नासीर कबीरकरमाळा : करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील उच्च शिक्षित शेतकरी विजय नामदेव जगदाळे व पत्नी प्रियंका विजय जगदाळे या दाम्पत्याने जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर दीड एकर तैवान पिंक पेरू लागवडीतून पहिल्याच वर्षी २४ लाख २० हजार रुपयांचे उत्पादन घेतले आहे.
उजनी लाभक्षेत्रात वारंवार ऊसाचे एकच पीक घेतल्याने उत्पन्नात होणारी घट, पिकासाठी लागणारा जास्तीचा कालावधी, खतांचा वाढलेला खर्च, गाळपासाठी होणारा त्रास त्यामुळे जगदाळे यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत पेरू लागवडीचा निर्णय घेतला.
मार्च २०२३ मध्ये तैवान पिंक या जातीच्या १५५० रोपांची दीड एकर क्षेत्रावर दोन ओळीत ८ फूट व दोन रोपात ५ फूट अंतर ठेवून शेणखत व रासायनिक खत वापर करून लागवड केली.
लागवडीपासून विक्रीपर्यंत ५ लाख ५० हजार रुपये खर्च आला. १८ महिन्यांत विक्रीसाठी आलेल्या पेरूची शेताच्या बांधावरच ५० रुपये ते ८५ रुपये प्रतिकिलो दराने मुंबई, पुणे येथील व्यापाऱ्यांना मालाची विक्री केली.
एकूण ३६ टन मालाच्या विक्रीतून २४ लाख २० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. रोगापासून पेरूचे संरक्षण करण्यासाठी क्रॉप कव्हर व प्लास्टिक बॅगचा वापर केला, त्यामुळे गुणवत्ता व दर्जा चांगला राखण्यात यश मिळाले आहे.
जगदाळे यांनी योग्य व्यवस्थापन व कमी कालावधीत घेतलेले भरघोस उत्पन्न त्यामुळे त्यांची शेती परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत आहे.
जीवामृत ठरले वरदान● देशी गाईचे शेण, गोमूत्र गूळ, कडधान्याचे पीठ यांचे प्रमाणानुसार व्यवस्थित मिश्रण करून वस्त्रगाळ करून दर आठ दिवसाला ठिबकच्या सहाय्याने झाडांना दिले. दीड एकर बागेला सहा टेलर शेणखताचा वापर केला.● जीवांमृतामुळे जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंची संख्या, सेंद्रिय कर्ब, जमिनीतील कार्बन वाढण्यास मदत झाली. त्यामुळे झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून झाडाची योग्य वाढ, फुलांचे प्रमाण व पर्यायाने उत्पादनात वाढ झाली.
बारामती, पुणे येथील कृषी मेळाव्याला उपस्थित राहून व यशस्वी पेरू बागायतदारांच्या प्लांटला भेट देऊन त्यातील बारकावे जाणून पेरू लागवडीचा निर्णय घेतला. बाजारपेठेचा अंदाज घेत फळ छाटणी करून बहर घेत पहिल्याच वर्षी भरघोस उत्पन्न निघाले. - विजय जगदाळे, वाशिंबे, ता. करमाळा
अधिक वाचा: सलग पाच वर्षे सरासरी एकरी ४२ क्विंटल हळद उत्पादन घेऊन या युवा शेतकऱ्याने केला विक्रम