Join us

मराठवाड्यातील महिला शेतकरी शिकत आहेत ड्रोनचे तंत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2023 9:30 AM

ड्रोनच्या वापरासंदर्भात महिला शेतकरी आता रस दाखवत आहेत. मराठवाड्यातील कार्यक्रमात त्याचाच प्रत्यय आला.

मराठवाड्यातील पैठण आणि परिसरातील शेतकऱ्यांनी ड्रोन वापरात आघाडी घेतलेली असतानाच आता महिला शेतकऱ्यांनाही ड्रोन तंत्राची भुरळ पडली आहे. बीड जिल्ह्यातील पालसिंगन गावात विकसित भारत संकल्प यात्रेत खामगाव कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी दिलेली ड्रोनची माहिती उपस्थित महिला शेतकऱ्यांनी आवर्जून समजावून घेतली, तर प्रात्यक्षिकातही रस दाखवला.

विकसित भारत संकल्प यात्रा देश पातळीवर दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ पासून २५ जानेवारी २०२४ पर्यंत चालणार आहे. त्या अंतर्गत पालसिंगन गावात शेतकऱ्यांसाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या कृषी माहितीबरोबरच ड्रोनचे मुख्य आकर्षण होते. शेतीमध्ये ड्रोनचा वापर करणे का महत्त्वाचे आहे, याविषयी कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी सांगतले. तर आरसीएफ तर्फे ड्रोनचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. याप्रसंगी आयुष्मान कार्डची वाटप देखील करण्यात आले.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे तसेच जिल्हा प्रभारी अधिकारी आरती सिंग यांच्यासह विविध सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी-गावकऱ्यांसाठी विविध योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांना व शेतकरी महिलाना मार्गदर्शन केले, तर आरती सिंग यांनी यात्रेचे महत्त्व आणि उद्देश समजावून सांगितला. कृषी विज्ञान केंद्र, खामगाव बीड यांनी तयार केलेल्या सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती व अझोला उत्पादन याविषयी घडीपत्रिकाही शेतकऱ्यांना वाटण्यात आल्या.

टॅग्स :शेतकरीशेतीपीक व्यवस्थापनतंत्रज्ञानमहिलाबीड