यंदा पर्जन्यमान कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी मर्यादित ओलीवर गहू पिकाची पेरणी केली आहे. पाण्याची उपलब्धता होईल याची शाश्वतता नाही. अशावेळी जिरायत/मर्यादित सिंचनाखालील गहू पिकात जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी काय उपाय करणे आवश्यक आहे ते पाहूया.
रब्बी हंगामात जमिनीतील ओलावा कसा टिकविता येईल यासाठी खालील तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक
- पिक उगवून आल्यानंतर त्यात ठराविक दिवसात कोळपणी करणे अतिशय महत्वाचे असते. त्याचा मुख्य उददेश म्हणजे तण नष्ट करणे आणि वाया जाणारी ओल थोपविणे. पहिली कोळपणी पिक तीन आठवड्यांचे झाल्यावर करावी. कोळपे चालविल्याने जमीन भुसभुशीत होवून मातीचा थर चांगला बसू शकतो आणि जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो.
- रब्बी हंगामामध्ये जिरायत गव्हात आच्छादनाचा वापर हा बाष्पीभवन थांबविणे आणि तणांचा बंदोबस्त करणे असा दुहेरी उपयुक्त आहे. आच्छादन साधारणपणे तूरकाठ्याचा भुसा, धसकटे, वाळलेले गवत, भाताचे काड किंवा भुसा इ. प्रकाराने करता येते. दर हेक्टरी ४ ते ५ टन आच्छादनाचा वापर करावा. आच्छादन जेव्हढे लवकर टाकता येईल तेवढे उपयुक्त ठरते. पिक ४ ते ५ आठवड्यांचे होण्याच्या आत आच्छादनाचा वापर करावा. आच्छादनाचा वापर केल्यामळे पिकास २५ ते ३० मिलीमीटर ओलाव्याची बचत होते पिकास महत्वाच्या पाणी देण्याच्या अवस्थेत ओलावा अधिक मिळतो. तसेच जमिन भेगाळण्याची तीव्रता कमी होते म्हणूनच रब्बी जिरायत गव्हास आच्छादनाचा वापर करणे म्हणजे एक संरक्षक पाणी दिल्यासारखे आहे.
- ठिबक/तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करावा. पाण्याची उपलब्धता असल्यास संरक्षित किंवा पीक जगविण्यसाठी पाणी द्यावे. तुषार पध्दतीने पाणी दिल्यास जास्तीचे क्षेत्र कमी कालावधीत भिजविता येईल.
- जमिनीत कमी ओलावा असल्यास पोटॅशियम नायट्रेट १ टक्के प्रति लिटर पाणी या प्रमाणात पिकावर फवारावे. पिकाच्या पानातील क्रिया गतिमान होण्यास मदत होते आणि पिके जमीनीतील ओलावा शोषण्यास सुरुवात करतात.
- पिकाव्दारे बाष्पोत्सर्जन कमी करण्यासाठी केओलीन अथवा खडू पावडरचा १ टक्के फवारा पानांवर दिल्यास सूर्यप्रकाश पानावरून परावर्तीत होऊन गहू पिकाच्या अंतरंगातून होणारी पाण्याची वाफ कमी करण्यास मदत होते.
- गहू पिकास पेरणीनंतर ५५ आणि ७० दिवसांनी १९:१९:१९ या विद्राव्य खताची २०० ग्रॅम १० लि. पाण्यात मिसळून फवारणी करावी.
डॉ. सुरेश दोडके, डॉ. योगेश पाटील आणि प्रा. संजय चितोडकर
कृषि संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक