प्रत्येक जमिनीची दरवर्षी नांगरणी करावीच असे नाही. जमिनीच्या आणि घेण्यात येणाऱ्या पिकाच्या गरजेनुसार ही मशागत करण्याची गरज असते. त्याकरिता जमिनीवरील मागील पीक, पुढे घ्यावयाचे पीक, जमिनीचा प्रकार आणि हवामान इत्यादींचा विचार करावा लागतो.
नांगरणीचे उद्देश साध्य होण्यासाठी, पूर्वीचे पीक काढल्याबरोबर लगेच नांगरणी करणे फायद्याचे ठरते. कारण यावेळी जमिनीत ओलावा असल्याने नांगरणीचे काम हलके होते, ढेकळे निघत नाहीत, नांगरण खोलवर होते.
पूर्वीच्या पिकाचा पालापाचोळा, काडीकचरा जमिनीत गाडला जातो व जमिनीस सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा होतो. रब्बी-उन्हाळी हंगामातील पिके काढल्यानंतर म्हणजेच सर्वसाधारणपणे मार्च एप्रिलमध्ये त्वरित नांगरण्या कराव्यात.
नांगरणीचे फायदे
- जमीन भुसभुशीत होते, त्यामुळे पावसाचे व ओलीताचे पाणी जमिनीत सहज मुरते.
- पिकांचे अवशेष जमिनीत गाडले जाऊन जमिनीची प्राकृतिक, रासायनिक व जैविक अवस्था सुधारते.
- जमिनीत हवा खेळती राहते व पाण्याचा चांगला निचरा होतो.
- हवा, पाणी आणि उष्णता जमिनीत योग्य प्रमाणात खेळती राहते.
- सेंद्रिय पदार्थांचे विघटन जलदरीत्या होऊन पिकांना आवश्यक असणारी अन्नद्रव्ये मुक्त होतात.
- तणांचे बी नांगरणीमध्ये खोल गाडल्यामुळे तणांचा नाश होण्यास मदत होते.
- खोल नांगरणीमुळे पिकांच्या मुळांची योग्य वाढ होऊन वेगवेगळ्या थरातील अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध होतात.
- उपयुक्त जीवाणूंची वाढ होते.
- पिकांची धसकटे, फुटलेले कंद किंवा कोंब काढण्यास मदत होते.
- जमिनीस भरपूर सूर्यप्रकाश मिळतो व उष्णता पोषक ठरते.
- जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते.
अशा प्रकारे नांगरणीमुळे जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक अवस्था सुधारते.
जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यास किंवा पीक काढल्यानंतर जमीन नांगरण्यास वेळ गेल्यास मध्यम व भारी जमिनीत ढेकळे निघतात, अशा जमिनीत पहिला पाऊस पडेपर्यंत ढेकळे तशीच राहू द्यावीत. पावसामुळे व उन्हामुळे ढेकळे नरम होऊन फुटण्याचे काम होते.
अधिक वाचा: उन्हाळी हंगामात फळबागेचे व्यवस्थापन कसे कराल? कशी घ्याल काळजी