मालमत्ता हस्तांतरण कायदा १८८२ च्या कलम ५४ नुसार साठेखत हा स्थावर मिळकतीच्या विक्रीचा करार आहे. विशेष म्हणजे, असा करार झाला म्हणजे खरेदीदाराला कसलाही हक्क, बोजा वा हितसंबंध निर्माण होत नाही. कारण साठेखत केवळ एखादी मिळकत भविष्यात हस्तांतरित करण्याचे वचन देणारा करार असतो. असे हस्तांतरण होण्यासाठी साठेखतामध्ये ज्या अटी आणि शर्ती नमूद केलेल्या असतात, त्यांची पूर्तता होणे आवश्यक असते.
साठेखतामुळे काही विशिष्ट अटींची पूर्तता केल्यास एखादी मिळकत खरेदी करण्याचा हक्क 'खरेदीदाराला ' प्राप्त होतो. त्याचप्रमाणे विकणाऱ्याला' संबंधित व्यवहाराची किंमत प्राप्त करण्याचा हक्क मिळतो. दोघांनीही अटी आणि शर्ती पूर्ण केल्यानंतर त्या मिळकतीचे 'खरेदीखत होऊन खरेदीदाराला त्या मिळकतीचा संपूर्णपणे ताबा मिळतो. अटींच्या पूर्ततेनंतरही विकणाऱ्याने मिळकतीचा ताबा दिला नाही तर खरेदीदाराला 'स्पेसिफिक रिलीफ अॅक्ट १९६३ नुसार विक्री व्यवहार पूर्ण करण्याचा आदेश मागण्याचा म्हणजे खरेदीखताचा अधिकार मिळतो. खरेदी करणारी व्यक्ती साठेखतामध्ये नमूद अटी व शर्ती पूर्ण करत नसेल तर विकणाऱ्या व्यक्तीलाही त्या करारातील अटी व शर्ती पूर्ण करण्याचा आदेश देण्याची मागणी वरील कायद्यानुसार करता येते.
साठेखत का केले जाते?- बऱ्याचवेळा जमिनीचे अथवा मिळकतीचे हस्तांतरण लगेचच करणे शक्य नसते. अशावेळी या व्यवहाराला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी साठेखत केले जाते. जमीन भोगवटादार-२ ची असेल तर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ती विकता येत नाही. त्याचप्रमाणे भाडेपट्टा, गहाण, दान किंवा कुठल्याही प्रकारचे जमिनीचे हस्तांतरण करता येत नाही. त्याचप्रमाणे जमिनीवर सरकारचे आरक्षण असेल किंवा जमिनीचे प्रत्यक्ष मोजमाप आणि चतुःसीमा माहीत नसेल अथवा जमिनीवर इतरांचा ताबा किंवा अतिक्रमण असेल, अशा अडचणी असल्यास जमिनीचे लगेचच खरेदीखत करून हस्तांतरण होणे शक्य नसते.- बऱ्याचदा काही व्यवहार मोठे असतात, अशावेळी खरेदीदाराकडे पूर्ण व्यवहाराचे पैसे नसतात. टोकन म्हणून काही पैसे दिले जातात व उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने घेण्याचे ठरलेले असते. अशा व्यवहारात घेणारा व देणारा या दोघांनाही 'कायदेशीर संरक्षण देण्यासाठी साठेखत केले जाते.- बऱ्याचदा खरेदीदार कर्ज काढून मालमत्ता घेत असतो. कर्ज काढण्यासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्त्तीच्या नावे मालमत्तेची कागदपत्रे किवा करार करणे गरजेचे असते. अशावेळी साठेखत केले जाते. जेव्हा खरेदीदाराला कर्ज मिळते तेव्हा उर्वरित रक्कम देऊन खरेदीखत केले जाते.
साठेखत कधीही रद्द करणे शक्य- साठेखताला पूर्ण मुद्रांक व नोंदणी शुल्क लागते. नंतर असे मुद्रांक व नोंदणी शुल्क खरेदीखतास लागत नाही. पुढे जमिनीचे हस्तांतरण खरेदीखताद्वारे केले जाते.- खरेदीखतानंतरच पुढे 'रेकॉर्ड ऑफ द राइट्स' ला नाव लागते व मालमत्तेचे टायटल पूर्ण होते.- साठेखत कधीही रद्द होऊ शकते. खरेदीखत मात्र सहजासहजी रद्द होत नाही.
'साठे' हा 'एसएटीई'चा अपभ्रंश- मुळात ज्याला साठेखत म्हटले जाते तो अपभ्रंश आहे. इंग्रजीमध्ये सेल अॅग्रीमेंट फॉर ट्रान्सफर ऑफ इस्टेट म्हणजे एस.ए.टी.ई.' आहे.- त्याचा अपभ्रंश होऊन पुढे साठे झाले व त्यासोबत 'खत' असा शब्द जोडून 'साठेखत ' प्रचलित झाले.