विदर्भात संत्र्या/मोसंबीला पोषक हवामानामुळे आंबिया व मृग असे दोन बहार येतात. लिंबुवर्गीय फळझाडामध्ये साधारणतः ६० टक्के आंबिया ३० टक्के मृग १० टक्के हस्त बहार येतो.
आंबिया बहार डिसेंबर महिन्यात होणाऱ्या कमी तापमानामुळे ७ से. पेक्षा कमी १० ते १५ दिवस राहिल्यास आंबिया बहार येतो. आंबिया बहारामध्ये मृग बहाराच्या दुप्पट फुले येतात. फुलांची व फळांची गळ मृग बहारापेक्षा आंबिया बहारामध्ये जास्त होते.
साधारणपणे आंबिया बहारामध्ये ३० हजार तर मृग बहारामध्ये १५ हजार फुले येतात. डॉ.पं.दे.कृ.वि. मध्ये घेण्यात आलेल्या प्रयोगात असे दिसुन आले की, आंबिया बहारामध्ये फक्त ४ टक्के तर मृग बहारामध्ये १५ ते २० टक्के फळे झाडावर टिकून राहली.
फळगळ अवस्था
आंबिया बहाराची ऑगष्ट, सप्टेंबर व आक्टोबर महिण्यात होणाऱ्या फळगळीस तिसऱ्या अवस्थेतील फळगळ असे संत्रा/मोसंबी पिकामध्ये म्हणतात. हि फळगळ पूर्ण वाढ झालेल्या परंतु अपरिपक्व फळांची असते, यालाच तोडणीपूर्व फळगळ असे संबोधले जाते.
कारणनिहाय फळगळ प्रमाण
१) वनस्पती शास्त्रीय कारणांमुळे होणारी फळगळ - ७० ते ८३ टक्के
२) रोगांमुळे होणारी फळगळ - ८ ते १० टक्के
३) कीटकांमुळे होणारी फळगळ - ८ ते १७ टक्के
आबिया बहाराच्या फळांची गळ होण्याची प्रमुख कारणे
अ) वनस्पती शास्त्रीय कारणे.
- प्रतिकुल हवामान.
- झाडांची सुदृढता.
- संजिवकाचा असमतोल व नत्राची कमतरता.
- पाणीपुरवठा.
- अन्नद्रव्याची कमतरता.
- जमिनीतील आर्द्रता.
- कर्बोदके.
ब) किडींचा प्रादुर्भाव.
क) रोगामुळे होणारी फळगळ.
पावसाळ्यातील फळगळीची उपाययोजना
पावसाळ्यात बगीच्यात पाणी साचू देवू नये. जास्तीचे पाणी बगीच्या बाहेर काढून देण्यासाठी उताराच्या आडव्या दिशेने प्रत्येकी दोन ओळीनंतर ३० से.मी. खोल ३० से.मी. खालची रुंदी व ४५ से.मी. वरची रुंदी असलेले चर खोदावेत जेणेकरून पाण्याचा निचरा लवकर व प्रभावीपणे होइल.
उपाययोजना
- झाडावर भरपुर पालवी राहावी म्हणुन, अन्नद्रव्यांचा शिफारसीनुसार वापर करावा. सुक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढळून आल्यास त्वरीत पुरवठा करावा.
- सूक्ष्म अन्नद्रव्ये झिंक सल्फेट ५ ग्रॅम, फेरस सल्फेट १ ग्रॅम व बोरॉन १ ग्रॅम प्रति लिटर पाणी घेवून अंबिया फळांकरिता जुलै व ऑगष्ट महिन्यात तसेच मृगाच्या फळाकरिता ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये फवारणी करावी.
- संत्र्यांचा अधिक दर्जेदार उत्पादनाकरिता प्रत्येक झाडाला शिफारशीत मात्रा ३० किलो शेणखत + ७.५ किलो निबोंळी ढेप, ९०० ग्रॅम नत्र (१९५३ ग्रॅम युरिया), ३०० ग्रॅम स्फुरद (१८७५ ग्रॅम सिंगल सुपर स्फॉस्फेट), ३०० ग्रॅम पालाश (५०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) यासह ५०० ग्रॅम व्हॅम, १०० ग्रॅम स्फुरद विरघळणारे जिवाणू, १०० ग्रॅम ॲझोस्पीरीलम, १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा प्रति झाड देण्यात यावे.
- वनस्पती शास्त्रीय आंतरिक फळगळ कमी करण्यासाठी एन.ए.ए.१ ग्रॅम (१० पीपीएम) किंवा २,४-डी १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) किंवा जिब्रेलीक अॅसीड १.५ ग्रॅम (१५ पीपीएम) + युरिया १ किलो (१ टक्का) १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.