Join us

Watermelon Variety : यंदा कलिंगडाच्या 'या' जातींची लागवड करा अन् अधिक नफा मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 12:52 PM

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कलिंगडाची (Watermelon) लागवड कॅश क्रॉप (Cash Crop) म्हणून लोकप्रिय आहे, कारण यामध्ये कमी वेळेत चांगला आर्थिक नफा मिळतो.

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कलिंगडाची लागवड कॅश क्रॉप म्हणून लोकप्रिय आहे. कारण यामध्ये कमी वेळेत चांगला आर्थिक नफा मिळतो. मात्र यासोबतच योग्य जातींची निवड, पिकाची काळजी आणि योग्य व्यवस्थापन असेल तरच शेतकऱ्यांना या पिकातून उत्तम फळे मिळवता येतात.

याच अनुषंगाने आज आपण कलिंगडाच्या काही लोकप्रिय जातींबद्दल जाणून घेऊया.

शुगर बेबी

शुगर बेबी ही जात महाराष्ट्रात सर्वाधिक लागवड केली जाते. याची फळे मध्यम आकाराची आणि ३ ते ५ किलो वजनाची असतात. फळांचा रंग गर्द हिरवा असून, गराचा रंग गर्द लाल आणि खुसखुशीत असतो. यामध्ये गोडी आणि चव उत्तम असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये याची मागणी मोठी आहे.

आसाहसी यामाटो

आसाहसी यामाटो याची फळे ७ ते ८ किलो वजनाची असतात. सालीचा रंग फिक्कट हिरवा असतो, तर गर गुलाबी रंगाचा असतो. या जातीचा उत्पादन प्रति हेक्टरी २५० ते ३०० क्विंटल असतो, ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो.

दुर्गापूर मिठा

या जातीची निर्मिती कृषी संशोधन केंद्र, दुर्गापूर येथे करण्यात आली आहे. फळांचे वजन ६ ते ७ किलो असून, साल फिक्कट हिरवी आहे. जाड सालामुळे फळे जास्त काळ टिकतात, ज्यामुळे विक्रीसाठी चांगली संधी मिळते.

अर्का माणिक

भारतीय फलोद्यान संशोधन संस्था, बेंगलोर येथे विकसित झालेली ही जात लांबट फळे देते. या फळांचा रंग गर्द गुलाबी असून, वजन ६ ते ८ किलो असते. यामध्ये भुरी आणि केवडा रोगांना प्रतिकारक गुणधर्म असतात, त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढते.

अर्का ज्योती

गोल आकाराची आणि ६ ते ८ किलो वजनाची फळे असलेली ही जात, फिक्कट हिरवी आणि गर्द हिरव्या पट्ट्यांसह असते. गराची गुणवत्ता उत्कृष्ट असते, आणि हेक्टरी उत्पादन ५०० ते ६०० क्विंटलपर्यंत असते.

हेही वाचा : Brown Rice : उत्तम आरोग्याची हमी असलेला आरोग्यदायी ब्राऊन राईस

टॅग्स :शेती क्षेत्रशेतीरब्बीशेतकरीपीकफळेभाज्या