श्याम पुंगळे
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील लोणगाव येथील शेतकरी अनेक वर्षांपासून रताळ्याची शेती करीत आहेत. एक-दोन नव्हे तर गावातील प्रत्येक शेतकरी आपल्या शेतातील २ ते ४ एकरपर्यंत आणि ज्यांच्याकडे कमी शेती आहे ते किमान १० गुंठे, ५ गुंठ्यांमध्ये रताळ्याची शेती करतात. त्यामुळेच आता लोणगाव हे रताळ्याचे आगार म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. एका एकरात शंभर ते सव्वाशे क्विंटल रताळ्याचे उत्पादन येथील शेतकरी घेत असून सध्या व्यापारी बांधावर येऊन १८०० ते २००० रुपये क्विंटलप्रमाणे खरेदी करीत असल्याचे शेतकरी बंटीआप्पा तवले यांनी सांगितले.
लोणगाव येथील शेतकरी अनेक वर्षांपासून रताळ्याची शेती करीत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने पोषक असणाऱ्या रताळाची उपवासाच्या दिवशी फराळ म्हणून मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. सध्या शेतकऱ्यांचा रताळ्यांचा हंगाम सुरू झाला असून, लोणगाव येथील शेतकरी रताळे काढण्यात व्यस्त आहेत. महाशिवरात्रीला बाजारात मोठ्या प्रमाणात रताळ्याची मागणी असते. त्यातून लाखोंची उलाढाल होते. गतवर्षीपेक्षा काही प्रमाणात समाधानकारक भाव असल्याने शेतकऱ्यांत उत्साह असला तरी पावसाअभावी उत्पादनात घट झाल्याने नाराजीचा सूर आहे.
लोणगाव येथील शेतकरी साधारणतः जून-जुलै महिन्यात रताळ्याची लागवड करतात. उपवासाच्या दिवशी फराळ म्हणून बाजारात रताळ्यास मोठी मागणी असते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून महाशिवरात्रीला रताळ्यांची काढणी केली जाते. रताळे हे पीक कमी खर्चात आणि कमी वेळेत हलक्या प्रतीच्या भुसभुशीत जमिनीत उत्तम प्रकारे येते. खरीप हंगामात पावसाळ्यात या पिकाला पाणी भरण्याची देखील गरज भासत नाही. पीक व्यवस्थापन खर्चही कमी असतो. उत्पन्नही बऱ्यापैकी एकरी लाखभर रुपयांहून अधिक होते. बाजारभाव मिळाल्यास यातून शेतकऱ्यास याहून अधिक आर्थिक फायदा होतो म्हणून लोणगाव येथील शेतकरी रताळ्याची मोठ्या प्रमाणात लागवड करतात.
यंदा उत्पादनात घट मात्र बाजारभाव समाधानकारक
दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही रताळे पिकाची लागवड केली होती. यावेळी एका एकरात शंभर ते सव्वाशे क्विंटल रताळ्याचे उत्पादन झाले. सध्या व्यापारी बांधावर येऊन १८०० ते २००० रुपये क्चिंटलप्रमाणे खरेदी करीत आहे. गतवर्षीपेक्षा दर समाधानकारक आहेत. परंतु, पावसाअभावी उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे उत्पादन कमी निघाल्याने दरात सुधारणा झाली आहे. - बंटीआप्पा तवले, शेतकरी, लोणगाव
यावर्षी रताळ्यांसाठी समाधानकारक भाव
१. रताळे काढणीस आले की त्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते. व्यापारी शेतकयांच्यात बांधावर येऊन रताळ्याची खरेदी करतात. काही शेतकरी स्वतः बाजारपेठेत जाऊन किरकोळ पद्धतीने विक्री करतात. बहुतांश शेतकरी व्यापाऱ्यांना ठोक भावात रताळ्याची विक्री करतात. यंदा पावसाने दडी मारल्याने रताळ्यांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.
२. गेल्या वर्षीपेक्षा भाव समाधानकारक असला तरी उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. महाशिवरात्री दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने अहमदनगर, केज, धारूर, छत्रपती संभाजीनगर भागातील व्यापारी रताळे खरेदीसाठी येत आहेत. सध्या लोणगावमध्ये मजुरांच्या साह्याने रताळे काढणीची एकच धावपळ सुरू आहे.