Join us

वेलवर्गीय भाजीपाला पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 11:06 AM

वेलवर्गीय भाजीपाला पिकास पाणी देत असताना जमिनीचा विचार करणे आवश्यक आहे. जमिनीतील ओलावा धरून ठेवण्याचे प्रमाण, पाणी मुरण्याचा वेग, पाण्याचा निचरा हे जमिनीच्या प्रकारानुसार बदलत असतात.

वेलवर्गीय पिकास पाणी देत असताना जमिनीचा विचार करणे आवश्यक आहे. जमिनीतील ओलावा धरून ठेवण्याचे प्रमाण, पाणी मुरण्याचा वेग, पाण्याचा निचरा हे जमिनीच्या प्रकारानुसार बदलत असतात. भारी जमिनीमध्ये उपलब्ध पाणी धारणाशक्ती ही हलक्या जमिनीपेक्षा जास्त असते. 

भाजीपाला पीक वाढीच्या अवस्था व पाण्याची गरजकुठल्याही पिकाची पाण्याची गरज त्याच्या संपूर्ण कालावधीमध्ये एकसारखी नसते. सुरुवातीच्या काळात म्हणजेच उगवणीच्या वेळेस पाण्याची गरज कमी असते.

पिकाच्या मुख्य वाढीच्या अवस्थेत पाण्याची गरज जास्तीत जास्त असते, तर पीक पक्व होण्याच्या काळात पाण्याची गरज पुन्हा कमी होते. एकंदरीत पिकास त्याच्यावाढीच्या संवेदनक्षम अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे असते.

पाण्याचे व्यवस्थापन करीत असताना हंगामात किती पाणी उपलब्ध होऊ शकते याचा अंदाज करूनच पीक पद्धतीची निवड करावी. पावसाचे, कालव्याचे आणि विहिरीतील पाण्याचा एकमेकांना पूरक होईल अशा तऱ्हेने वापर करावा.

पाटातील पाणी उपलब्ध असल्यास पिकाच्या संवेदनशील अवस्थेतच पाणी द्यावे, तसेच पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक निवडून त्यामध्ये संवेदनशील अवस्थेत पाण्याचे व्यवस्थापन करावे. उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त कार्यक्षम वापर करण्याच्या दृष्टीने सिंचन पद्धत निवडणे फार महत्वाचे असते.

सिंचन पद्धत जर योग्य नसेल तर जास्त दिलेले पाणी पिकाच्या मुळांच्या खाली झिरपून वाया जाते तसेच पिकाला दिलेली अन्नद्रव्ये, रासायनिक खतेसुद्धा पाण्याबरोबर झिरपून जमिनीमध्ये मुळांच्याखाली जातात आणि या अन्नद्रव्यांचा पिकाच्या वाढीसाठी काहीच उपयोग होत नाही.

अधिक वाचा: आपल्या शेतातील मातीचा प्रकार ओळखण्याची सोपी पद्धत वाचा सविस्तर

पाणी देण्याच्या मोकाट पद्धतीमध्ये एकूण पाण्याच्या २० टक्के किंवा त्यापेक्षाही कमी उपयोग पिकास होतो. बाकीचे पाणी वाया जाते म्हणजेच ते झिरपते किंवा त्याचे बाष्पीभवन होते.

आळे पद्धत ही भोपळा, कारली, दोडका, काकडी यासारख्या वेलवर्गीय भाज्यांना उपयुक्त आहे. सरी वरंबा पद्धत ही ऊस, कपाशी, कांदा, वांगी तसेच इतर नगदी पिकांसाठी वापरतात.

सध्या पावसाचे प्रमाण हे अनियमित व अनिश्चित असल्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक आहे. प्रवाही सिंचन पद्धतीमध्ये पाणी वाटपाची कार्यक्षमता कमी असतेव पाण्याचा अपव्ययसुद्धा जास्त होतो. त्यामुळे तुषार व ठिबक सिंचनासारख्या आधुनिकम सिंचन पद्धती वापरणे गरजेचे आहे.

तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास ३० ते ३५ टक्के पाण्याची बचत होऊन उत्पादनात वाढ झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. ही पद्धत वेलवर्गीय पिकांबरोबरच भुईमूग, सोयाबीन, सूर्यफुल, गहू, कापूस, मका इत्यादीसाठी उपयुक्त आहे.

जमीन, पाणी, हवा यांची उत्तम सांगड घातली गेल्याने उत्पादनाची प्रत सुद्धा सुधारते. तसेच यामधून खते देता येत असल्यामुळे खत वापरक्षमता जवळपास दुपटीने वाढते. मजुरांवरील खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होतो.

टॅग्स :भाज्याशेतीपाणीपीक व्यवस्थापनठिबक सिंचनखते