संत्रा/मोसंबीची झाडे निसर्गतः थंडीच्या आणि उन्हाळ्याच्या दिवसात कमी/जास्त तापमानामुळे दोनदा विश्रांती घेत असतात. साधारणतः या काळात वातावरण पोषक नसल्यामुळे झाडांवर नवीन वाढ होत नाही.
त्यामुळे या विश्रांतीच्या काळात जास्तीचा साखरेचा संचय झाडाच्या ६ ते ९ महिन्यांच्या फांद्यांमध्ये होतो व नवीन वाढीसाठी खर्च होणारा साखरेचा भाग शिल्लक राहून फांद्यांमध्ये त्याचा जास्तीचा संचय होऊन हवामान अनुकूल झाल्यावर झाडावर फुले येण्यास याचा उपयोग होतो.
संत्रा/मोसंबीच्या आंबिया बहाराला नैसर्गिक बहार म्हणतात. या बहारामध्ये संत्रा/मोसंबी झाडाची वाढ तापमान कमी झाल्यामुळे कडाक्याच्या थंडीत थांबते.
डिसेंबरचा दुसरा आठवडा ते जानेवारीचा दुसरा आठवडा या एका महिन्याच्या कालावधीत रात्रीचे किमान तापमान साधारणतः १० अंश से. खाली राहते. एवढ्या तापमानावर झाडांना ताण बसतो. या ताणामुळे झाडे खराब होत नाही.
झाडास ताण बसला हे कसे ओळखावे?
१) ताण सुरू करण्यापूर्वी झाडावरील पूर्वीची फळे काढावीत, बागेचे पाणी हळूहळू कमी करीत नंतर बंद करावे.
२) ताण सुरू केल्यानंतर पानांचा मूळचा रंग कमी होऊन ती फिक्कट व नंतर पिवळी पडतात.
३) असे होत असतांना पाने गळून पडेपर्यंत अन्न तयार करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवतात.
४) साधारणपणे २५ टक्के पानगळ झाल्यास ताण बसला असे समजावे.
अशाप्रकारे झाडांना ताण दिल्यास एकाच वेळी फुलोरा येतो आणि व्यापारीदृष्टया हे फायद्याचे ठरते.
भारी जमिनीत आंबिया बहार घेण्यासाठी काय करावे?
१) काळ्या जमिनीचा थर किमान १.२० मिटर पासून १५ मिटर पर्यंत असतो.
२) या जमिनीत ताणावर झाडे सोडताच झाडाच्या मुळ्या पाण्याच्या शोधात खोलवर जातात.
३) मुळात काळी जमीन उत्तम ओलावा टिकवून ठेवणारी असल्यामुळे, झाडांना ओलावा मिळत राहतो व झाडाला ताण बसत नाही आणि ती हिरवीगार राहून वाढत राहतात. अशा जमिनीत बगीचा संपूर्ण ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात वखरून साफ ठेवावा.
४) झाडांच्या ओळींमधून खोल वखरणी करून झाडाच्या मुळ्या उघड्या कराव्यात म्हणजे टोकावरची तंतुमुळे तुटून त्या ओलावा शोषून घेऊ शकणार नाहीत व झाड ताण घेतील.
५) शिवाय १ लिटर पाण्यात २ मि.ली. लिव्होसीन हे कायीक वाढ रोखणारे संजीवक फवारावे म्हणजे झाड नवतीत न जाता फुले येण्यास मदत होईल.
अधिक वाचा: Amba Falgal : आंबा पिकातील फळगळ रोखण्यासाठी करा हे सोपे उपाय