Join us

ऊस पिकात या किडीमुळे मरतो पोंगा व फुटतात पांगशा काय कराल उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 2:32 PM

सद्यस्थितीत ३ महिन्यापेक्षा जास्त कालावधीच्या ऊस पिकामध्ये (इंटरनोड बोरर) कांडी किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

राज्यात ऊस या महत्वाच्या नगदी पिकाची लागवड विविध हंगामात केली जाते. परंतु या पिकावर विविध अवस्थांमध्ये अनेक कीड व रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. सद्यस्थितीत ३ महिन्यापेक्षा जास्त कालावधीच्या ऊस पिकामध्ये (इंटरनोड बोरर) sugarcane internode borer कांडी किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे.

या किडीमुळे ऊसाच्या उत्पादनात ३५ टक्के तर साखर उताऱ्यात २.९ ते ३.० टक्के घट येते. त्यासाठी किडीची लक्षणे ओळखून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.

किडीची ओळख व जीवनक्रमया किडीच्या अंडी, अळी, कोष व प्रौढ पतंग अशा चार अवस्था असतात.१) अंडी अवस्थाकिडीची मादी पानाच्या वरच्या बाजूला पांढऱ्या रंगाची अंडी ९ ते ११ पुंजक्याच्या स्वरुपात घालते. एका पुंजक्यात जवळपास ५ ते ६० अंडी असतात. नुकतीच दिलेली अंडी चपटी, अंडाकृती, चमकदार व पांढरी मेणचट असतात. अंडी उबण्याचा कालावधी हा साधारणपणे ५ ते ७ दिवसाचा असतो.२) अळी अवस्थाअळी पांढरी असते व तिच्यावर ४ गर्द जांभळ्या रंगाचे पट्टे असतात. डोके हलके तपकिरी रंगाचे असते. अळी वाढीच्या ६ अवस्था २५ ते ३५ दिवसात पूर्ण करते व त्यानंतर कोषावस्थेत जाते.३) कोष अवस्थासंपूर्ण वाढ झालेली अळी कोषावस्थेपूर्वी बाहेर येऊन अर्ध वाळलेल्या पानाच्या आवरणात कोषावस्थेत जाते. कोष अवस्थेचा कालावधी ८ ते १० दिवसाचा असतो.४) प्रौढ अवस्थाप्रौढ पतंगाचे पंख २४ ते २६ मि.मी. लांबीचे असून पुढील पंखावर १ ते २ काळे ठिपके आढळतात. नर पतंगात मागील पंख फिकट पांढरे किंवा तपकिरी तर मादीमध्ये चंदेरी रंगाचे आढळून येतात. मादी पतंग हा नर पतंगपेक्षा आकाराने मोठा असतो. नर पतंगाचा कालावधी हा साधारण ४ ते ८ दिवसांचा असतो तर मादी पतंगाचा कालावधी ४ ते ९ दिवसांचा असतो. या किडीची एक पिढी पूर्ण करण्यासाठी ४३ ते ४६ दिवस लागतात.

प्रादुर्भावाची कारणेजास्त तापमान, अधिक आर्द्रता व कमी पाऊस किडीच्या प्रादुर्भावास पोषक वातावरण असते. मे ते सप्टेंबर महिन्यात अधिक प्रादुर्भाव दिसून येतो.

नुकसानीचे स्वरूप- या किडीचा प्रादुर्भाव ऊस लागवडीच्या ३ महिन्यानंतर होतो. अंड्यामधून बाहेर पडलेली अळी कोवळ्या पानांच्या पेशी खरडून खाते. त्यामुळे पांढुरके चट्टे दिसतात.- तिसऱ्या अवस्थेतील अळी कांड्यावर खाण्यास सुरुवात करते व कांड्यांना छिद्र पाडते. साधारणपणे वरील पाच कांड्यावर अळी जास्त प्रादुर्भाव करते.- अळीने खालेल्या कांड्या आतून वाळून जातात आणि पिकाचा वाढीचा पोंगा मरतो. पोंगा ओढल्यास तो सहज उपटून येतो व त्याचा उग्र वास येतो. पिकाची वाढ खुंटते. अळीने हल्ला केलेल्या कांड्यावरील पाचट काढले असता छिद्रांमधून तपकिरी रंगाची विष्ठा आणि भुसा बाहेर पडतो.- अळ्या वारंवार स्थलांतर करतात आणि खोडाच्या आत खाण्यास सुरुवात करतात. जुन्या कडक झालेल्या ऊसाच्या भागामधून अळ्या बाहेर येऊन पुन्हा नवीन कांड्यांच्या कोवळ्या भागावर खाण्यास सुरुवात करतात. परिणामी प्रादुर्भावग्रस्त ऊसाची वाढ कमी होऊन कांड्या लहान राहतात. पांगशा फुटतात, नवीन धुमारे (वॉटरशूट) फुटतात.- ही किड कांडी तयार झाल्यापासून ते ऊस तोडणीपर्यंत पिकास नुकसान करते. मे ते सप्टेंबर महिन्यात प्रादुर्भाव जास्त आढळतो. या किडीमुळे ऊसाचे उत्पादनात ३५ टक्के आणि साखर उताऱ्यात २.९ ते ३.० टक्के घट होते.

एकात्मिक कीड व्यवस्थापन- लागवडीसाठी निरोगी व कीड विरहित बेण्याची निवड करावी. किडग्रस्त खोडवा पिक घेणे टाळावे. तेलबिया व भाजीपाला यासारख्या यजमान नसलेल्या पिकांची फेरपालट करावी. मक्याचे आंतरपीक घेणे टाळावे.- पीक लागवडीनंतर १५० ते २०० दिवसांनी जमिनीलगतची पाने काढून टाकावी. त्या पानांवरील अंडी व कोष नष्ट करावे.- किडीच्या सर्वेक्षणासाठी व नियंत्रणासाठी एकरी ४ ते ५ कामगंध सापळे वाढ्याच्या उंचीवर लावावेत. त्यात आय. एन. बी. ल्युर वापरावे. दर ४५ दिवसांनी ल्युर बदलावे.- पीक ४ महिन्याचे झाल्यानंतर अंडी परोपजीवी ट्रायकोग्रामा चिलोनिस कीटक प्रति हेक्टरी ४ फुले ट्रायकोकार्ड १० दिवसांच्या अंतराने ५ वेळा लावावीत. त्यांचा वापर ऊस काढणीच्या १ महिना अगोदर पर्यंत केल्यास कीड नियंत्रणात राहते.

टॅग्स :ऊसपीकशेतीशेतकरीकीड व रोग नियंत्रण