गोड धाटाची ज्वारी [सॉरगम बायकलर (एल.) मोएन्क] हे बहुउपयोगी पीक आपल्या धाटात साखर साठवते. गेली ५० वर्षे निंबकर कृषि संशोधन संस्था (नारी) येथे गोड धाटाच्या ज्वारीवर काम चालू आहे. त्यातून नव्वदच्या दशकात ज्वारीची संकरित जात ‘मधुरा-१’ तयार करण्यात आली. या जातीपासून फक्त ‘मद्यार्क आणि काकवी व गूळच नाही तर चांगल्या प्रतीचे धान्य व चारा किंवा मूरघासही उत्पादित करता येतात. नारी येथे या गोड ज्वारीच्या रसापासून रसायनमुक्त अशी काकवी तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.
‘मधुरा’ चे प्रमुख गुणधर्म
१) ‘मधुरा-१’ सरासरी १२० दिवसांत पक्व होते. मधुरा-२ व मधुरा-३ या जाती अनुक्रमे ११८ व ११४ इतक्या दिवसांत पक्व होतात.
२) रब्बी हंगामात अधिक धान्य उत्पादन व खरीप आणि उन्हाळा या हंगामांत धाटांचे अधिक उत्पादन मिळते.
३) एका हंगामात एक हेक्टरमधून मधुरापासून खालील उत्पादने मिळतात.
४) काकवी तयार करणे शक्य नसेल तर गुरांना उत्तम चारा म्हणून या पिकाचा उपयोग होतो. असे केल्यास दुधाचे उत्पन्न २० टक्क्यांपर्यंत अधिक मिळत असल्याचे आढळून आले आहे.
५) मधुरा काकवीमध्ये कॅल्शियम, प्रथिने, क जीवनसत्व आणि निकोटिनिक आम्ल (बी-३ जीवनसत्व) अधिक प्रमाणात आढळतात. मधाशी तुलना करता तिच्या कमी किंमतीमुळे ती मधाला उत्तम पर्याय ठरते.
६) ‘मधुरा’ गोड धाटाच्या ज्वारीपासून एका हंगामात प्रति हेक्टरी मद्यार्काचे १००० ते १२०० लीटर उत्पादन मिळू शकते.
तपशील | मधुरा-१ | मधुरा-२ | मधुरा-३ |
ओला कडबा (टन) | १०-४० | २०-४० | २०-४० |
सवळलेली धाटे (टन) | ५-२० | १०-१५ | १०-३० |
हिरवा पाला (टन) | १०-१५ | १५-२० | १०-१५ |
धान्य (टन) | १.५-२.० | १.६-२.५ | १.६-२.५ |
काकवी (ब्रिक्स : ७४-७६ टक्के) | ०.५-१.२ | ०.२-१.५ | ०.५-२.१ |
रसाचे हंगामी उत्पादन (कि.ग्रॅ./हेक्टर) | ७५०-७००० | १५००-६२५० | २५००-१०५०० |
काकवीचे हंगामी उत्पादन (कि.ग्रॅ./हेक्टर) | ०.१५-१.२ | ०.२-१.५ | ०.५-२.१ |
नंदिनी निंबकर
अध्यक्ष, निंबकर कृषि संशोधन संस्था (नारी) फलटण