Join us

हॉटेल व्यावसायिक बनला यशस्वी शेतकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 3:40 PM

शेतीची आवड असलेले शेतकरी पर्याय शोधून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. त्यापैकीच मालगुंड येथील नितीन अभ्यंकर नितीन हे हॉटेल व्यावसायिक आहेत. जमीन पडीक न ठेवता त्यांनी ती लागवडीखाली आणली आहे.

वन्यप्राण्यांचा उपद्रव, नदीचे पाणी शिरून होणारे नुकसान यामुळे अनेक शेतकरीशेती न करता जमीन ओसाड ठेवू लागले आहेत. परंतु शेतीची आवड असलेले शेतकरी पर्याय शोधून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. त्यापैकीच मालगुंड येथील नितीन अभ्यंकर नितीन हे हॉटेल व्यावसायिक आहेत. जमीन पडीक न ठेवता त्यांनी ती लागवडीखाली आणली आहे.

खरिपात भात लागवड प्रामुख्याने सर्वत्र केली जाते. मात्र बदलत्या हवामानामुळे भातशेती खर्चिक झाली असून, अपेक्षित उत्पन्नही मिळत नाही. त्यामुळे नितीन यांनी झेंडू लागवड केली आहे. गेली तीन वर्षे ते झेंडू लागवड करीत असून, उत्पन्न चांगले मिळते असे त्यांनी सांगितले. नितीन यांनी १६ गुंठे क्षेत्रावर झेंडू लागवड केली आहे. त्यासाठी पन्हाळा येथील नर्सरीतून रोपे आणून लागवड केली आहे. त्यासाठी त्यांनी कलकत्ता मारीगोल्ड या वाणाची निवड केली आहे. केशरी व पिवळ्या रंगाचा झेंडू लावला आहे.

जमिनीची नांगरणी करून वाफे तयार करून त्यावर प्लास्टिक मल्चिंग पेपरचे आच्छादन केले जाते. मल्चिंगमुळे तण उगवत नसल्याने तण काढणीच्या खर्चाची बचत होते. लागवडीनंतर दोन ते अडीच महिन्यात झेंडूची काढणी सुरू होते. त्यामुळे गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत झेंडूचे उत्पादन मिळेल या पद्धतीने नितीन यांनी लागवड केली आहे. गणपतीपुळे, मालगुंड, जाकादेवी तसेच रत्नागिरीत झेंडू विक्री करीत आहेत. यावर्षी अडीच ते तीन टन झेंडू उत्पादन अपेक्षित असल्याचे नितीन यांनी सांगितले.

झेंडू काढणीनंतर मिरची, कोबी, फ्लॉवर लागवड करण्यात येते. गतवर्षी ३५० ते ४०० किलो कोबीचे उत्पादन मिळाले होते. लाल मातीत फ्लॉवरही चांगला होतो. हिरव्या मिरचीलाही चांगली मागणी असल्याने 'सीतारा गोल्ड' या वाणाची निवड ते करीत आहेत. नर्सरीतून रोपे आणून लागवड करीत आहेत. ८० ते ८५ दिवसात मिरची उत्पादन सुरू होते. मिरचीला दरही चांगला मिळत असल्याचे नितीन यांनी सांगितले.

कोकणच्या लाल मातीतही पोषक गुणधर्म आहेत. त्यामुळे पिके चांगली येतात, शिवाय उत्पादनाचा दर्जाही चांगला असतो. मात्र त्यासाठी नियोजन व कष्ट करण्याची तयारी आवश्यक आहे. आधुनिक तंत्राचा वापर केला तर खर्चही कमी होतो. नितीन यांनी अभ्यास पूर्वक झेंडू, मिरची लागवड करत आहेत. कोबी, फ्लॉवरचीही लागवड करीत असल्याने चांगले अर्थार्जन होत असल्याने त्यांनी सांगितले. वडील, मुलगा यांची शेतीच्या कामासह काढणी व विक्रीसाठी मदत होत आहे.

लक्ष्मीपूजनापर्यंत झेंडू विक्री शक्यनितीन यांनी योग्य नियोजन करूनच झेंडू लागवड केली आहे. त्यामुळे लक्ष्मी पूजनापर्यंत झेंडू विक्रीसाठी उपलब्ध होईल. त्यानंतर मात्र मिरची व भाजी लागवड करण्यात येणार आहे. पिवळा, केशरी रंगाचा झेंडू तयार झाला असून, नवरात्रोत्सवात किमान शंभर किलो विक्री अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांनी जाकादेवी येथे विक्री केंद्र सुरू करण्याचे निश्चित केले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे ३०० किलो झेंडू कुजला, मात्र त्यामुळे निराश न होता पुढील उत्पादनाकडे लक्ष केंद्रित केले आहे. खत, पाणी व योग्य व्यवस्थापनामुळे शिवरात झेंडू बहरला आहे.

शहाळ्यांना मागणीनितीन यांची दोनशे हापूस कलमे असून दीडशे नारळ लागवड आहे. आंबा मुंबई, पुणे मार्केटसह नितीन खासगी विक्री करत आहेत. नारळापेक्षा शहाळ्यांना मागणी अधिक आहे. जाग्यावरच शहाळ्यासाठी पैसे मिळत असून काढणीचा खर्च वाचतो. त्यामुळे शहाळी विक्री फायदेशीर ठरते. शिवाय नारळ स्थानिक बाजारातच संपत आहे. नितीन यांचे वडील नारायण सध्या ७५ वर्षांचे आहेत. मात्र पावसाळ्याचे दिवस वगळता एरव्ही दररोज सकाळी ६ वाजता नारळ बागेला पाणी देण्याचा नित्यक्रम बनला आहे. पाण्याबरोबर खताचे योग्य व्यवस्थापनामुळे आंबा, नारळ असो वा झेंडू, मिरचीचा दर्जा चांगला असून उत्पादनही उत्तम मिळत असल्याचे नितीन यांनी सांगितले.

टॅग्स :शेतकरीपीकफुलंशेतीकोकणरत्नागिरी