Join us

१०वी नापास, रस्त्यावर झोपला पण नाटक सोडलं नाही; शेतमजुराच्या पोराचा 'नाट्यगौरव'ने सन्मान 

By दत्ता लवांडे | Published: March 22, 2024 1:03 PM

बारामती तालुक्यातील करचेवाडी या गावी गरीब कुटुंबात जन्माला आलेला सोमनाथ लहानपणापासून हरहुन्नरी कलाकार होता.

अफाट स्वप्न घेऊन जगणारी माणसं इतरांपेक्षा वेगळी असतातच नेहमी... त्यांचा प्रवास परीघ भेदणारा असतो. त्यामुळे जगातले कोणतेही वर्तुळ त्यांना आपल्या क्षितिजात अडकवू शकत नाही. मर्यादांचे सिमोल्लंघन करून या माणसांनी आपली लढाई शेवटपर्यंत तरवून ठेवलेली असते. एकदा निर्णय घेतला की, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी ही माणसं एकसारखी पळत असतात. कारण त्यांच्या स्वप्नांचा स्विच कायम ऑन असतो. परस्थिती यांना कधीही रोखू शकत नाही कारण यांचा इरादाच तितका पक्का असतो. मग एकदिवस अडथळे सुद्धा यांच्या वाटेतून बाजूला जाऊ लागतात आणि यांची एक नवी वाट तयार होते. यंदाच्या झी नाट्य गौरव सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळवणाऱ्या सोमनाथ लिंबरकरची कहाणी सुद्धा अशीच काहीशी आहे. विशेष म्हणजे तो एका सालगड्याचा आणि शेतमजुराचा मुलगा आहे. 

बारामती तालुक्यातील करचेवाडी या गावी गरीब कुटुंबात जन्माला आलेला सोमनाथ लहानपणापासून हरहुन्नरी कलाकार होता. सुट्टीच्या दिवशी कामाला जाऊन आपल्या शिक्षणाचा खर्च भागवणारा सोमनाथ १० वीत नापास झाला. दहावी मध्ये नापास झालेल्या अनेकांच्या गोष्टी जगाने पाहिलेल्या आहेत. सोमनाथची गोष्ट मात्र थोडी वेगळी होती. सोमनाथ नापास झाल्यानंतर रोजंदारीने कामाला जाऊ लागला. पण कलाकारी डोक्यात फिट्ट बसली होती. म्हणून तो पुण्याला गेला आणि एका नाटकाच्या ग्रुप मध्ये इस्त्री करायचं काम करू लागला. 

इस्त्रीचं कामदेखील सोमनाथ इतक्या प्रामाणिकपणे करत होता की, प्रयोग संपल्यानंतर कलाकार भेटायला येत होते आणि अगदी आखीव रेखीव व कडक इस्त्रीचे कौतुक करत होते. इथून सोमनाथचा नाटकाचा प्रवास सुरू झाला. पण तो दहावी नापास होता याची खंत त्याच्या एका शिक्षकाला सतावत होती. त्या शिक्षकाने सोमनाथला दहावी पास होण्याचा आग्रह केला आणि सोमनाथ  परीक्षांचा फेरा करू लागला. कसाबसा दहावी पास झाला आणि सोमनाथ कॉलेजला जाऊ लागला. आता परत नापास व्हायचं नाही हे मनाशी ठरवून त्याने अभ्यास सुरू केला. शिवाय कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊ लागला. याच काळात त्याला ललित कला केंद्राची माहिती मिळाली. त्याने प्रवेश परीक्षेचा पण अभ्यास सुरू केला. १२ वी झाल्यावर त्याने पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात प्रवेश घेतला. 

सोमनाथ आणि त्याचे आईवडील

ललित कला केंद्रात प्रवेश घेतला होता पण हॉस्टेल मिळालं नव्हतं. त्यामुळे विद्यापीठ परिसरातील वडाच्या झाडाखाली सोमनाथ झोपू लागला. काहीही झालं तरी माघार घ्यायची नाही हा पहिल्यापासून स्वभावच असल्यामुळे सोमनाथने परिस्थितीशी दोन हात केले. नाट्यशास्त्राचे धडे घेत असतानाच सोमनाथने मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या काही शॉर्टफिल्म्स मध्ये काम देखील केले. ललित कला केंद्रामध्ये त्याने अनेक नाटकांत काम केले. नाटकाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. बाकी जग विसरून तो नाटकात रमला. नाटक जगला. अनेक खडतर प्रसंगांशी लढत सोमनाथ ललित कला केंद्रातून पास आऊट झाला आणि 'आता पुढे काय?' या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्याने मुंबई गाठली.

मुंबईत सुरू होतो तो जगण्यापासूनचा खडतर प्रवास... या प्रवासात कित्येकांची हेळसांड होते, कुणी माघार घेतं, मुंबई सोडून गावाला परत जातं... पण सोमनाथ आता काहीही झालं तरी परत जायचं नाही हे ठरवूनच आला होता. मुंबई विद्यापीठातील 'अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स'ला ऍडमिशन घेऊन सोमनाथ पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेऊ लागला. मुंबई मध्ये रात्रीच्या वेळी काम करून सोमनाथ शिकू लागला. इथे शिकत असताना काही सिनेमे केले. नाटकात काम देखील केले. पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सिनेमा क्षेत्रात काम मिळवणे सोमनाथ साठी थोडे अवघड झाले. कारण मुंबईत कुणाची फार ओळख नव्हती. त्यामुळे ऑडिशन साठी हेलपाटे सुरू झाले. 

अशातच सोमनाथचे लग्न झाले. बायकोचे शिक्षण देखील सुरू होते. त्यामुळे स्वतः कमवून मुंबईतील स्वतःच्या गरजा भागवायच्या. शिवाय बायको पुण्यात राहत होती, तीला पैसे देखील पाठवायचे असा संघर्ष सुरू झाला. रात्रीच्या वेळी चहा विकून सोमनाथने हे सगळं मॅनेज केलं. दिवसा ऑडिशन साठी फिरायचं, संध्याकाळी 'रॅपिडो' ही बाईक चालवायची तर रात्री चहा विकायचा हे सगळं करत करत सोमनाथ आपल्या स्वप्नांसाठी धडपडत होता. बऱ्याचदा खिशात पैसे नसायचे त्यामुळे चालत प्रवास करायचा. 

आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी सोमनाथ इतका चालला की जास्त चालल्यामुळे आणि पायातील शूज चांगले नसल्यामुळे त्याच्या पायात गाठ तयार झाली. ऑपरेशन करावं लागलं. पण या पठ्ठ्याने ऑपरेशनच्या दुसऱ्या दिवसापासून आपल्या कामाला सुरुवात केली. काहीही झालं तरी थांबायचं नाही हाच सोमनाथचा स्वभाव होता. तो सतत कामातच राहायचा. त्याने बऱ्याच शॉर्टफिल्म मध्ये काम केलं. फिल्म्स देखील केल्या. पण स्वामी समर्थ सिरियल मध्ये त्याला थोडीफार ओळख मिळाली. काम करण्याचं आणखी बळ मिळालं.

 

अशातच त्याला "अण्णांच्या शेवटच्या इच्छा" हे नाटक मिळालं. सुरुवातीला काही प्रॉब्लेममुळे हे नाटक थांबलं. सोमनाथची निराशा झाली. कारण बऱ्याच वर्षानंतर त्याला नाटकात एक चांगला रोल मिळाला होता. नंतर काही दिवसांनी या नाटकाच्या तालमी पुन्हा सुरू झाल्या. नाटकाचे काही प्रयोग मुंबई मध्ये पार पडले आणि सोमनाथच्या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. संपूर्ण नाटकात जवळजवळ २ तास सोमनाथ सलाईन हातात घेऊन हात वर धरून उभा आहे. 

पहिला अंक झाल्यावर काही प्रेक्षक विंगेत यायचे आणि त्याचा हात दाबायचे. शिवाय नाटक झाल्यावर त्याच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक व्हायचे. हे सगळं वातावरण भारावून टाकणारं होतं. कारण सोमनाथने मुंबईतल्या मोठं नाव असणाऱ्या सगळ्या कास्टिंग कंपनीज चे उंबरे झिजवले होते. तरीही त्याला मनासारखं काम भेटलं नव्हतं. या नाटकाच्या निमित्ताने एक चांगलं काम त्याच्या पदरात आलं. त्यानं आपल्या भूमिकेवर प्रचंड कष्ट घेतलं. त्याचं फळ म्हणून झी नाट्य गौरव २०२४ मध्ये सोमनाथला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा सन्मान मिळाला. त्याचं मूळ गाव असलेल्या सोरटेवाडी च्या शाळेतील बोर्डावर सोमनाथच्या अभिनंदनाचा शुभेच्छा संदेश झळकला. 

आई वडिल, बायको, बहिणी, दाजी, मित्र,सासू- सासरे आणि सोमनाथची मुले यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे आणि घेतलेल्या मेहनतीमुळे सोमनाथच्या वाट्याला हे यश आलं. सोमनाथ लिंबरकर सारख्या एका खेडेगावातून आलेल्या सालगड्याच्या आणि शेतमजुराच्या सामान्य पोराने आपल्या कष्टाच्या जोरावर सिनेमा क्षेत्रातील मुख्य प्रवाहापर्यंत आपलं नाव पोहोचवलं. इथपर्यंत पोहचायला त्याला १९ वर्ष लागली होती, ही खरोखर सामान्य गोष्ट नाही. यासाठी सोमनाथच्या जिद्दीला सलाम करावाच लागेल. 

असे अनेक 'शेतकऱ्यांचे हिरे' वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. त्यातीलच हा एक हिरा. सोमनाथचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी ठरेल ही आशा...

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी