Join us

रेठरे हरणाक्ष येथील शेतकऱ्याने दीड एकरामध्ये घेतले ३० टन सातारी आल्याचे विक्रमी उत्पादन.. वाचा सविस्तर यशोगाथा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 2:18 PM

पपई, केळी, कलिंगड, ऊस, आणि झुकिनी या पिकांचे विक्रमी उत्पन्न घेऊन सतत नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील युवा शेतकरी सुहास राजाराम पवार यांनी दीड एकरात सातारी आल्याचे ३० टन उत्पन्न घेऊन ३० लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.

निवास पवारशिरटे : पपई, केळी, कलिंगड, ऊस, आणि झुकिनी या पिकांचे विक्रमी उत्पन्न घेऊन सतत नाविन्यपूर्ण प्रयोग करणारे रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा) येथील युवा शेतकरी सुहास राजाराम पवार यांनी दीड एकरात सातारी आल्याचे ३० टन उत्पन्न घेऊन ३० लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. या युवा शेतकऱ्याने इतरांपुढे एक नवा आदर्श ठेवला आहे.

आले पीक बेभरवशाचे, परंतु सुहास पवार यांनी गेल्या आठ वर्षांपासून आले पिकाच्या लागवडीत सातत्य ठेवले. यावेळी आले लागवड करण्यापूर्वी त्यांनी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे लूज कंपोस्ट खत शेतात विस्कटून नांगरट केली.

आले लागण करण्यापूर्वी डी.ए.पी., पोटॅश, कॉम्बिफेंक ही रासायनिक खते, दुय्यम अन्नद्रव्ये, तसेच निंबोळी पेंड, करंजी पेंड, एम ४५, ब्ल्यू कॉपर, रिझल्ट अल्ट्राचा वापर करून बेसल डोस दिला. कंद कुजू नयेत याकरिता ट्रायकोड्रामा वापरला व लावणीनंतर दहा दिवसांनी तणनाशकची फवारणी केली.

प्रत्येक महिन्यातून एकदा ठिबकद्वारे गंधक व प्रत्येक आठव्या दिवशी पिकांच्या वाढीनुसार विद्राव्य खते ठिबकद्वारे देण्यात आली. पिकांची पूर्ण वाढ झाल्यानंतर रोटरद्वारे पहिली भर लावण्यात आली. त्यावेळी एकरी तीन पोती १०:२६:२६ या रासायनिक खताची मात्रा दिली.

पिकाच्या पूर्ण वाढीनंतर साडेतीन महिन्यांतच दुसरी भर व बेसल डोस दिला. वातावरणानुसार प्रत्येक आठवड्याला करपा, आळी व कंदमाशी नियंत्रणासाठी बुरशीनाशके व कीटकनाशकांची फवारणी केली.

रासायनिक खतांबरोबरच गोमूत्रापासून तयार केलेली जिवाणू स्लरी ठिबकद्वारे देण्यात आली. कृषी महाविद्यालयातील मार्गदर्शक प्रा. अजित पवार यांच्या प्रभाती बायो फर्टीलायझरचा खेकडा अर्क, फिश अर्क व दशपर्णी अर्क यांचा वेळोवेळी वापर केला.

आले पीक काढणीनंतर शेतकऱ्यांना जागेवरच बियाणे म्हणून विकले असून, त्याचा दर प्रतिकिलो ११० रुपयांप्रमाणे मिळाला. बाजारपेठेत न जाता संपूर्ण आले पिकाची विक्री शेतामधूनच केली.

पलूस येथील प्रगतशील द्राक्ष बागायतदार आणि महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायत संघाचे संचालक प्रदीप पाटील यांना त्यांनी आपले कृषी क्षेत्रातील गुरु मानले आहे. त्यांच्यासह प्रा. अजित पवार व अनिल गायकवाड (इंदोली) यांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांच्या बरोबरच पत्नी प्राध्यापिका स्नेहल पवार यांचे प्रोत्साहन मिळाले आहे.

गेल्या आठ वर्षांपासून मी आल्याचे पीक घेत आहे. दहा ते पंधरा रुपये किलो दरापासून ते आज ११० रुपये प्रतिकिलो प्रमाणे दराचा चढ-उतार प्रत्यक्ष अनुभवला. पिकात तडजोड व खचून न जाता सातत्य ठेवल्यामुळेच आज हे उच्चांकी उत्पन्न मिळाले आहे. - सुहास पवार, प्रगतशील शेतकरी, रेठरे हरणाक्ष (ता. वाळवा)

अधिक वाचा: Success story: बाजारातील अचूक वेळ साधत सखाराम यांनी केली काकडीची शेती.. वाचा किती मिळाला नफा

टॅग्स :शेतकरीशेतीपीकपीक व्यवस्थापनसांगली