Join us

White Grub Management संधी सोडू नका; हिच ती वेळ हुमणी कीड नियंत्रणाची

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 12:27 PM

हुमणी कीडीचे प्रकोप टाळण्यासाठी उपाययोजना ..

मागील ३-४ वर्षापासून हुमणी किडीचा जवळपास सगळ्या पिकांवर प्रादुर्भाव आढळून येत आहे. या पूर्वी किडीचे प्रकोप केवळ ऊस व कंदवर्गीय पिकांवर आढळत असत. आता भाजीपाला, कापूस, सोयबीन भुईमुग व इतर खरीप व रबी हंगामातील महत्वाच्या पिकांवर आढळून येते आहे.

हुमणी कीडचे प्रकोप टाळण्यासाठी आताच उपाययोजना करणे आवश्यक आहे. नसता येणाऱ्या हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.

बागायती जमिनीत घेतल्या जाणाऱ्या पिकांमध्ये ओलावा व अन्नपुरवठा जास्त होत असल्याने हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढत जात आहे. शेतकरीवर्ग शेतात कीड दिसल्यास किंवा नुकसान होत असल्यास उपाययोजना करत असतो त्यामुळे खर्च व वेळ दोन्ही वाया जाते.

आता ३०० ४०० रु मध्ये होणारी हुमणी नियंत्रण हंगामात एका फवारणीचा / नियंत्रणाचे खर्च ४००० रु/एकर असू शकतो. हुमणी किडीचे खालीलप्रमाणे नियोजन केल्यास होणारे नुकसान टाळता येईल.

किडीची पार्श्वभूमी 

हुमणी कीड हि एक परभक्षी कीड आहे. किडीची जीवनसाखळी हि वर्षभर चालू असते. जवळपास ८ महिने किड अळी अवस्थेत असते. नंतर फेब्रुवारी मार्च दरम्यान कीड (कोष) विश्रांती अवस्थेत जाते. मे-जून मध्ये पडणाऱ्या पूर्व मौसमी पाऊस पडल्यास किडीचे भुंगेरे जमिनीतून निघतात. संध्याकाळच्या वेळी कडूनिंब किंवा बाभूळ यावरती भुंगेरे मिलनासाठी जमा होतात.

किडीची ओळख व अवस्था

हुमणीचा प्रौढ मुंगेरा गडद विटकरी रंगाचे ते निशाचर असतात. भुंगेऱ्यांचे पंख टणक असतात. अंडी घालण्याचा कालावधी पावसाळा सुरू होताच सुरू होतो.

  • जीवनकाळ १ वर्ष
  • अंडी अवस्था : मादी भुंगेरे साबुदाण्याच्या आकाराची व लांब गोल अंडी जमीनीत १२ ते १५ सेमी खोलीवर एक- एक मोकळी अंडी घालतात. एक मादी ५० ते ६० अंडी घालते.
  • अळी अवस्था : अंडी मधुन बाहेर पडलेल्या अळीला हुमणी असे म्हणतात. अळी रंगाने पिवळसर पांढरी असते. अळी अवस्था ६ ते ८ महिने असते. अंड्यातून बाहेर पडलेली अळी तीन वेळेस कात टाकते. पूर्ण वाढ झालेली अळी इंग्रजी अक्षराच्या ८ आकाराची जमिनीत आढळून येते. पूर्ण वाढ झालेली अळी जमिनीत १० ते १५ सेमी खोलीवर जाऊन मातीचे कवच बनवते व त्यात कोष अवस्थेत जाते.
  • कोष अवस्था : २५ ते ३० दिवसांत पूर्वमौसमी पाऊस पडल्यास जमिनीतून बाहेर पडतात.
  • प्रौढ भुंगेरे : भुंगेरेची अवस्था ७० ते ८० दिवस असते. नरापेक्षा मादी आकाराने मोठी असते. हुमणीची एक पीढी एक वर्षात पूर्ण होते. 

नुकसानीचे प्रकार

किडीची अळी अवस्था सुरुवातीला कोवळी मूळ खाऊन उपजीविका करते. नंतरच्या अवस्थेत पिकात मुख्य मूळ कुरतडल्यास पीक वाळून जाते. जास्त प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतातील पीक नाश पावते परिणामी दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते.

उपाययोजना

हुमणी अळीचे प्राथमिक अवस्थेतील नुकसान टाळण्यासाठी भुंगेरे हीच एक अवस्था थोड्या कालावधीसाठी जमिनीबाहेर असते. बाकी सर्व अवस्था जमिनीत असतात. जमिनीत असणाऱ्या अवस्था नियंत्रण करणे कठीण जाते किंवा निवडलेल्या उपाययोजना त्यापर्यंत पोहचत नाही त्यामुळे अपेक्षित असे परिणाम या किडीवर मिळत नाही. म्हणुनच भुंगेरे अवस्थेत बंदोबस्त करणे फायदेशीर ठरू शकते.

अ. भुंगेरे व्यवस्थापन

पूर्वमौसमी पाऊस झाल्यावर हुमणी किडीचे भुंगेरे सूर्यास्तानंतर मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात व बाभूळ, कडूलिंब, बोर झाडांवर मिलनासाठी जमा होतात.

अश्या झाडांच्या फांया रात्री लांब काठीच्या किंवा बांबूच्या मदतीने हलवून खाली पडलेले भुंगेरे वेचून नष्ट करावे.

भुंगेरे मोठ्या प्रमाणात पकडण्यासाठी सोलार चलित प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. कडू निंब किंवा बाभूळ झाडांच्या जवळ सापळे प्रस्तापीत करावे. भुंगेरे वेचून नष्ट करावे. शेतकऱ्यांनी हे उपाय सामूहिकरीत्या केल्यास जास्त फायदा होतो.एरंडी बियांचे आमिष तयार करून हुमणी किडीचे भुंगेरे मोठ्या प्रमाणात आकर्षित करता येते. (आमिष तयार करण्याची पद्धत - २ किलो एरंडी बिया बारीक चूर्ण १०० लिटर पाणी) दोन्ही एकत्रित करून एका ३०३ मीटर खड्‌डा करून त्यात प्लॅस्टिकची ताडपदरी अथरून यावे व वरील तयार झालेले द्रावण त्यात मिसळावे. आमिष तयार केलेल्या ठिकाणी प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.

आ. हुमणी अळी व्यवस्थापनः

मशागतीय व जैविक व्यवस्थापन

१) किडीची अळी अवस्था नियंत्रण करण्यास कठीण जाते. एकात्मिक पद्धतीने नियंत्रणाचा वापर केल्यास नियंत्रण करणे सोपे जाईल.

२) पीक काढणीनंतर खोल नांगरणी करावी.

३) मशागत करताना दिसणाऱ्या अळ्या वेचून नष्ट करावे.

४) पहिली कुळव्याची पाळी घालताना एकरी ५०० किलो निंबोळी पेंढ मातीत मिसळून द्यावे.

५) जून जुलै दरम्यान अंतरमशागत करताना शेतात एकरी मेटारायझिम अॅनिसोपिली @५ किलो पावडर @ २०० किलो कंपोस्टखत किंवा कुजलेल्या शेणखतात मिश्रण करून मातीत मिसळून द्यावे. (वरील नियोजन करताना जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे).

६) आले, हळद, लागवडीनंतर १५ ते २० दिवसांनी व ४०- ५० दिवसांनी मेटारायझिम अंनिसोपिली किंवा बिव्हेरिया बेसियाना २ लिटर/एकरी २०० लिटर पाण्यात मिसळून ठीबकद्वारे सोडावे (यामुळे अळी अवस्था नियंत्रण करण्यास मदत मिळेल).

७) ऊस पिकात हुमणी अळीचे प्रादुर्भाव वाढल्यास पिकास पाणी देताना ते जास्त काळ साचून राहील याकडे लक्ष यावे त्यामुळे किडीची अळी अवस्था गुदमरून मरेल.

२. रासायनिक नियंत्रण

१) जमीन तयार करताना कार्बोफुरोन ३% सीजी एकरी १० किलो मातीत मिसळून यावे.

२) जर उभ्या पिकात किडीच्या अळीने आर्थिक नुकसानीची संकेत पातळी ओलांडली (१ अळी/मीटर) असल्यास तर फिप्रोनील ४०% इमिडाक्लोप्रीड ४०% डब्लूजी (पोलीस, लेसेंटा) हेक्टरी @२०० ग्रॅम/५०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी घालावी. किंवा थायामेथोक्सम ००.९० % + फिप्रोनिल ००.२० % जीआर @ ५ किलो/एकर मातीत मिसळून द्यावे.

३) हुमणी अळी नियंत्रणकरिता क्लोरोपायरीफॉस ५०% सायपरमेथ्रीन ५% ईसी @५०० मिली/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे. किंवा क्लोथोडीयन ५०% डब्लूडीजी @१०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे. (क्लोरोपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रीन ५% ईसी व क्लोथोडीयन ५०% कीटकनाशके हुमणीसाठी लेबल क्लेम नाहीत पण शेतकरी त्याचा सर्हास वापर करतात).

४) ठीबकद्वारे द्रावण सोडत असताना ठिबक पहिले १५ २० मिनिटे चालू ठेवावे. त्यामुळे द्रावण किडी पर्यंत पोहण्यास मदत होईल.

लेखक सचिन आढेएमएससी अॅग्री किटकशास्त्र, वॉटर संस्था, पुणे मो. ९०११८४२०८४

टॅग्स :शेतीशेतकरीपीक व्यवस्थापनशेती क्षेत्र