Join us

दुचाकीवर दररोज ८० ते ९० किलोमीटरचा प्रवास करत शेतकऱ्यांच्या पशुधनास जीवदान देणारी महिला पशुवैद्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 10:18 AM

डॉ. चैत्राली आव्हाड-क्षीरसागर या जिथे पुरुष डॉक्टरांना सेवा देण्यात अडचणीचे वाटते, तिथे या महिला पशुवैद्यक म्हणून यशस्वीपणे काम पाहत आहेत.

बापू नवलेकेडगाव : दौंड तालुक्यातील केडगाव येथील तालुका दर्जेच्या पशुसंवर्धन दवाखान्यात श्रेणी १ पदावर महिला पशुवैद्य गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत आहेत.

डॉ. चैत्राली आव्हाड-क्षीरसागर या जिथे पुरुष डॉक्टरांना सेवा देण्यात अडचणीचे वाटते, तिथे या महिला पशुवैद्यक म्हणून यशस्वीपणे काम पाहत आहेत. वाड्या वस्त्यांवर क्लिष्ट शस्त्रक्रियांसह पशुधनास औषधोपचार करून त्याना जीवदान देत आहेत.

उच्च शिक्षणामुळे त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या जनावरांना अक्षरशः तारले आहे. डॉ. चैत्राली आव्हाड यांना पशुंच्या गंभीर आजारांवर तातडीच्या इलाजासाठी दुचाकीवर सरासरी ८० ते ९० किलोमीटरचा दररोज प्रवास करावा लागतो.

औषधोपचार व लसीकरणाचे नियमित कामेही त्या वेळेवर करतात. सर्व वैद्यकीय साधनांसह दुचाकीवर प्रवास करणे हे अत्यावश्यक सेवेतील सर्वांत जिकिरीचे काम आहे, पण त्या न डगमगता आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडत आहेत.

बोरीपार्धी, धायगुडेवाडी, चौफुला, केडगाव, केडगाव स्टेशन, हंडाळवाडी पाटील निंबाळकर वस्ती, धुमळीचा मळा, देशमुख मळा, वाखारी परिसरात नियमित पशुधनाच्या आरोग्यासाठी त्या भेटी देत असतात.

या परिसरात दहा हजारांहून अधिक गाई-म्हशी, आठ हजारांहून अधिक शेळ्या-मेंढ्या आणि इतर जनावरे सुमारे दोन हजार आहेत. परिसरातील २७ पशुवैद्यकीय दवाखान्यांना लस व औषधे पुरवण्याचे कामदेखील त्याना करावे लागते.

चौफुला येथील बोरमलनाथ गो-शाळेच्या शेकडो गोधानावर त्या मोफत उपचार करतात. महिला पशुपालकांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देतात.

शेतकरी प्रशिक्षण, वंध्यत्व निवारण शिबिर, आरोग्य शिबिरांचे आयोजन वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली करतात. त्या महिला पशुवैद्यक नव्हे; तर पशुपालकांच्या तारणहार आहेत, अशी भावना परिसरातील पशुपालक व्यक्त करतात.

यामुळे पशुपालकांचा विश्वासगेल्या तीन वर्षात त्यांनी सुमारे २०० अधिक क्लिष्ट शस्त्रक्रिया आणि हजारो नियमित शस्त्रक्रिया केल्या आहेत. जनावरांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, हाडांचे आजार, कर्करोग निदान आदी पशुधनाच्या आजारांवरील यशस्वी उपचारांमुळे त्याच्यावर पशुपालकांचा मोठा विश्वास बसला आहे.

टॅग्स :दुग्धव्यवसायगायमहिलाडॉक्टरसरकारशेतकरी