बापू नवले
दौंड तालुक्यातील गलांडवाडी येथील अभिजीत विठ्ठल टूले व अजित ज्ञानदेव टूले या दोन अभियंत्यांनी शेतीत नाविन्यपूर्ण प्रयोग करून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. येथील पारंपारिक ऊस शेती न करता नवनवीन पिके घेण्यावर भर देत त्यांनी नुकतीच केळीची लागवड केली आहे.
या केळी पिकामधून भरघोस फायदा मिळवला आहे. ही केळी परदेशात दुबईला पाठवण्यात त्यांना यश आले आहे. उत्तम दर्जाचा माल मिळाल्याने या केळीने दुबईकरांना भुरळ पडली आहे. ज्ञानदेव बाबासो टूले यांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन अभियंते शेतीमध्ये विविध प्रयोग करतात.
दोन्हीही अभियंत्यांनी नोकरी न करता शेतीस प्राधान्य दिले, घरी भरपूर शेती असल्यामुळे नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न त्यांना सहज शेतीतून तयार होते. अभिजीत व अजित यांचे बीई मेकॅनिकल झाले आहे. मात्र शेती पडीक न ठेवता त्यामधून यशाचे शिखर गाठता येऊ शकते.
आतापर्यंत पारंपारिक पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने ऊस शेती केली जात होती. मात्र नवीन शेती केली पाहिजे. या दृष्टिकोनातून पहिल्यांदाच केळीची लागवड केली. केळी उत्कृष्ट पद्धतीने बहरली. भरघोस उत्पन्न मिळाले.
केळी बरोबरच त्यांनी आतापर्यंत डाळिंब, कलिंगड, खरबूज, काकडी, ढोबळी मिरची, दोडका, शेवगा यांसारखी अनेक नाविन्यपूर्ण पिके घेऊन भरघोस उत्पन्न मिळवले आहे.
योग्य मार्गदर्शनाचा झाला फायदा
काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील स्नेही दादा खरात व नागेश खरात यांचे मार्गदर्शन लाभल्याने अधिक उत्पन्न घेण्यात यशस्वी झालो असे टूले यांनी सांगितले. केडगाव येथील सतीश टुले यांनी खत व रोग प्रतिबंध करण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले.
शेणखताचा वापर
ड्रीपद्वारे पाणी दिले जात होते. पट्टा पद्धतीने केळीची लागवड केली. रोपांची निवड केली, याला पाण्याचा निचरा होणारी जमीन लागते. शेतीची मशागत करत असताना जास्त प्रमाणात शेणखत वापरावे लागते.
रोपांची लागवड केल्यापासून केळीची छोट्या बालकाप्रमाणे काळजी घ्यावी लागते. खतपाणी वेळेवर द्यावे लागते. अंग मेहनत कमी असली तरी रोगावर बारकाईने लक्ष ठेवावे लागते. तसे केल्यास केळीचे शाश्वत उत्पन्न मिळते. एक्सपोर्ट दर्जाच्या केळीला विशेष मागणी आहे. - अभिजीत टुले, उच्चशिक्षित शेतकरी, गलांडवाडी
अधिक वाचा: सोलापूरच्या अभिजीत पाटलांच्या शेतात बहरली अमेरिकेतील निळी केळी