कापूस पिकावर सुरवातीच्या काळात प्रामुख्याने मावा, तुडतुडे आणि फुलकिडे या रसशोषक किडीचा प्रादूर्भाव आढळून येतो. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव डोमकळ्या च्या स्वरूपात ऑगस्ट महिन्यात दिसुन येतो.
गुलाबी बोंड अळीमुळे कपाशी पिकाचे नुकसान होऊ शकते. सुरुवातीपासुनच या किडींचे व्यवस्थापन केल्यास हे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी करता येते. त्यासाठी खालील उपाययोजनाचा अवलंब करावा.
- पिक उगवणीनंतर ४० ते ४५ दिवसांनतर फेरोमेन (कामगंध) सापळ्यांचा वापर करावा. सापळे पिकापेक्षा किमान एक फुट उंचीवर लावावेत, जेणेकरून फेरोमेन (कामगंध) सापळ्यांचा प्रभाव वातावरणात पसरण्यास मदत होईल.
- यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमेन (कामगंध) सापळे लावावेत. सतत तीन दिवस या सापळ्यामधे आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत तसेच मास ट्रॅपिंग करीता हेक्टरी १५ ते २० कामगंध सापळे लावावेत.
- प्रत्येक कापूस संकलन केंद्रावर व जीनींग फॅक्टरीमध्ये १५ ते २० कामगंध सापळे लावून दर आठवड्याने पतंगाचा नायनाट करावा.
- पिकातील डोमकळ्या नियमित शोधून त्या अळी सहीत नष्ट कराव्या म्हणजे पुढील पिढ्यांची रोकथाम करता येईल.
- पिक उगवणी नंतर ३५ ते ४० दिवसांपासुन दर पंधरा दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझॅडिरेक्टिन ३००० पीपीएम ४० मिली प्रति १० ली पाणी या प्रमाणे फवारणी.
- पिक उगवणी नंतर ५५ ते ६० दिवसांनी १२ ते १५ दिवसांच्या अंतराने ट्रायकोग्रामा टॉयडीयाबॅक्ट्री किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस परोपजीवी मित्र किटकांची कार्ड (१.५ लक्ष अंडी प्रति हेक्टरी) चार वेळा पिकावर लावावेत.
- गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक आठवड्याला एकरी शेताचे प्रतिनिधित्व करतील अशी २० झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुले, पात्या व बोंडे संख्या मोजून त्यात गुलाबी बोंड अळीग्रस्त फुले, पात्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी व प्रादुर्भावग्रस्ताची टक्केवारी ५ टक्के पेक्षा जास्त आढळल्यास खाली दिल्याप्रमाणे रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.
- प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही ३० मिली किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी ३ मिली किंवा थायोडिकार्ब ७५ टक्के भुकटी २० ग्रॅम किंवा फिप्रोनील ५ टक्के एससी ३० मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ईसी १२ मिली या पैकी कोणत्याही एका किटकनाशकची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तांत्रिक माहिती व सहकार्यडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला