शेतीसाठी भूभर्गातील पाण्याचा उपसा फार जास्त होत आहे. त्यामुळे आज भूगर्भातील पाण्याची पातळी फार खोल गेली आहे. काही भागातील भूजल पातळी ४०० फुटापेक्षाही खोल गेल्याने विहिर बागायत पूर्णपणे धोक्यात आले आहे.
उन्हाळ्यात बऱ्याच विहीरी कोरड्या झाल्या आहेत आणि भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ही खालावलेली भूजल पातळी पूर्वस्थितीत आणणे अत्यंत आवश्यक आहे. याकरीता योग्य उपाय म्हणजे भूजल पुनर्भरण.
पुनर्भरण चर
पाणलोट क्षेत्रातील गावात पावसाचे पाणी अडवून जमिनीमध्ये पाणी पुनर्भरणाची प्रक्रिया वेगाने व्हावी हे उद्दिष्ट समोर ठेवून आज जमिनीत पाण्याचे पुनर्भरण यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. या सर्व प्रयोगात पुनर्भरण चर हे पाणलोटात एक महत्वाचे व यशस्वीरित्या करण्याचे महत्वाचे कार्य आहे.
पुनर्भरण चर हे पाणलोटात एक महत्त्वाचे काम आहे. पुनर्भरण चरामुळे पाण्याचे स्रोत कायम होण्यासाठी मदत होते. पाणी जमिनीच्या आत साठवून राहिल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते.
- ज्या पाणलोटात नाला, विहीर आहे. त्या नाल्याच्या खाली पुनर्भरण चर खोदावयाचा असल्यामुळे नाल्याचा तळ ४ ते ५ सें.मी.पर्यंत कच्चा मुरमाचा असावा.
- पुनर्भरण चर भरण्यासाठी लहान-मोठ्या दगडांची आवश्यक असते. असे दगड कमीत कमी अंतरावर उपलब्ध असावेत.
- नाल्याची रुंदी १० मी. एवढी असेल, तर नाल्यात १० मी. रुंद आणि ४ ते ७ मी. खोलीचा खड्डा खोदावा. लांबी २० ते ३० मीटर उपलब्धतेनुसार ठेवावी. शक्य तो गोल दगड वापरणे सोयीचे असते.
- दगड हे २० ते ५० सें.मी. व्यासाच्या आकाराचे असावे. हे पुनर्भरण चर खोदत असताना कठीण खडक लागला, तर उंची तेथपर्यंतच ठेवावी. खोदकाम केल्यानंतर निघणारी माती नाल्याच्या दोन्ही काठांवर समान पसरावी.
- पुनर्भरण चर खोदल्यास जमिनीत पाण्याचे पुनर्भरण जवळ जवळ सहा महिने सतत होत राहते. जमिनीतील पाण्याचे पुनर्भरण पावसाचे पाणी एकत्रित करून साठविणे आणि त्याचा कार्यक्षम वापर करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
- जमिनीमध्ये पावसाचे पाणी मुरवून भूगर्भातील पाण्याचा साठा वाढविण्यासाठी प्रत्येकाने गावपातळीवर शेतपातळीवर, तसेच आपल्या घराभोवतीदेखील पडणारे पावसाचे पाणी जमिनीमध्ये कसे मुरवता येईल यासाठी आज विचार करून आवश्यक ती योजना कार्यान्वित करावी.
रिचार्ज पिट
ज्या भागात विहीर नसेल तेथे रिचार्ज पीट तयार करून छतावरील किंवा इतर ठिकाणचे पाणी जमिनीत मुरविता येते. हे पीट २.५ ते ३ मीटर खोल, तसेच १.५ ते ३ मीटर रुंदीचे असते. यात मोठे दगड, छोटे दगड तसेच वाळू/रेतीचा चाळा भरावा आणि त्याचा पृष्ठभाग कुठल्याही जाळीने झाकावा जेणेकरून पाण्यासोबत येणारा कचरा यात जाणार नाही.
अधिक वाचा: विहिरीला पाणी कमी पडू नये म्हणून करा हा सोपा उपाय