Join us

अद्रक वॉशिंग सेंटरच्या माध्यमातून दिला ४०० जणांना रोजगार; शेतकऱ्याने शोधला स्वउद्योग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 10:00 AM

चिंचखेड येथील शेतकऱ्याची यशोगाथा

नसीम शेख 

नोकरीच्या मागे न लागता अनेक तरुणांनी स्वकर्तृत्वाने रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेतल्या आहेत. जालना जिल्ह्यातील टेंभुर्णीपासून जवळ असलेल्या विदर्भातील चिंचखेडा (ता. देऊळगावराजा) येथील युवा शेतकरी सतीश वायाळ यांनी शिक्षणानंतर अद्रक पिकातून भविष्याचा वेध घेतला आहे. त्यांनी त्यात आपला रोजगार तर शोधलाच मात्र इतरही अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

मागील वर्षापासून त्यांनी टेंभुर्णी येथे टेंभुर्णी - जाफराबाद रोडवरील गोंधनखेडा शिवारात आपल्या मालकीचे अद्रक वाशिंग सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी दररोज जवळपास ४० ते ५० टन अद्रकची आवक होते. त्यासाठी वायाळ यांनी जवळच्या मध्य प्रदेश राज्यातून अद्रक काढणारे खास मजूर उपलब्ध करून दिले आहेत. सध्या या उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी ४०० ते ४५० मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

शेतकऱ्याची अद्रक जागेवर खरेदी करून ती धुण्यापासून ट्रान्सपोर्टिंग आणि विक्रीची सर्व जबाबदारी वायाळ हे स्वतः सांभाळत असतात. या माध्यमातून त्यांना चांगला रोजगार मिळत असून, यासोबतच इतरांनाही रोजगार उपलब्ध करून दिल्याचे समाधानही मिळत आहे. अद्रकसाठी शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा या माध्यमातून उपलब्ध होत असल्याने सध्या शेतकऱ्यांचा कल अद्रक पिकाकडे अधिक वाढला आहे.

जाफ्राबाद तालुक्यात सध्या सोनखेडा, देऊळगाव उगले, सोनगिरी, काळेगाव, बुटखेडा, अकोला, खामखेडा आदी भागात मोठ्या प्रमाणावर अद्रकचे उत्पादन घेतल्या जात आहे. या अद्रक सेंटरवर जालना जिल्ह्यासह परिसरातील बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यातून ही अद्रक उपलब्ध होत आहे.

सुविधा नसल्याने अद्रक पिकाबाबत उदासीनता

अद्रकसाठी साधी जमीन लागत असूनही आवश्यक त्या सुविधा मिळत नसल्याने शेतकऱ्यात या पिकाबाबत मोठी उदासीनता होती. मात्र, या वॉशिंग सेंटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्व सुविधा मिळत असल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी सध्या अद्रक पिकाकडे वळले आहे.

सध्या अद्रकला चांगला भाव असल्याने एकरी दहा ते बारा लाखाचे उत्पन्न शेतकरी घेत आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता छोट्या- मोठ्या उद्योगात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेतल्या पाहिजे. या माध्यमातून इतरांनाही रोजगार उपलब्ध करून दिल्याचे समाधान वाटते. - सतीश वायाळ, शेतकरी

हेही वाचा - पंढरपूरी म्हैस भारी; दुग्ध व्यवसायातून एका दिवसाला १५ हजार रुपये कमाई

टॅग्स :पीक व्यवस्थापनशेतकरीशेतीमराठवाडाव्यवसाय