Join us

Water Soluble Fertilizer : विद्राव्य खतांच्या ग्रेड किती? कोणत्या ग्रेडमध्ये कोणती अन्नद्रव्ये.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 2:08 PM

विद्राव्य खते ही पाण्यात पुर्णपणे विरघळणारी असतात. त्यामुळे ही खते पिकांना फवारणीद्वारे किंवा ठिबकद्वारे देणे संयुक्तिक आहे. ही खते पिकांना लवकर उपलब्ध होतात. उपलब्ध असलेले विविध ग्रेडचे विद्राव्य खते याबद्दल माहिती पाहूया.

विद्राव्य खते ही पाण्यात पुर्णपणे विरघळणारी असतात. त्यामुळे ही खते पिकांना फवारणीद्वारे किंवा ठिबकद्वारे देणे संयुक्तिक आहे. ही खते पिकांना लवकर उपलब्ध होतात. ही खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेत देण्याकरीता अधिक फायदेशीर आहेत.

विद्राव्य खते फवारणीद्वारे देत असताना स्टीकर्स वापरणे फायद्याचे असते. बाजारामध्ये वेगवेगळी खतांची ग्रेड उपलब्ध आहेत. त्या-त्या अवस्थेमध्ये ती ग्रेड फवारल्यास उत्पादनामध्ये वाढ दिसून येते. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार वेगवेगळी खतांच्या ग्रेडची निवड करून त्यांची पिकांवर फवारणी करावी.

बाजारामध्ये उपलब्ध असलेले विविध ग्रेडचे विद्राव्य खते१) १९:१९:१९/२०:२०:००यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये समप्रमाणात आहेत. या ग्रेडला स्टार्टर ग्रेड असेही म्हणतात. यातील नत्र हा अमाईड, अमोनिअम/अमोनिकल व नायट्रेट या तिन्ही स्वरूपात असतो. या खताचा प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरूवातीच्या अवस्थेत शाखीय वाढीसाठी उपयोग होतो.

२) १२:६१:००याला मोनो अमोनिअम फॉस्फेट म्हणतात. यामध्ये अमोनिकल नत्र कमी (१२%) असून पाण्यात विरघळणाऱ्या स्फुरदाचे (६१%) प्रमाण जास्त असते. नवीन मुळांच्या तसेच (जोमदार शाकीय वाढीसाठी) फळ-फांद्यांच्या वाढीसाठी तसेच फुलांच्या योग्य वाढीसाठी व पुनरूत्पादनासाठी या खताचा उपयोग होतो.

३) ००:५२:३४या खतास मोनो पोटॅशिअम फॉस्फेट म्हणतात. यात स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये आहेत. फुले लागण्यापूर्वी व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी हे खत उपयुक्त आहे. पिकामध्ये बोंडे, शेंगा, फळांची योग्य पक्वता व सालीच्या आकर्षक रंगासाठी हे खत विशेषत्वाने वापरले जाते

४) १३:०:४५या खतास पोटॅशिअम नायट्रेट म्हणतात. यात नत्राचे प्रमाण कमी असून पाण्यात विद्राव्य पालाशचे प्रमाण जास्त असते. फुलोऱ्यानंतरच्या अवस्थेत व पक्वता अवस्थेत या खताची आवश्यकता असते. अन्न निर्मिती व त्याच्या वहनासाठी हे खत उपयोगी आहे. या खतामुळे पीक अवर्षणप्रवण स्थितीत तग धरते.

५) ००:००:५०:१८या खतास पोटॅशिअम सल्फेट म्हणतात. या खतामध्ये पालाश बरोबर उपलब्ध स्वरूपातील गंधक असतो. पक्वतेच्या अवस्थेत हे खत उपयोगी पडते. हे खत फवारले असता भुरी सारख्या रोगाचे ही नियंत्रण होऊ शकते. या खतामध्ये पालाश आणि गंधक असल्यामुळे मुळे पीक अवर्षणप्रवण स्थितीत तग धरू शकते आणि गळीत धान्य पिकांसाठी फायदेशीर आहे.

६) १३:४०: १३पात्या, फुले लागण्याच्या वेळी या खताची फवारणी केल्यास फुलगळ थांबून कपाशीची बोंडे वा अन्य पिकांत शेंगाची संख्या वाढते.

७) कॅल्शियम नायट्रेट (Calcium Nitrate)मुळांची वाढ होण्यासाठी तसेच पीक काटक होण्याच्या दृष्टीने वाढीच्या सुरूवातीच्या काळात व बोंडे किंवा शेंगावाढीच्या अवस्थेत या खताचा वापर होतो.

८) २४:२४:००यातील नत्र हा नायट्रेट व अमोनिकल स्वरूपातील आहे. शाखीय वाढीच्या तसेच फुलधारणा अवस्थेत त्याचा वापर करता येतो.

विद्राव्य खतांचा वापर करताना- विद्राव्य खतांचा वापर करीत असतांना आणि त्यांची मात्रा काढत असतांना, माती परीक्षण हा महत्वाचा मुद्दा आहे.- खत मात्रा ठरविण्यासाठी मातीची गुणधर्मेही माहित असणे आवश्यक आहे, अन्यथा खतांवरील खर्च वाढण्याची शक्यता असते.- माती परीक्षण अहवालातील सहा स्तरीय वर्गीकरणानुसार अथवा विविध पिकांकरीता विकसीत केलेल्या गुणसुत्रांनुसार आणि सिंचनाच्या पाळ्या नुसार मात्रा ठरवावी.- सहसा विद्राव्य खतांचा वापर करीत असतांना ३-४ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात विविध ग्रेडचा वापर केल्या जातो, काही वेळा ७-८ ग्रॅम प्रति लिटर खत वापर सांगितल्या गेला आहे. म्हणजेच १० लिटर च्या टाकी साठी ७०-१०० ग्रॅम खत वापरणे गरजेचे आहे.

टॅग्स :खतेशेतीशेतकरीपीकसेंद्रिय खतपीक व्यवस्थापन