Join us

नैसर्गिक शेती अन् भाजीपाला विकून शेतकऱ्याची महिन्याला लाखोंची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 8:28 PM

नैसर्गिक शेती अन् भाजीपाला विकून शेतकऱ्याची महिन्याला लाखोंची कमाई

- रविंद्र शिऊरकर

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्याती आठेगाव - खेडा येथील एक शेतकरी केवळ भाजीपाल्याच्या विक्रीतून लाखो रूपयांची कमाई करत आहे. अजय जाधव असं या शेतकऱ्याचे नाव असून ते रासायनिक शेतीचे दुष्परिणाम, मातीची होणारी हानी, रासायनिक प्रक्रियेतून निर्माण झालेले अन्न खाऊन होणारे विविध आजार यावर उपाय आणि बदल म्हणून २०११ पासून पूर्णपणे नैसर्गिक शेती कडे वळाले आहेत. 

दरम्यान, या शेतीसाठी त्यांनी ताग, ढेंचा, चवळी यांचे हिरवळीचे पिके घेऊन त्यांना जमिनीत दाबले. त्यातून मातीची सुपीकता वाढली आणि उत्पन्न क्षमता अधिक झाली. त्यानंतर त्या जमिनीत वेलवर्गीय भाजीपाला, फळे, कंदवर्गीय भाजीपाला, डाळवर्गीय पिके, तेलबिया, फुले, औषधी वनस्पती आदींची पिके जाधव घ्यायला लागले. उर्वरित क्षेत्रात ऊसाचे पारंपरिक पीक होतेच पण नैसर्गिक शेतीवर करायला लागल्याने आता अवघ्या तीन ते चार पाण्यात जाधव यांच्याकडे ऊस निघतो. सोबतच एकरी ६० क्विंटल उत्पन्न मिळतं. जमिनीतील सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी दरवर्षी नांगरणी न करता पाच वर्षांतून एकदा सहा इंचाची नांगरणी ते करतात.

भाजीपाला विक्रीसाठी केली वेगळी व्यवस्थाभाजीपाला बाजारात कमी किंमतीत न विकता ठराविक ग्राहक तयार करून त्यांना द्यावा या संकल्पनेतून २०१२ मध्ये सुरुवातीला आजपासच्या परिसरात व छत्रपती संभाजीनगर शहरात अवघे ७ ग्राहक हा भाजीपाला घ्यायला तयार झाले. पुढे हा भाजीपाला घेण्यासाठी ५० जणांकडून मागणी आली. या माध्यमातून आज हजारो ग्राहक जाधव यांनी निर्माण केले आहेत. विविध व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्यावर उपलब्ध मालाची माहिती दिली जाते, ज्यातून जाधव यांच्या शेतातून तर कधी घरपोच अशी अवघ्या काही तासांत शेतमालाची विक्री होते.

पारिजात बीज बँक आपल्याकडील नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या भाजीपाल्याचे बीज हे जाधव यांनी साठवायला सुरुवात केली. कालांतराने ओळख वाढल्यानंतर लोकांनी आणि विविध संस्थानी जाधव यांच्या शेतात भेटी द्यायला सुरुवात केली. यात भारतीय किसान संघ व आर्ट ऑफ लिव्हिंग यांनी मार्गदर्शन व सहकार्य केल्याचं जाधव सांगतात. त्यांनी तब्बल ३५० देशी रानभाज्या, फळ, फुल, यांनी बीजे साठवली असून त्यांची पुनर्निर्मिती करत ते त्या बीजांची विक्री देखील करतात. यात त्यांनी दुर्मीळ असलेल्या कापूर तुळस, काळे गाजर, पिवळा हदगा, सुरण कंद, लाल भेंडी, लाल केळी, चकरी टोमॅटो, चुहा कारले, कुहिरी, विधारा, लाल मुळा, काळे बटाटे, आस्मनतारा तुळस आदींसह एकूण ३५० बिजे साठवलेली आहे. 

बीज पुनर्निर्मिती व विक्री व्यवस्थापन बीजांची पुननिर्मिती करण्यासाठी जाधव हे बीज आपल्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अल्प दरात विक्री करतात. ज्यातून येणारे पुर्ननिर्मित बीजांची खरेदी देखील जाधव बाजारभावापेक्षा अधिक दराने करतात व शेतकऱ्यांना देखील योग्य ठिकाणी विक्री करून चांगला मोबदला मिळण्यासाठी मार्गदर्शन करतात. विक्री व्यवस्थापनात कवडीमोल दरात भाजीपाला न विकता त्यांचे बीज करून ते ५०-१०० ग्रॅम मध्ये विकले तर अधिक पैसे मिळतील पण फुकट विकायचे नाही तर त्या ऐवजी प्रक्रिया करून विक्री करा असा सल्लादेखील जाधव देतात.

शासन दरबारी नोंद व सन्मान जाधव यांना २०२० साली गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते गो-आधारित नैसर्गिक शेतीसाठी कृषिभूषण हा पुरस्कार व रोख रक्कम स्वरूपात सन्मान मिळाला असून त्यानंतर महाराष्ट्र शासनाने २०२१ साली सेंद्रिय शेती कृषिभूषण हा सन्मान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते जाधव यांना दिला. ज्याचे स्वरूप पुरस्कार व रोख रक्कम असे होते. तसेच देश विदेशातील शेकडो कृषी शास्त्रज्ञ, अभ्यासक, संशोधक आदींनी जाधव यांच्या कडे भेटी देत त्यांना आपापल्या भागात निमंत्रित करून त्यांचे विविध उपाधिनिशी सत्कार केले आहे. 

शेतकऱ्यांनी आपल्याकडील पूर्ण शेत एकाच वेळी नैसर्गिक शेतीत रुपांतरीत न करता केवळ आपल्या घरच्या गरजेएवढी शेती नैसर्गिक रित्या पिकवून त्यातील भाजीपाला, डाळ, फळे खावीत ज्यातून होणाऱ्या बदलांमुळे पुढे तो शेतकरी आपोआप नैसर्गिक शेती कडे वळेल आणि यातून शेतकरी सुखी आणि समृद्धी होईल. - कृषीभूषण अजय जाधव 

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरी