रब्बी हंगामातील महत्त्वाचे घेतले जाणारे हरभरापीक सध्या जोमात असून, हरभऱ्याचे घाटे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागील काही दिवसांपूर्वी असलेले ढगाळ वातावरण हरभऱ्यावरील घाटेअळीस पोषक ठरते आहे.
तर या परिस्थितीत प्रामुख्याने घाटेअळी बरोबर मर रोगाचाही प्रादुर्भाव हरभऱ्यावर दिसत आहेत. पीक वाचविण्यासाठी या रोगाची लक्षणे ओळखून वेळीच नियंत्रण करणे गरजेचे असते. या रोगाची लक्षणे आणि उपाय काय आहेत, यासंदर्भातील सविस्तर माहिती पाहूया.
रोगाचा प्रसार व नुकसान
◾ हरभरा पिकातील अतिशय महत्वाचा रोग असून याची लागण फ्युजारियम ऑक्झीस्पोरम ह्या बुरशीमुळे होतो.
◾ मर रोगामुळे भारतात सरसरी १५-२०% नुकसान होते
◾ रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्यास ७०-१००% पर्यंत नुकसान संभावते.
◾ रोगाचा प्रसार मातीतून आणि बियाण्याद्वारे होतो.
◾ उष्ण व कोरड्या वातावरणातील लागवड क्षेत्रात या रोगाची लागण मोठ्या प्रमाणात होते.
लक्षणे
◾ रोगाची लागण पिकाच्या कोणत्याही अवस्थेत होऊन मर होते.
◾ रोगग्रस्त झाडाच्या मुळाच्या आतील भाग तपकिरी काळपट रंगाचा दिसून येतो.
◾ फांद्या जमिनीच्या दिशेने लोंबकळल्या सारख्या दिसतात.
नियंत्रण/उपाय
१) रोगाचा प्रसार बियाणे व मातीमधून होत असल्यामुळे या रोगाच्या नियंत्रणाच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना महत्वाच्या ठरतात.
२) उन्हाळ्यात खोल नांगरट करावी, जेणेकरून सूर्यकिरणांमुळे बुरशीचे बीजाणू नष्ट पावतील.
३) शेतामध्ये वनस्पतीचे कुजके अवशेष, काशा, धसकटे व काडी कचरा असू नयेत.
४) शेत आणि बांध स्वच्छ ठेवावेत जेणेकरून रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार होणार नाही.
५) रोगट झाडे दिसता क्षणिच उपटून नष्ट करावी.
६) बीजप्रक्रिया करताना ट्रायकोडर्मा १० ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे.
७) रोग प्रतिकारक वाणांची निवड करावी.
८) पिकाची फेरपालट करावी.
९) बायोमिक्स १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करिता वापरावे.
१०) रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्यास २०० ग्रॅम अथवा मिली बायोमिक्स १० लिटर पाणी या प्रमाणात द्रावण करून आळवणी करावी.
११) पिकातील घाटे भरण्याच्या अवस्थेत पाणी द्यावे तसेच जमिनीत पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घावी.
१२) एकाच शेतात तेच ते पिक घेणे टाळल्यास रोगाचा प्रादुर्भाव होण्यास आळा बसतो.
१३) अर्थात पिकांची फेरपालट आणि आंतरपिकाचा शेतीत समावेश करावा.
अधिक वाचा: Harbhara Ghate Ali : हरभऱ्यातील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी सोपे व कमी खर्चाचे उपाय