ग्रामपंचायतीमार्फत दिली जाणारी प्रमाणपत्रे मोबाइलवरून घरबसल्या काढता येत आहेत. यासाठी महा ई-ग्राम सिटिझन अॅप विकसित करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात अॅपवरून दाखले काढण्यासाठीच्या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षभरात ७९ हजार ९० लोकांनी विविध दाखले घरबसल्या काढले आहेत.
अॅपच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यातील २८ हजार ग्रामस्थांनी कागदपत्रे मिळविली आहेत. महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागामार्फत महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट नावाचा एक मोबाइल अॅप्लिकेशन अॅप उपलब्ध करून दिले आहे. हा अॅप आपल्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल करून गावातील नागरिक घरबसल्या ग्रामपंचायतीमधून मिळणारे दाखले काढू शकतात. ही सुविधा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध झाली आहे. यातून हजारो नागरिकांनी वर्षभरात विविध कागदपत्रे मिळविली आहेत. ग्रामपंचायतीला या माध्यमातून नागरिकांकडून मिळणारा गृहकर वसूल करणे सोयीचे झाले असल्याने ग्रामपंचायतीला गृहकर वसुलीत येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत.
काय आहे महा ई-ग्राम सिटिझन अॅप
ग्रामस्थांना जास्तीत जास्त सुविधा घरबसल्या कशा देता येतील याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. यासाठी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व पंचायतराज विभागामार्फत महा-ई-ग्राम सिटिझन कनेक्ट नावाचे एक मोबाइल अॅप्लिकेशन अॅप कार्यान्वित केले आहे. हे अॅप आपल्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल करून घरबसल्या ग्रामपंचायतीमधून मिळणारे दाखले मिळवू शकणार आहेत.
कोणते दाखले मिळणार?
नागरिकांना घरबसल्या जन्म व मृत्यू प्रमाणपत्र, दारिद्रयरेषेखालील प्रमाणपत्र, पीएम विश्वकर्मा, ई-श्रमकार्ड, महात्मा फुले योजना, भारत ग्रामपंचायत स्तरावरून मिळणारे विविध दाखले, योजनांचा लाभासाठी कागदपत्रे या अॅपवरून मिळत आहेत.
अॅप कसे इन्स्टॉल कराल?
मोबाइलमधील प्ले स्टोअरमधून महा ई- ग्राम सिटिझन कनेक्ट हे अॅप इन्स्टॉल करा. अॅप ओपन करून रजिस्टर करा. यामध्ये आपले नाव, लिंग, जन्मतारीख, मोबाइल नंबर, ई-मेल आयडी ही सर्व माहिती जतन करा. त्यानंतर मिळालेल्या युजर पासवर्ड द्वारे लॉगिन करा.
अॅप इन्स्टॉल करण्यासाठी लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=com.gov2egov.citizenforum&hl=en_IN&gl=US
महा ई-ग्राम सिटिझन अॅप महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग व पंचायत राज विभागामार्फत महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट नावाचा एक मोबाइल अॅप्लिकेशन अॅप उपलब्ध करून दिला आहे. या अॅप्लिकेशन अॅपमुळे नागरिकांना घरबसल्या ग्रामपंचायतीकडून मिळणारी प्रमाणपत्रे मिळत आहेत. शिवाय घरबसल्या ग्रामपंचायत कराचा भरणादेखील करता येत आहे. - इशाधिन शेळकंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर