ठिबकसारख्या सूक्ष्मसिंचन प्रणालीचा वापर करण्याकडे देशातील लाखो प्रयोगशील शेतकऱ्यांचा कल वाढला. त्यातून पाण्याच्या बचतीसह काटेकोर पाणी दिल्याने पिकांच्या उत्पादनात वाढ होण्याचा फायदाही त्यांना मिळाला. दरम्यान ठिबक तंत्रावर आधारित असलेले विद्राव्य खतांकडेही शेतकऱ्यांचा ओढा वाढणे स्वाभाविक होते. तथापि कोरोना आणि नंतर उद्भवलेली युद्धजन्य स्थिती यामुळे या खतांच्या किंमती जवळपास दुपटीने वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली असून विद्राव्य खतांचा वापरात हव्या त्या वेगाने वाढ होताना दिसत नाहीये.
आयातीवर अवलंबित्वमूळात आपल्या देशाचे रासायनिक खतांच्या आयातीवरचे अवलंबित्व सध्या आपल्या गरजेच्या २५% इतके आहे. त्यातही युरिया, फॉस्फेट्सच्या बाबतीत 90% इतके, तर एकतर कच्चा माल किंवा तयार खते म्हणून (डीएपी/एमएपी/टीएसपी) आणि पोटॅशच्या बाबतीत 100% असल्याचे खते आणि रसायने मंत्रालयाच्या २०२१-२२ च्या अहवालात नोंदविण्यात आले आहे. याशिवाय देशात वापरले जाणारे विद्राव्य खतही चीनसारख्या देशांतून आयात करावे लागत असे. मात्र कोरोना काळानंतर चीनमधील कंपन्यांचे उत्पादन घटले, तसेच भारत आणि चीनच्या तणावपूर्ण संबंधांमुळे चीननेही या खतांच्या बाबतीत आखडता हात घेतला. परिणामी भारतातील विद्राव्य खतांच्या किंमती दुपटीपर्यंत पोहोचल्याचे सांगितले जाते. त्यातच रशिया-युक्रेनमधील युद्धजन्य स्थितीमुळे वाहतुक खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्याचाही परिणाम नेहमीच्या खतांसह विद्राव्य खतांच्या किंमतीवरही झालाचे या क्षेत्रातील जाणकार स्पष्ट करतात.
अशी आहे विद्राव्य खतांची बाजारपेठदरम्यान एका अहवालानुसार २०१८ मध्ये भारतातील विद्राव्य खतांची बाजारपेठ 12.7 अब्ज डॉलर इतकी होती, 2028 पर्यंत सुमारे 20.6 अब्ज डॉलपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. मात्र असे असले तरी ही वाढ आता जेमतेम ४ टक्केच राहिल असेही या क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत. सामान्य खतांच्या तुलनेत विद्राव्य खते पिकांद्वारे ९० टक्के शोषली जातात व त्यातून उत्पादन वाढीसाठी फायदा होतो असे मृदशास्त्रज्ञ व मृदतज्ज्ञांचे सांगणे असते. त्यानुसार कोरोनापूर्व काळात या खतांचा मोठा बोलबाला होत होता. आधुनिकतेची कास धरणारे शेतकरीही ठिबकसोबत याच खतांचा आग्रह धरायचे. मात्र नंतरच्या काळात किंमती वाढल्या आणि वापर घटायला सुरूवात झाली. सध्या अनेक शेतकरी पुन्हा पारंपरिक रासायनिक खतांकडे वळले आहेत.
चित्र पुन्हा बदलत आहेअसे असले तरी ही मागच्या वर्षापासून ही स्थिती बदलत आहे. चीनसह अन्य देशांकडून विद्राव्य खतांचा होणारा पुरवठा हळूहळू पुन्हा सुरूळीत होत असून खतांच्या किंमतीही थोड्या कमी होत आहेत. मध्यंतरी ०:५२:३४ सारख्या विद्राव्य खतांच्या २५ किलोच्या एका गोणीची किंमत ३००० रुपयांपर्यंत होती, पण मागच्या दोन वर्षात टंचाईमुळे भाव वाढल्याने याच किंमती एका गोणीसाठी पाच हजारापर्यंत पोहोचल्याचे विद्राव्य खतांचे विक्रेते सांगतात. मात्र आता या किंमती पुन्हा कमी होत असल्या, तरी पूर्वीसारख्या त्या कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे शेतकरीही संथगतीने पुन्हा विद्राव्य खतांना आत्मसात करत असल्याचे चित्र आहे.
आपल्याला विद्राव्य खते आयात करावी लागतात. मागच्या दोन वर्षांच्या काळात ही आयात घटली आणि किमती वाढल्या परिणामी शेतकऱ्यांकडून मागणीही घटल्याचे राज्यात चित्र आहे. पण राज्यातला शेतकरी आधुनिकतेची कास धरणारा असल्याने भविष्यात हे चित्र पुन्हा पूर्वपदावर येईल यात शंका नाही.विकास पाटील, कृषी संचालक, निविष्ठा व गुण नियंत्रण, महाराष्ट्र राज्य
चीनकडून होणारी विद्राव्य खतांची निर्यात त्या देशाने कमी केली होती. त्यामुळे दर वाढले व शेतकरी त्यापासून दूर गेला. मात्र आता सुमारे दोन वर्षांनंतर ही निर्यात हळूहळू सुरळीत होत असून लवकरच किंमती कमी होतील व शेतकरी पुन्हा विद्राव्य खताचा वापर करतील अशी आशा आहे.- मनमोहन कलंत्री, राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया ॲग्रो इनपुट डिलर्स असोसिएशन व संचालक इफको, नवी दिल्ली