सचिन काकडेमहाबळेश्वरचं नाव जरी घेतलं तरी आपल्यासमोर उभी राहते ती तांबड्या मातीतली लाल चुटूक स्ट्रॉबेरी; परंतु याच मातीत येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीबरोबरच सफरचंदाची बाग फुलविण्याचा प्रयोगही यशस्वी केलाय. हा प्रयोग शेतकऱ्यांना संजीवनी देणारा ठरणार आहे.
तसं पाहिलं तर सफरचंद है जम्मू-काश्मीर, हिमाचल या थंड प्रदेशातील मुख्य फळ. महाबळेश्वरातही या फळाची लागवड करता येऊ शकते, असा विचार आजवर कोणीही केला. नव्हता. परंतु अलीकडच्या काही वर्षात येथील शेतकरी नवनवे प्रयोग राबवून शेती समृद्ध करू लागले आहेत. खिंगर (ता. महाबळेश्वर) येथील अनिल दुधाणे यापैकीच एक.
ते मॅकॅनिकल इंजिनीअर असून, महाबळेश्वरच्या वातावरणाचा अभ्यास करून त्यांनी या भागात सफरचंदाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षांपूर्वी त्यांनी हिमाचल प्रदेश येथून सफरचंदाच्या सोनेरी, रेड डेलिशिअस, लाल अंबरी, मॉकीटोश व हार्मोन-९९ या जातींची वीस रो आणून त्यांची शेतात लागवड केली.
कोणत्याही खतांचा वापर न करता केवळ मातीतील पोषणद्रव्यावर व ऊन, वारा, पाऊस झेलत ही झाडे तग धरून उभी राहिली. यातील हार्मोन-१९ या झाडांच्या फळांचा हंगाम सुरू झाला असून, दोन झाडे फळांनी लगडली आहेत.
ही आहेत वैशिष्ट्य..• हार्मोन-९९ जातीच्या झाडांना फळे.• झाडांची उंची १२ फूट.• रंगसंगती काश्मिरी फळांप्रमाणे.• वजन जेमतेम, चव आंबड-गोड.• खतांचा वापर न करता लागवड.• झाड ४० ते ४५ अंश तापमानातही जगू शकते.• महाबळेश्वरचे वातावरण झाडांना पोषक.
महाबळेश्वरच्या वातावरणात कोणत्या जातीचे झाड तग धरू शकते, कोणत्या झाडाला अधिक फळे येऊ शकतात, या उद्देशाने विविध जातीच्या रोपांची लागवड केली, सध्या हार्मोन-९९ या जातीच्या झाडांना फळे आली आहे. आजवर कोणत्याही खतांचा वापर केलेला नाही. उत्तराखंड येथील सफरचंदाच्या शेतीचा सखोल अभ्यास करूनच पुढे हा प्रयोग व्यापक स्वरूपात राबविला जाईल. - अनिल दुधाणे, प्रयोगशील शेतकरी, खिंगर
अधिक वाचा: वाई तालुक्यातील युवा शेतकऱ्याची कमाल; सहापट उत्पन्न देणाऱ्या पांढऱ्या स्ट्रॉबेरीने केली धमाल