सचिन मोहिते
देवरुख : उच्च शिक्षण घेऊन पुण्यात एका मोठ्या कंपनीत हुद्यावर कार्यरत असूनही, जीवनातील नेहमीची शैली सोडून मूळचे आकर्ष कुमार बिहार येथील पाटणा शहरात राहणाऱ्या आकर्ष कुमार यांनी देवरुख गाठले.
देवरुखच्या लाल मातीतील शेतशिवाराच्या ते प्रेमात पडले आहेत. एवढेच नव्हे तर शेतात विविध प्रयोग करुन त्यांनी लाल मातीत लाल रंगाची भेंडी पिकवण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे.
आकर्ष कुमार देवरुखच्या तीन ठिकाणी शेती करत आहेत. ते फक्त ऑर्गेनिक शेतीपुरते मर्यादित न राहता, त्याहन पढे जाऊन नैसर्गिक शेतीच्या प्रयोगात मग्न आहेत.
नैसर्गिक पद्धतीने बियाणे वापरणे, रासायनिक खतांपासून दूर राहणे आणि मातीची जिवंतता टिकवणे हाच त्यांचा उद्देश आहे.
सर्वसाधारणपणे कोकणातून तरुण पिढी बाहेर पडून नोकरी व्यवसायाकडे वळते. पण त्याच वेळी बिहारहून कोकणात आलेले आकर्ष कुमार यांनी आपल्या नोकरीचा त्याग करून शेतीत रमले आहेत.
या लाल मातीत त्यांनी विविध देशी वाण पिकवून, नैसर्गिक शेती करून त्यांची जीवनशैली आरोग्यसंपन्न केली आहे. लाल मातीतील लाल भेंडी हे त्यांचे प्रेमाचे प्रतीक आहे.
त्यांनी उत्पन्नापेक्षा संस्कृती आणि पद्धतीवर भर दिला आहे. त्यांच्या प्रेरणेने कोकणातील आणि अन्य शेतकरीही देशी बियाणे वापरून नैसर्गिक शेतीकडे वळू शकतील आणि उत्पन्न घेऊ शकतील, अशी आशा आहे. नोकरीच्या मागे धावणाऱ्या तरुणांना आकर्ष कुमार यांनी नवा आदर्श ठेवला आहे.
स्वतःला लागणारी गोष्ट शेतातच पिकवायची
कोकण म्हणजे स्वर्गच आहे. पण त्याचा खरा आनंद तो प्रत्यक्षात जगल्यावरच मिळतो. त्यामुळेच आकर्ष कुमार या मातीशी एकरूप झाले आहेत. त्यांनी ठरवले आहे की, स्वतःसाठी लागणारी प्रत्येक गोष्ट आपल्या शेतातच पिकवायची आणि ते आरोग्यसंपन्न अन्नधान्य वापरायचे. त्यांच्या शेतीचा उद्देश फक्त उत्पन्न नव्हे, तर आरोग्यसंपन्न जीवनशैली आहे.