतकऱ्यांकडून जास्त पैसे वसूल करीत होत्या. यावर पेंच पाटबंधारे विभागाने पुढाकार घेऊन सोमेश अवचट व नेहल कुबाडे या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून पेंच सिंचन ॲप (Pench Sinchan App) बनवून घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांची लूट थांबली आहे. सध्या या माध्यमातून जयलक्ष्मी पाणी वापर संस्था नवरगाव भंडारा यांच्या सहकार्याने लाभार्थी शेतकऱ्यांना सुनिश्चित पाण्याचे बिलिंग होत आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता प्रवीण झोड यांच्या मार्गदर्शनात सोमेश अवचट व नेहल कुबाडे यांनी हा ॲप विकसित केला आहे. त्याला पेंच सिंचन ॲप असे नाव दिले आहे. हे ॲप शेतकऱ्यांसाठी सिंचन बिलाचे पेमेंट करण्यासाठी सोपे व पारदर्शक प्रणाली आहे. या ॲपचे ॲडमिन पाणी वापर संस्था व पाटबंधारे विभागाचे उपअभियंता आहेत.

पूर्वी सिंचनाच्या पाण्यासाठी जी बिलिंग पद्धती होती ती कागदोपत्री होती. आता ती ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन झाली आहे. पेंच प्रकल्पातून सिंचनासाठी ज्या गावांना पाणीपुरवठा होतो, त्या गावांतील शेतकरी त्याचा वापर करीत आहेत. या ॲपमुळे त्यांना सरकारने ठरविलेला पाण्याचा दर, पाण्याचा वापर आणि त्या मोबदल्यात आलेले बिल अशी संपूर्ण माहिती त्यावर मिळत असल्याचे अवचट म्हणाले.

जयलक्ष्मी पाणी वापर संस्थेच्या सचिवांनी सांगितले की, हे ॲप आमच्यासाठी उपयुक्त व फायदेशीर आहे. त्यामुळे वेळ वाचला आहे व बिलिंग प्रणाली सोपी व कागद विरहित झाली आहे.

टॅग्स :पाणीपाटबंधारे प्रकल्पशेतीमोबाइल