Join us

सत्तर दिवसांत एक एकर टरबूज मधून शेतकऱ्याला १ लाख ३५ हजारांचा निव्वळ नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2024 10:52 AM

शेततळे ठरले मोठे फायद्याचे

राजकुमार देशमुख

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील शेतकऱ्याने एक एकरात लागवड केलेल्या टरबूज विक्रीतून ७० दिवसांमध्ये १ लाख ७५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. यातून ३५ हजार रुपये खर्च वजा जाता शेतकऱ्याला १ लाख ३५ हजार रुपये निव्वळ नफा झाला. पहिल्यांदाच टरबुजाची लागवड केली असून पुढेही लागवड करणार असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

तालुक्यातील हिवरखेडा शेतकरी रामदास ईरतकर यांनी मेहनत करून एका एकरात टरबूज घेऊन एक लाखाच्या वर उत्पादन काढले आहे. खरे पाहिले तर हिवरखेडा हा भाग दुष्काळी पट्टा आहे. गावाच्या बाजूला येलदरी धरण आहे. मात्र, या धरणाच्या पाण्याचा या भागातील शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही. 'धरण उशाला आणि कोरड घशाला', अशी परिस्थिती या भागात पाहावयास मिळत आहे.

या सर्व परिस्थितीवर मात्र करत ईरतकर यांनी त्याच्या शेतात नानाजी देशमुख योजनेतून शेततळे घेतले व ते हिवाळ्यात त्यांच्या शेतातील विहिरीवरून पाइपलाइन आणून ते पूर्णपणे भरून टाकले व आता त्या पाण्यावर सदर शेतकऱ्याने टरबूज पीक घेतले.

पारंपरिक पिकाला फाटा देत रामदास ईरतकर यांनी टरबुजाची लागवड केली. प्रथम एका एकर क्षेत्रावर ट्रॅक्टरच्या साहाय्याने खोल नांगरटी व रोटरी करून घेतली. त्या एका एकर क्षेत्रात टरबूज पिकांची लागवड करण्यासाठी सहा फुटांवर बेड मारून घेतले. त्यानंतर रासायनिक खताचा डोस मिक्स करून टाकून घेतला. पिकाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनचे नियोजन व्यवस्थितरीत्या करून घेतले.

त्यावर मल्चिंग टाकून झिगझेंग पद्धतीने सव्वा फुटावर पाच हजार रोपांची लागवड जानेवारी महिन्यात केली होती. त्यानंतर रात्रंदिवस पाणी देत लेकरांप्रमाणे टरबुजाची देखभाल केली.

टरबूज पिकाला पाणी व खत देण्यासाठी सूक्ष्म पद्धतीने नियोजन केले. पिकाच्या वाढीनुसार वेगवेगळी विद्राव्य खते ठिबकद्वारे पोटॅशियम शोनाइटसह दिली. विविध बुरशीनाशकांचा वापर केला. पिकावर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आलटून-पालटून वेगवेगळ्या रासायनिक औषधांच्या फवारणी केल्या. रोपांची शेतात लागवड केल्यानंतर ६५ ते ७० दिवसच देखरेख केली. त्यानंतर टरबूज पिकाची काढणी केली असता एका एकर क्षेत्रातून १५ टन टरबुजाचा माल निघाला.

७० दिवसांत मिळाला १ लाख ३५ हजार निव्वळ नफा

नानाजी देशमुख योजनेतून शेतात शेततळे घेऊन एकर क्षेत्रात टरबूज पिकाच्या लागवडीकरिता पूर्व मशागत करून पाच हजार रोपांची मल्चिंग टाकून शेतात लागवड केली. एका एकरामधून १ लाख ७५ हजार रुपयांचे उत्पादन घेतले आहे. आतापर्यंत ३५ हजार रुपये खर्च आला आहे. खर्च वजा करता १ लाख ३५ हजार रुपये निव्वळ नफा मिळाला. सर्व टरबूज डोणगाव येथील व्यापाऱ्यांनी नेली. माझ्या शेतातील टरबुजाचे वजन ६ ते ७ किलो झाले होते. - रामदास ईरतकर, हिवरखेडा

टॅग्स :फळेशेतीशेतकरीपीकपाणी