सुरेंद्र शिराळकर
आष्टा : आष्टा (ता. वाळवा) येथील सुधीर ऊर्फ विजय शिंदे या शेतकऱ्याने एकरात दोडक्याची लागवड केली आहे. त्यातून अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवलं. किलोमागे ३० ते ३५ रुपयांपर्यंत दर मिळत असल्यामुळे शेतकरी अधिक खूश आहेत.
एक एकरामध्ये सुमारे १० टनांचे उत्पादन मिळणार आहे, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली आहे. आष्टा व परिसरातील बाजारपेठेत सुधीर ऊर्फ विजय शिंदे हे दररोज २०० ते २५० किलो दोडक्याची विक्री करीत आहेत.
दोडका तीनशे रुपये १० किलो याप्रमाणे विक्री करण्यात येत आहे. तीन महिन्यांत सुमारे अडीच लाखांचे विक्रमी उत्पादन मिळणार आहे. सुधीर शिंदे यांचे आष्टा ते बावची रस्त्यावरील एक एकर शेतात २५ ऑगस्ट रोजी 'माला एफ वन' दोडक्याची लागवड केली.
पाच फूट बाय अडीच फुटांवर दोडक्याच्या शेतातच पुन्हा दोडक्याची लागवड केली. मल्चिंग पेपर, काठी, तार यांचा खर्च वाचला. 'ठिबक'ने पाणी देण्यात येत असून पाण्यात विरघळणारी रासायनिक व सेंद्रिय खते देण्यात येत आहेत.
सेंद्रिय खतावर सर्वाधिक भर दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. लागवडीनंतर सुमारे दीड महिन्यानंतर दोडका येण्यास सुरुवात झाली. दररोज २०० ते २५० किलो उत्पन्न निघत असून दहा किलोला तीनशे रुपये दर मिळत आहे.
सरासरी प्रतिकिलो ३० ते ३५ रुपये दर मिळत आहे. आष्टा, बागणी, कवठेपिराण येथील व्यापारी बांधावरूनच दोडका घेऊन जात आहेत. चार ते पाच टन उत्पादन मिळाले असून अजून पाच टन उत्पादन मिळेल.
तीन महिन्यांत एकरी सुमारे १० टन उत्पादन मिळेल, असा अंदाज असल्याचे शिंदे यांनी सांगितले. यापासून अंदाजे अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असून ५० हजार खर्च वजा केल्यास एकरी दोन लाखांचे उत्पादन मिळणार आहे. शेतीच्या कामामध्ये आई व पत्नीचे सहकार्य मिळत आहे.
उसापेक्षा भाजीपाला फायदेशीर : सुधीर शिंदे
दोडक्यावर फवारणीसाठी जपानी तंत्रज्ञानावर आधारित केंगिन पाण्याची पीएचनुसार औषध फवारणी केल्याने ऑक्सिजन समृद्ध पाणी मिळाले आहे. प्रकाश संश्लेषणाची क्रिया वेळेत होऊन फुलकळी फुलली आहे. सूक्ष्म अन्नद्रव्य खते मिळाल्याने पिकाची चांगली वाढ झाली आहे. ऊस व केळीसोबतच कोबी, फुलकोबी, टोमॅटो, दोडका यांचे मागील दहा वर्षांपासून उत्पादन घेत आहे. गतवर्षीही दोडका केला असून उत्पादन चांगले मिळाले आहे. उसापेक्षा भाजीपाला पिकातून चांगला फायदा होत आहे, अशी प्रतिक्रिया प्रगतशील शेतकरी सुधीर ऊर्फ विजय शिंदे यांनी दिली.
अधिक वाचा: Livestock Management : गाई म्हशीतील असंसर्गजन्य गर्भपात कशामुळे होतो आणि तो कसा टाळावा? वाचा सविस्तर