Join us

माळरान जमिनीत ५ एकरावर फुलविली केशर आंब्याची बाग , मिळाले ५५ लाखांचे उत्पादन!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 11:06 AM

माळरानातल्या पाच एकर जमिनीवर केशर आंबा लावला, महिला शेतकरी झाली लखपती, कसं केलं पाण्याचं नियोजन? वाचा..

तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी शिवारात मंगलबाई बंडू गवळी या महिला शेतकऱ्याने खडकाळ माळरान जमिनीत गाळ भरून पाच एकरावर केशर आंब्याची बाग फुलविली. यंदा हवामान फारसे पोषक नसतानाही योग्य नियोजनाच्या बळावर शेतकरी मंगलबाई बंडू गवळी यांनी आंबा बागेच्या माध्यमातून ५५ लाखांचे उत्पादन घेतले आहे.

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील माजी सरपंच मंगलबाई बंडू गवळी यांनी आठ वर्षांपूर्वी देवकुरुळी शिवरात माळरान जमीन खरेदी केली. त्या जमिनीत तलावातील गाळ भरून सुपिकता वाढविली. अन्य पिके न घेता गवळी यांनी पाच एकरात दोन हजार केशर आंब्याच्या रोपांची लागवड केली. पाण्याचे योग्य नियोजन करून रोपे वाढविली.

तीन वर्षांनंतर आंबा झाडाला फळ धारणा झाली. यंदा आंब्यांसाठी फारसे पोषक वातावरण नव्हते. यावर मात करीत महिला शेतकरी मंगलबाई गवळी यांनी चांगले संवर्धन केले. प्रति किलोचा १०० रुपये दर मिळाला असता, पाच एकरात सुमारे ५५ लाख रुपयांचे उत्पादन हाती पडले. शेती कमीच आहे. सर्व माळरान आहे. पाण्याची सोय नाही, अशी ओरड करून इतर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांपुढे त्यांनी आदर्श निर्माण केला आहे.

अगोदर शेतीकाम, नंतर घरकाम...

केशर आंबा बागेच्या अंतर्गत मशागतीचे कामे वेळेत व्हावे, यासाठी आधी मजुरांकरवी शेतीची कामे करून घेत. नंतर घरकामाकडे लक्ष दिले. कष्टाच्या बळावर पाच एकरात ५५ लाख रुपयांचे उत्पादन मिळाले. ९० ते १०० रुपये प्रति किलो दर बांधावर मिळाला. यासाठी पती बंडू गवळी, मुलगा हणमंत गवळी यांची मोठी मदत झाली.- मंगलबाई गवळी, आंबा उत्पादक, शेतकरी

पाण्याचं नियोजन 

पाच एकर आंबा बाग जोपासण्यासाठी दोन विहिरी, दोन बोअर आहेत. या पाण्याचे योग्य नियोजन करून फळबाग जोपासली. पंधरादिव- साआड फवारणी केली जाते. २० लाख रुपयांचा आंबा बाजारात विक्रीसाठी गेला आहे. आणखी २५ लाख रुपये आंबा विक्रीतून हाती पडतील, असे शेतकरी गवळी यांनी सांगितले.

टॅग्स :आंबातुळजापूरमहिलाशेतकरीपीक व्यवस्थापन