टोमॅटो हे खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीन हंगामात लागवड केले जाणारे पीक आहे. सततचे बदलणारे हवामान हे रसशोषक किडीस पोषक ठरत आहे. त्यामुळे त्यांचा प्रादुर्भाव वाढत आहे. पीक चक्रा दरम्यान विविध जैविक आणि अजैविक ताणांमुळे पिकांवर रसशोषक किडी वाढु लागल्या आहेत.
ह्या रसशोषक किडी विषाणुजन्य रोगांचे प्रसारक किंवा वाहक म्हणून काम करत असतात. टोमॅटो पिकांवर सुमारे १०-२० प्रकारचे विषाणुजन्य रोग आढळुन येतात. विषाणुजन्य रोगांच्या वाहक असलेल्या प्रमुख किडी मावा, पांढरी माशी व फुलकिडे या आहेत.
रसशोषक किडी व्यतिरिक्त काही विषाणूजन्य रोगांचा प्रसार हा मशागतीसाठी वापरली जाणारी अवजारे, आंतरमशागतीची कामे, मानवी स्पर्शाने, रोगट बियाणे व रोगग्रस्त झाडांचे अवशेष इ. मूळे होतो. एकंदरीतच किडींच्या नुकसानीचा, प्रकार, रोगांची लक्षणे, पिकांची अवस्था या गोष्टींचा विचार करून एकात्मिक पध्दतीने नियंत्रण करणे गरजेचे झाले आहे.
विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची कारणे
१) विषाणु विरोधी वाणांचा अभाव व तसेच हंगाम शिफारशी नुसार टोमॅटो पिकाची लागवड न करणे.
२) पूर्वीच्या पिकांतील रोगाचा प्रादूर्भाव पुढील पिकात होणे.
३) रोपवाटिकेत रोपांची योग्य ती काळजी न घेणे.
४) रसशोषक किडींच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करणे.
५) किडनाशके, वनस्पती वाढ नियंत्रके आणि नत्रयुक्त खते यांचा अनियंत्रित वापर.
६) टोमॅटो फळबागेतील स्वच्छतेचा अभाव.
रसशोषक किडींमार्फत विषाणूंचा प्रसार
रसशोषक किडी पिकांच्या पानातून त्यांच्या वाढीस पोषक अशी अन्नद्रव्यांचे शोषण करत असतात. त्या दरम्यान एखादी रसशोषक कीड जर विषाणूग्रस्त वनस्पतीमधून अन्नद्रव्य शोषण करत असेल तर त्या अन्नद्रव्यासोबत त्यांच्या शरीरात विषाणू जातात.
पुढे जेव्हा ही कीड निरोगी वनस्पतीवर रस शोषण करते तेव्हा पुन्हा त्या निरोगी वनस्पतीवर रोगाची लागण होते. विषाणू रसशोषक किडींच्या शरीरात गेल्या नंतर, मावा किडीच्या शरीरात ते अल्प काळासाठी राहतात तर पांढरी माशी व फुलकिडे यांच्या शरीरात ते दीर्घकाळासाठी किंवा त्यांच्या जीवन कालावधीपर्यंत सक्रिय राहतात.
अधिक वाचा: आला उन्हाळा.. पिकांना पाणी कमी पडतंय; करा या तंत्राचा वापर वाढेल उत्पादन