शेतीकरताय त्या उत्पन्नावर आयकर लागतो का? लागत असेल तर कधी, कसा लागतो? याबद्दल अर्जुन आणि कृष्ण यांच्या संवादातून माहिती पाहूया.
अर्जुन: कृष्णा, हल्ली टोमॅटो आणि इतर शेती उत्पादनाच्या भावात मोठी वाढ झालेली दिसली. आयकराच्या संदर्भात कोणत्या गोष्टींची शेती उत्पादन म्हणून गणना होते?कृष्ण: कोणते उत्पादन शेती उत्पादनामध्ये येते आणि कोणते नाही यासाठी आयकर कायद्यात विशिष्ट तरतुदी आहेत आणि त्यानुसार संबंधित उत्पन्नावर कर लागेल की नाही ते ठरवले जाते.
त्याबाबतीत महत्त्वाचे असे दहा मुद्दे:१) शेती उत्पादनाच्या विक्रीची व्यवसाय म्हणून गणना होणार नाही.२) शेतीकरता जमीन भाड्याने दिली असेल तर त्याची शेतीतून उत्पादनात गणना होईल. फार्म हाऊस भाड्याने दिले असेल, तर त्यावर हाऊस प्रॉपर्टी म्हणून कर लागेल.३) जमिनीची विक्री करण्यात आली आणि ती जमीन आयकर नियमानुसार शेतजमीन असेल तर त्यावर कॅपिटल गेन लागणार नाही परंतु विक्री केलेली जमीन शेतजमीन नसेल तर त्यावर कॅपिटल गेन लागेल.४) शेती उत्पादनाच्या विक्रीतून शेतीकरिता होणाऱ्या खर्चाची वजावट मिळते.५) करदात्याला फक्त शेतीतून उत्पन्न असेल तर ते संपूर्ण करमुक्त असते.६) जर शेती सोडून इतर उत्पन्न बेसिक एक्झम्शन लिमीटच्या वर असेल आणि शेतीतून होणारे उत्पन्न पाच हजाराच्या वर असेल तर शेती उत्पनावरही कर लागेल.७) शेतीसंबंधित वहीखाते करदात्यांनी आपल्या इतर व्यवसायांपासून वेगळे ठेवले पाहिजे.८) शेतजमिनीची सर्व कागदपत्रे करदात्यांनी व्यवस्थित सांभाळून ठेवली पाहिजेत.९) करदात्याने वर्षानुसार शेतीत लागवड केलेल्या पिकांची माहिती ठेवली पाहिजे.१०) शेतीत होणारे खर्च आणि विक्रीच्या पोचपावत्या सांभाळून ठेवल्या पाहिजेत.
अर्जुन: करदात्यांनी यातून काय बोध घ्यावा?कृष्ण: शेतीतून होणाऱ्या उत्पनावर कर आकारण्यात येत नाही अशी समजूत आहे. परंतु अशा अनेक तरतुदी आहेत ज्यामध्ये शेतीतून होणाऱ्या उत्पन्नावरदेखील कर आकारणी केली जाऊ शकते. आता आयकर विभाग ड्रोन आणि अन्य तंत्रज्ञानाचा वापर करून करदात्यांना खरेच शेतीतून उत्पन्न आहे का याची पडताळणी करणार आहे.
उमेश शर्माचार्टर्ड अकाउंटंट