Join us

पिकासाठी पाणी देताना कोणत्या बाबींचा विचार करावा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2023 9:56 AM

पिकाच्या कालावधीत लागणाऱ्या एकूण पाण्याची गरज, दुसरी बाब म्हणजे लागणारे एकूण पाणी किती पाळ्यांमध्ये व किती दिवसांच्या अंतराने द्यावे आणि तिसरी बाब म्हणजे देण्यात येणारे पाणी कोणत्या पद्धतीने द्यावे की, जेणेकरून उपलब्ध पाणी शेतातील सर्व झाडांना सारख्या प्रमाणात दिले जाईल.

पिकांसाठी सिंचन व्यवस्थापन करताना मुख्यत्वे तीन बाबींचा विचार करणे आवश्यक आहे. पहिली म्हणजे पिकाच्या कालावधीत लागणाऱ्या एकूण पाण्याची गरज, दुसरी बाब म्हणजे लागणारे एकूण पाणी किती पाळ्यांमध्ये व किती दिवसांच्या अंतराने द्यावे आणि तिसरी बाब म्हणजे देण्यात येणारे पाणी कोणत्या पद्धतीने द्यावे की, जेणेकरून उपलब्ध पाणी शेतातील सर्व झाडांना सारख्या प्रमाणात दिले जाईल आणि पीक एकसारखे वाढून जास्त फायदा होईल.

सिंचनाद्वारे पिकास द्यावयाचे पाणी मुख्यतः जमीन, हवामान, पिकांवर अवलंबून आहे. जमिनीचा प्रकार, पोत, उतार, खोली, जलधारणशक्ती, पाण्याचा निचरा होण्याचे प्रमाण, तसेच मातीच्या इतर प्राकृतिक गुणधर्माची ठेवण यावर सिंचन पद्धत अवलंबून आहे. एकूण पाऊस व पीक कालावधीतील त्याची विभागणी, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा व बाष्पीभवनाचा वेगावरही सिंचन अवलंबून आहे. त्याचप्रमाणे पिकाचा प्रकार, पिकाचा हंगाम, जात, पीक वाढीच्या संवेदनशील अवस्था, पिकाचा एकूण कालावधी तसेच पिकाच्या मुळांची खोली, रचना व प्रकार यावरही सिंचन अवलंबून आहे.

याशिवाय प्रत्येक कृषी हवामानविषयक विभागातील प्रचलित पीक पद्धती, मशागतीच्या पद्धती, पेरणीतील वेळ, वापरण्यात येणारी सिंचन पध्दत, तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी व पाण्याची उपलब्धता याचाही विचार करणे आवश्यक आहे. पिकांना पाणी देताना या सर्व घटकांचा विचार स्वतंत्रपणे न करता तो एकत्रित करणे महत्त्वाचे आहे. सिंचनाच्या सुधारित पद्धतीतील तुषार सिंचन पद्धतीत पाणी दाबाने पावसासारखे किंवा तुषारांच्या स्वरूपात फवारले जाते. कोकणची भौगोलिक परिस्थिती हवामान तसेच पाण्याची उपलब्धता विचारात घेता तुषार जलसिंचन पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते. तुषार व ठिबक या दोन्ही पद्धतीचा महत्त्वाचा फायदा म्हणजे जमिनीत पिकांच्या मुळांच्या खोली इतकेच पाणी देणे शक्य होते. याशिवाय पाण्याची बचत होते. प्रचलित प्रवाही पद्धतीने पाणी ६५ ते ७० टक्के पाणी वाया जाते. मात्र, तुषार पद्धतीने पाणी दिल्याने १६ ते १७ टक्केच पाणी वाया जाते. प्रचलित प्रवाही पद्धतीप्रमाणे तुषार पद्धतीने पाणी देण्यासाठी जमिनीचे मोठ्या प्रमाणावर सपाटीकरण करण्याची आवश्यकता भासत नाही.

उपयुक्तता व वापरतुषार सिंचन या पद्धतीचा उपयोगः विशेषतः भाजीपाला, तृणधान्ये, कडधान्ये, गळीतधान्ये, वैरणीची पिके, कंदपिके, फळरोपवाटिका यासाठी अधिक किफायतशीर ठरतो. या पद्धतीद्वारे अवर्षण परिस्थितीमध्ये निर्माण होणाच्या पाणी टंचाईवर मात करणे शक्य होते. तसेच कमी पाण्यावर अधिक क्षेत्र ओलिताखाली आणून उत्पादकता वाढविता येते. त्यामुळे सुरुवातीला खर्चिक वाटणारी ही पद्धत भविष्यासाठी किफायतशीर ठरते. या पद्धतीचा अवलंब करताना पाण्याच्या पंपाद्वारे ०.५ ते १० किलो प्रतिचौरस सेंटिमीटर दाब आवश्यक असतो. तसेच तो चालविण्याचा दर्जा महत्त्वपूर्ण आहे.

टॅग्स :शेतीठिबक सिंचनशेतकरीपीकहवामानपाणी