प्रामुख्याने भारतातील उष्णकटिबंधीय प्रदेशामधे हुमणी किटकाचा प्रादुर्भाव दिसुन येतो. ऊस लागवडीचे वाढते क्षेत्र, एकेरी पीकपद्धती, प्रजाती विविधतेचा अभाव, खोडवा पद्धती यामुळे किडीचा प्रसार झपाट्याने होत आहे.
मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड हे हुमणीच्या व्यापक प्रसार होण्याचे मुख्य कारण मानले जाते. ओलसर वालुकामय माती, काळी माती आणि चिकनमातीमध्ये हि कीड आढळते. हुमणीच्या नियंत्रणासाठी तिचा जीवनक्रम, नुकसान स्वरूप आणि नियंत्रणाचे उपाय माहिती असल्याशिवाय हुमणीचा बंदोबस्त करणे शक्य नाही.
किडीचा जीवनक्रमया किडीच्या अंडी-अळी-कोष-भुंगे अशा चार अवस्था आहेत. पहिल्या मान्सूनच्या सरीनंतर हुमणीचे प्रौढ भुंगे संध्याकाळच्या वेळी जमिनीतून कोशावस्थेतून बाहेर येतात आणि कडुलिंब, बाभुळ, विलायती बाभुळ, बोर इत्यादी वनस्पतींची पाने खातात आणि त्याच झाडावर या किडीचे नर मादी मिलन होते, त्यानंतर मादी जमिनीमध्ये अंडी घालते. साधारणपणे एक मादी ५० ते ६० अंडी घालते व १५ ते १८ दिवसात अंडी उबतात. अळीची पहिली अवस्था ६० ते ९० दिवस, दुसरी अवस्था ५५ ते ११० दिवस व तिसरी अवस्था ४ ते ५ महिने असते. तिसऱ्या अवस्थेतील पूर्ण वाढ झालेली अळी जमिनीत ७० सें.मी खोल, कोशावस्थेमध्ये (२० ते २२ दिवस) जाते. अशा पद्धतीने एक पिढी पूर्ण होण्यास साधारणपणे एक वर्षाचा कालावधी लागतो.
नुकसानीचे स्वरूप- या किडीची अळी प्राथमिक अवस्थेमध्ये जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे सेवन करते व नंतर ऊस पिकाच्या मुळावर छिद्रे करून मुळे पूर्णपणे नष्ट करते.- प्रादुर्भावग्रस्त झाडांची पाने पिवळी पडतात व झाडे सुकल्यासरखी दिसतात व वाळून गेलेली झाडे ओढल्यास लगेच उपटून येतात.- ऊसाचे वजन घटते, झाडे खाली कोसळतात व ऊस गाळप (क्रशिंग) व लागवड करण्यासाठी अयोग्य ठरतो.- किडीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास ऊसाच्या मुळाभोवती आठ ते दहा पुर्ण वाढ झालेल्या अळ्या आढळून येतात.- हुमणीचा प्रादुर्भाव खुप उशीरा दिसून येतो आणि त्यानंतर केलेल्या रासायनिक किटकनाशकांचा वापराचा उपयोग होत नाही.
किडीचा प्रादुर्भाव होण्यासाठी अनुकूल परिस्थिती- ओलसर वालुकामय माती, काळी माती आणि चिकनमातीमधे हुमणी दिसून येते.- हुमणीचा व्यापक प्रसार होण्याचे मुख्य कारण म्हणजे मोठ्या प्रमाणात होणारी जंगलतोड.- साखर कारखान्यांची ऊसाची गरज पूर्ण करण्यासाठी सतत ऊस पिकाची लागवड कारणे व खोडवा ऊस पद्धत वापरने तसेच ऊसाच्या एकाच जातीची वारंवार लागवड करणे व शेताच्या बाजुने पर्यायी वनस्पती जास्त असल्याने या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.- एकाच जमिनीमधे ऊस पिकाची सतत लागवड करण्यामुळे हुमणी किडीस यजमान पीक (होस्ट) खाण्यासाठी व विण (मेटिंग) करण्यासाठी मिळते आणि ही कीड मोठ्या प्रमाणात शेतामधे राहते परिणामी नवीन लागवड केलेल्या ऊस पिकाचे ८० ते १००% नुकसान होते.
एकात्मिक कीड व्यवस्थापन पारंपारिक पद्धती- फेब्रुवारी महिन्यात उन्हाळी पावसाच्या सरी येण्यापूर्वी जमीन तयार करताना जमिनीची खोल नांगरणी करावी. यामुळे किडीचे कोष सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येऊन सुकून जातात व नष्ट होतात. - तसेच दिवस नांगरणी केल्यामुळे जामिनीतून बाहेर आलेल्या सुप्तावस्थांना (कोष) इतर कीटक व पक्षी खाऊन ते नष्ट करून टाकतात.- अळीच्या विविध अवस्थांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ऊस लागवडीच्या वेळी नांगरणी नंतर जमिनीस १२ ते ४८ तास पाणी द्यावे.- उसाची भात पिकाबरोबर फेरपालट करावी कारण भात पिकामधे पेरणीपूर्वी चिखलणी केली जाते व पिकामधे बराच काळ पाणी साठून रहाते त्यामुळे अळीचा पूर्णपणे नायनाट होतो.- पिकाची फेरपालट या किडीच्या यजमान (होस्ट) पीक नसलेल्या उदा. सूर्यफुल पिकासोबत करावी त्यामुळे किडीचा नायनाट होतो.
यांत्रिक पद्धती- मान्सूनच्या पहिल्या सरीनंतर भुंगे जमिनीतून बाहेर पडतात व रात्रीच्या वेळी कडुलिंबाच्या झाडाजवळ मोठ्या प्रमाणात आढळतात त्यांना गोळा करून त्यांची विल्हेवाट लावावी.- रात्री झाडाच्या फांद्या जोरजोराने हलवल्यास भुंगे झाडावरून खाली पडतात या भुंग्याना आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळ्याचा (लाईट ट्रॅप) चा वापर करावा.- भुंगे मारण्यासाठी डायक्लोरोवोसचा वापर करावा किंवा भुंगे साबणाचे पाणी अथवा केरोसिनच्या पाण्यात टाकावेत.
जैविक नियंत्रण- दिवसा मशागतीच्या वेळी काही पक्षी हुमणीच्या अळ्या खातात त्यामुळे किडीचे काही प्रमाणात नियंत्रण होते.- अळी सुरूवातीला सेंद्रीय पदार्थावर जगते तेव्हा खरीप हंगामात जमिनीत शेणखत टाकताना खताबरोबर हेक्टरी २५ किलो मेटारायझम किंवा बिव्हेरिया बुरशी मिसळून टाकावी.- बिव्हेरिया बॅसियाना ही बुरशी हुमणीच्या सर्व अवस्थांवर नियंत्रण मिळवते पण अळी अवस्था या बुरशीला अतिसंवेदनशील असते.- पिकास पाणी दिल्यानंतर ही बुरशी शेणखतात मिसळुन सरीमध्ये ऊस पिकाच्या मुळाजवळ द्यावी. वर्षातुन ४ ते ५ वेळा बुरशीचा वापर केल्यास हुमणीचे पूर्णपणे नियंत्रण होते.
रासायनिक पद्धती- मान्सूनच्या पहिल्या सरीनंतर हुमणीचे भुंगे कडुलिंबाच्या झाडाकडे आकर्षित होतात अशा वेळी त्या झाडावर कार्बोफ्युरॉनची फवारणी करावी.- हुमणीच्या सुरुवातीच्या अवस्था मारण्यासाठी २% मिथील पॅराथिऑन पाउडर ५० किलो याप्रमाणे १०० किलो शेणखतात मिसळून पिकाच्या सरीमधे द्यावी.- पिकास कार्बारील व क्लोरपायरिफॉस ठिबक सिंचन व पाटाच्या पाण्याद्वारे अशा दोन्ही पद्धतीने देऊ शकतो.
राजकुमार. वी, उदय.एस. बोराटे आणि जगदीश राणेआयसीएआर-राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था, माळेगांव, बारामती.ई मेल: rajkumar3@icar.gov.in; entoraj@gmail.com