भारतात हुमणीच्या साधारणपणे ३०० प्रजातींची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात प्रमुख दोन प्रकारच्या हुमणी आढळतात. त्यास नदीकाठावरील (लिकोफोलीस) आणि माळावरील (होलोट्रॅकिया) असे संबोधले जाते.
तसेच मागील ४-५ वर्षात नवीन दोन प्रकारच्या हुमणी प्रजाती (फायलोपॅथस आणि अॅडोरेटस) आढळल्या आहेत. सध्या एप्रिल २०१९ पासून हुमणीच्या विविध प्रजातींचे भुंगेरे (होलोट्रॅकिया, फायलोपॅथस आणि अॅडोरेटस व इतर) सापडत आहेत.
हुमणीच्या नियंत्रणासाठी कोणताही एक उपाय योजून किंवा फक्त कीटकनाशकांचा वापर करून नियंत्रण होत नाही. त्यासाठी एकात्मिक किड व्यवस्थापन आवश्यक आहे. हुमणी कीडीच्या जीवनक्रमाच्या सर्व अवस्था जमिनीत आढळतात.
त्याला एकच अपवाद म्हणजे पावसाळ्याच्या सुरूवातीला सूर्यास्तानंतर मीलनासाठी व खाण्यासाठी बाभळीच्या किंवा कडूनिंबाच्या झाडावर जमा होणारे भुंगेरे हे होत. म्हणून प्रथम 'भुंगेरे' व नंतर 'अळी' हेच लक्ष्य बनवून जर एकात्मिक कीड व्यवस्थापन तत्वाचा अवलंब सामुदायिक मोहिम राबवून केला तर हुमणी आटोक्यात येते.
हुमणी नियंत्रणाचे काही सोपे उपाय
- नांगरणी
ऊस लागवडी अगोदर एप्रिल-मे किंवा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात शेत २ ते ३ वेळा उभे आडवे खोलवर नांगरावे. नांगरणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावी. त्यावेळी पक्षी व प्राणी मातीच्या वर आलेल्या अळ्या, कोष व भुंगेरे खातात. - ढेकळे फोडणे
शेतातील ढेकळे फोडावीत. मातीचे ढेकूळ मोठे राहिल्यास त्यात हुमणीच्या निरनिराळ्या अवस्था (अंडी, अळी, कोष) राहण्याची शक्यता असते. त्यासाठी तव्याचा कुळव (Disc Harrow) किंवा रोटाव्हेटर वापरून ढेकळे फोडावीत. - पीक फेरपालट
उसाच्या तोडणीनंतर अति प्रादुर्भावग्रस्त शेतात उसाचा खोडवा न घेता सूर्यफुलाचे पीक घ्यावे व सूर्यफुल काढणीनंतर शेताची ३-४ वेळा नांगरट करावी. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील जास्त पावसाच्या भागात भात हे फेरपालटीचे पिक घ्यावे. - सापळा पीक
भुईमूग अथवा ताग पिकाचा हुमणीग्रस्त शेतात सापळा पीक म्हणून वापर करावा. उसाची उगवण झाल्यानंतर सऱ्यांमध्ये ठिकठिकाणी भुईमूग अथवा ताग लावावा. कोमेजलेल्या भुईमुग अथवा तागाखालील अळ्या माराव्यात. - अळ्या मारणे
शेतात कोणतेही मशागतीचे काम (उभ्या उसात खुरपणी, तगरणी अथवा बांधणी) करताना जमिनीतून बाहेर पडणाऱ्या अळ्या गोळा करून माराव्यात. - प्रौढ भुंगेरे गोळा करून मारणे
- वळवाचा (पहिला) पाऊस पडल्यानंतर होलोट्रॅकिया प्रजातीचे भुंगेरे जमिनीतून एकाच वेळी बाहेर पडतात आणि बाभुळ व कडूनिंबाच्या झाडावर जमा होतात.
- फांद्या हलवून जमिनीवर पडलेले भुंगेरे गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून मारावेत.
- ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात ल्युकोफोलिस प्रजातीचे भुंगेरे उसाच्या पानांवरून गोळा करून मारावेत.
- प्रकाश/कॉम्बो सापळ्यांचा वापर करून भुंगेरे गोळा करून मारावेत.
- भुंगेरे गोळा करून नष्ट करणे हे नियंत्रण उपायांमध्ये सर्वात प्रभावी व कमी खर्चाचे आहे.
- तसेच यामुळे पुढील संक्रमण थांबविले जाते. सतत ३-४ वर्षे भुंगेरे गोळा करून मारावेत.
- सामुदायिकरित्या भुंगेरे गोळा केल्यास हुमणी कीडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास चांगली मदत होते. - अति प्रादुर्भावग्रस्त शेतात उसाचा खोडवा घेऊ नये.
- पीक निघाल्यानंतर हुमणीग्रस्त शेताची मशागत रोटाव्हेटरने करावी.
अधिक वाचा: Crop Loan यंदा पीककर्जाची रक्कम वाढली; कोणत्या पिकाला मिळणार किती कर्ज?