महाराष्ट्रामध्ये तूर हे महत्वाचे कडधान्य पीक आहे. तूर पिकामध्ये मर, फायटोप्थोरा आणि वांझरोग हे महत्वाचे रोग आहे. बदलत्या वातावरणामुळे व एकच एक पीक घेत असल्यामूळे तूर पीक जैविक व अजैविक घटकाला बळी पडत आहे.
वांझ रोग सतत पाऊस व ढगाळ वातावरणामुळे वांझ रोग येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वांझ रोग विषाणूजन्य असून त्याचा प्रसार येरीओफाईट माईट म्हणजेच कोळी किडमुळे होतो.
हे कोळी पिजॉन पी मोझॅक या वांझ रोगाच्या विषाणूचा प्रसार करतात. रोगाच्या प्रादुर्भावामुळे तुरीला फुले व शेंगा लागत नाहीत त्यामुळे वांझरोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोळी किडीचे वेळीच व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.
रोगाची लक्षणे- झाडाची उंची, फांद्यांची अपेक्षित वाढ होत नाही, झाड खुजे राहते, पानांचा आकार अनियमित आणि वेडावाकडा होतो.- पानाच्या टोकावर पिवळे डाग दिसतात, पाने आकसतात, किडीने पानातील रस शोषल्यामुळे पाने निस्तेज, हिरवी दिसतात.- रोपावस्थेत प्रादुर्भाव झाल्यानंतर पाने आकाराने लहान असतात, झाडाच्या दोन पेरातील/कांड्यातील अंतर देखील कमी होते, त्यांना अनेक फुटवे फुटतात.- झाडाची वाढ खुंटते. रोगग्रस्त झाडांना फुले, शेंगा लागत नाही. झाडे झुडपा सारखी होऊन शेवटी हिरवी राहतात.- बऱ्याच वेळा एकाच झाडाच्या फांद्यावर वांझ रोगाचा प्रादुर्भाव आढळते व इतर फांद्यांना शेंगा देखील लागलेल्या दिसतात अशा झाडांना अर्धवंधत्व किवा अंशतः वांझ रोग म्हणतात. रोगांचा प्रादुर्भाव रोपा अवस्थेपासून ते पक्वतेपर्यंत कधीही आढळून येतो.
अनुकूल घटक- कमाल २५ ते ३० अंश आणि किमान दहा ते पंधरा अंश सेल्सिअस तापमान, जास्त पाऊस व आर्द्रता रोगासाठी पोषक आहे.- उन्हाळ्यात आपोआप उगवलेल्या तुरीच्या रोपावर किंवा तुरीच्या खोडवा घेतला असल्यास त्या ठिकाणी कोळी किडे आपली उपजिविका करतात आणि पुढील हंगामात वाढणाऱ्या तूर पिकावर वांझ रोग आणण्यास कारणीभूत ठरतात.
व्यवस्थापन१) शेतात व बांधावर असलेली मागील हंगामातील तुरची झाडे काढून टाकावीत, तूर पिकाचा खोडवा घेऊ नये, रोगग्रस्त झाडे दिसतात त्वरीत उपडून त्याना जाळून नष्ट करावीत.२) आयसीपी ८८६३ म्हणजेच मारूती या वाणावर वांझ रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी या वाणाची पेरणी करण्याचे टाळावे.३) डायकोफॉल १८.५ ईसी दोन मि.ली. किंवा डाअफेनथिअरॉन ४७.८० टक्के एससी १.२ ग्रॅम किंवा पाण्यात मिसळणारे गंधक ८० डब्ल्यू पी २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भाव दिसतात त्वरीत फवारणी करावी.४) केंद्रीय किटकनाशक मंडळाने तुरीवरील कोळी किड्याच्या नियंत्रणासाठी एकाही किटकनाशकाची शिफारस केलेली नाही परंतू वरील किटकनाशके वापरल्यास फायदा निश्चितच होतो.