सुरेंद्र शिराळकरआष्टा : येथील प्रगतिशील शेतकरी सुनील आनंदराव माने यांनी ऊस शेतीला फाटा देऊन फळ आणि भाजीपाला उत्पादन घेण्यास सुरुवात केली. सध्या त्यांनी तीन एकर पपई लागवडीतून १४ लाखांचे उत्पादन घेत शेतकऱ्यांच्या पुढे आदर्श निर्माण केला आहे.
शेतकऱ्यांनी एकच पीक घेण्याऐवजी बहुपीक पद्धतीने पिके घेतली पाहिजेत. सुनील माने यांचे एकत्र कुटुंब आहे. त्यांनी आपल्या तीन एकर शेतीची उभी आडवी नांगरट केली. एकरी सुमारे दहा ट्रॉली शेणखत पसरले.
पपईची तीन एकरवर लागवड केली. परांडा धाराशिव येथून दोन हजार ७०० रोपे आणली. पाच बाय नऊ फुटावर रोप लावले त्यास ठिबकने पाणी दिले. या झाडांना पाण्यात विरघळणारी विद्राव्य खते दिली.
तसेच वेळोवेळी बुरशीनाशके, कीटकनाशके फवारली. या पपईला ७ फेब्रुवारी २०२४ पासून फळे येण्यास सुरुवात झाली. आठ ते दहा दिवसांनी पपई तोडून ती मुंबई, कोलकात्ता यासह तसेच आष्टा व परिसरात स्वतःही विक्री केली.
उर्वरित फळे इस्लामपूर, शिराळा, घोगाव, पलूस येथील कारखान्यांना चेरी तयार करण्यासाठी पाठवले. सप्टेंबरअखेर तीन एकरमध्ये सरासरी ५२ ते ५३ टन पपईचे उत्पादन मिळाले. तीन एकरात १४ लाखांचे उत्पन्न मिळाले.
मागील काही दिवसात वेळोवेळी अतिपाऊस, ऊन यामुळे पपईची बाग लवकर संपल्याने अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. पण, पपईचे पिक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे, असा विश्वासही सुनील माने यांनी व्यक्त केला.
शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत आहे. देशी गाई, म्हशी, शेळ्या, कोंबड्या पालन करीत स्लरी तयार केली आहे. देशी टिश्यू कल्चर केळी ६० गुंठे, व्हीएनआर पेरु ६० गुंठे, नवीन १५ नंबर पाच एकर पपई, चार एकरमध्ये झेंडू लागण केली आहे. तसेच जी नाईन सहा एकर केळी केली आहे. शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणे गरजेचे आहे. - सुनील माने, प्रगतिशील शेतकरी