एकुण शेती पिकांच्या १५ टक्के पिकांमध्ये स्वपरागीभवन घडून येते, त्यात एकाच झाडावरील परागकणांच्या हेरफेरीसाठी गुरुत्वाकर्षण किंवा हवेसारखे घटक कारणीभूत ठरतात. तर ८५ टक्के शेती पिकांमध्ये परपरागीभवन दिसून येते. अशा वेळी झाडावरील फुल स्वत:मधील परागकणाचा उपयोग करु शकत नाही.
फुलांची फलनक्रियेसाठी स्वतःच्याच प्रजातीच्या अन्य झाडावरील परागकण मिळवुन परागीभवन क्रिया पुर्ण होते. अशावेळी या फुलांना वाहकाची गरज पडते. अशा वाहक स्वरुपात अनेक किडींचा उपयोग होतो. अशा किटकांना आपण परागीभवन करणारे कीटक म्हणून ओळखतो.
त्यात प्रामुख्याने मधमाशी, लहान भुंगे, ढाल किडे, पतंग, माशी, फुलकिडे वगैरेंचा समावेश होतो. निसर्गाने अशा परागीभवनाच्या फुलांना आकर्षक रंग, सुगंध व स्वादिष्ट मधुर रस दिला आहे, त्यामुळे हे कीटक परागीभवनासाठी आकर्षिले जातात. परागीभवनाने फक्त उत्पादन नाही तर उत्पादनाची गुणवत्ता सुध्दा वाढते.
ज्यावेळी नर फुलातील परागकण मादीफुलाकडे वाहून नेले जातात यास परागीकरण असे म्हणतात. हे परागीकरण किटक, प्राणी, वारा आणि पाणी यामार्फत होत असते. प्राणी, वाराण पाणी यामार्फत होणाऱ्या परागीकरणास मर्यादा आहेत.
अधिक वाचा: Beekeeping कोणत्या मधमाशीपासून किती मध मिळतो
त्यांच्यापासून ठराविक पिकातच परागीकरण होऊ शकते. किटकांपासून मोठ्या प्रमाणात परागीभवन होते. परंतू या किटकांपैकी मधमाशांपासून होणारे परागीभवन अत्यंत महत्वाचे असण्याचे कारण म्हणजे मधमाशांचे पराग आणि मकरंद हे अन्न असून ते मिळविण्यासाठी प्रत्येक फुलास वाहून नेणे सहज शक्य होते.
मधमाशामुळे होणाऱ्या परागीभवनामुळे निरनिराळ्या पिकांच्या उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ दिसून आली आहे. काही वनस्पतीमध्ये ही वाढ अतिशयोक्ती वाटावी एवढी आढळून येते. तसेच मधमाशांच्या परागीभवनामुळे मालाची प्रत व गुणवत्ता वाढून पिक एकाच वेळेस काढणीस आल्याचे दिसून आले आहे.
मधमाशीव्दारा होणाऱ्या परागीभवनामुळे पिकांमधील नर आणि मादी फुलांचा योग्य संकर होतो. त्यातून तयार झालेले बी आणि फळ हे चांगले दर्जेदार असते. परागीभवनातून तयार होणाऱ्या बियांची उगवण क्षमता चांगली राहते. तसेच नवीन तयार होणारे रोप जोमदार होते. परागीभवनामुळे तयार होणाऱ्या बियांची संख्या जास्त असते.
तसेच फळाचा आकार वाढतो त्यामुळे उत्पादनात भर पडते. मधमाशीव्दारा परागीभवनामुळे फळधारणा वाढते आणि फळ गळण्याचे प्रमाण कमी होते. जवळपास सर्वच पिकांच्या उत्पादन वाढीमध्ये मधमाशी मदत करते. मधमाश्यांव्दारे होणाऱ्या परागीभवनामुळेच आज आपण पृथ्वीतलावरील विविध वनस्पतींच्या जैविक विविधतेचे हिरवेपण अनुभवू शकतो.
मधमाशीव्दारे परागीभवन होणारी पिके१) फळझाडे व भाजीपालालिंबू, संत्रा, मोसंबी, बदाम, सफरचंद, चेरी, अक्रोड, द्राक्ष, आंबा, डाळिंब, नारळ, आवळा, पपई, स्ट्रॉबेरी, टरबूज, भेंडी, वांगी, टोमॅटो, कारली, पडवळ, भोपळा, काकडी इ.२) कडधान्ये व तेलवर्गीय पिकेराई, सुर्यफुल, चवळी, मटकी, उडीद, तूर, मूग, वाल, घेवडा इ.३) बीजोत्पादनासाठीकोबी, फ्लॉवर, कोथिंबीर, कांदा, मेथी, गाजर, लवंग, मुळा इ.४) तृणधान्य पिकेज्वारी, बाजरी व मका अनेक कृषि विद्यापीठांतही तेलबिया व फळझाडांच्या उत्पादनात मधमाशामुळे किती वाढ होते या विषयावर संशोधन झाले आहे.
डॉ. चिदानंद पाटील, डॉ. रणजीत कडू आणि डॉ. संदीप लांडगेकिटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी