रऊफ शेख
फुलंब्री तालुक्यातील मारसावळी गावातील महिलांनी सौर वाळवणी यंत्राच्या माध्यमातून रोजगाराचा मूलमंत्र शोधला असून, ४५ महिला या बळावर आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत.
फुलंब्री तालुक्यातील पिरबावडापासून काही अंतरावर डोंगरावर वसलेले मारसावळी हे तीन हजार लोकसंख्येचे गाव महिला सक्षमीकरणामुळे चर्चेत आले आहे. या गावातील महिला पूर्वी मजुरीसाठी इतर गाव शिवारात जात होत्या. त्यांना कधी काम मिळत असे, तर कधी कामासाठीही परगावी भटकंती करावी लागत होती. सायन्स फॉर सोसायटी या संस्थेने २०१९ मध्ये या गावात येऊन पाहणी केली व महिलांचे होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उपयोजना सुरू केल्या.
प्रारंभी गावातील पाच महिलांना सौर ऊर्जा यंत्र दिले. यात धातूच्या प्लेट सूर्याची ऊर्जा एकत्र करून त्यात ७५ अंश ऊर्जा निर्माण करीत त्यावर भाजीपाला सुकविण्याचे काम उपलब्ध करून दिले. यासाठी त्यांना प्रशिक्षण दिले. या कामातून ५ महिलांना महिन्याला दोन हजार मिळत होते. या ५ महिलांनी या कामात स्वतःला झोकून देत चांगले काम केले. त्यामुळे सायन्स फॉर सोसायटी या संस्थेने आणखी ४० महिलांना हेच काम उपलब्ध करून दिले. या सर्व ४५ महिला आजघडीला महिन्याला १० ते १२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.
या गावातील अनेक महिलांना घरी सोलार ड्रायर, एफबीडी फॉन मशीन, भाजीपाला कापणारी मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या महिला सकाळी घरकाम आटोपल्यानंतर दररोज दोन ते तीन तास कांदा, लसूण, अद्रक, टोमॅटे यांच्यावर प्रक्रिया करून त्यांना सुकवून कट्टे तयार करतात. तयार झालेला सुका माल संबधित कंपनी गावात येऊन रोख रक्कम देऊन विकत घेते.
रोज साडेबारा हजारांचे उत्पन्न
गावातील ४५ महिला दररोज एक क्विंटल सुक्या भाजीपाल्यावर प्रक्रिया करून एका दिवसाला साधारणतः साडेबारा हजार रुपयांचे उत्पन्न मिळवतात.
या माध्यमातून दर महिन्याला ३ लाख ७५ कुटुंबाचे कर्ज फेडून मुलांच्या शिक्षणाला हातभार लावता हजार रुपये गावात येतात. यातून गावात आर्थिक उलाढाल वाढली आहे.
सायन्स फॉर सोसायटीचे सहकार्य मिळाल्यानंतर २०१९ मध्ये भाजीपाला प्रक्रियेस करण्यास सुरुवात केली. प्रारंभी अडचणी आल्या; परंतु आता सर्व काही सुरळीत सुरू आहे. या कामातून माझ्या कुटुंबाचे कर्ज फेडून मुलांच्या शिक्षणाला हातभार लावता आला. तसेच घरखर्चासाठी पैसे उपलब्ध होत आहे.- कविता चंद्रकांत गाडेकर, मारसावळी
घरबसल्या मिळाले हाताला काम
तीन वर्षापूर्वी मजुरी करण्यासाठी जात होते; पण आता घरबसल्या हाताला काम मिळाले आहे. हा व्यवसाय घरातच करायचा असल्याने कुटुंबाला हातभार लागला व महिन्याला पैसे मिळत असल्याने घरखर्चाची चणचण मिटली आहे.
- रेखा अशोक दुधे, मारसावळी