मागील काही वर्षात मराठवाड्यात हिंगोली, नांदेड आणि परभणी परिसरात हळदीचे उत्पादन घेणारे शेतकरी वाढत आहेत. त्यातही हिंगोली जिल्हा हळदीचे उत्पादन घेणारा जिल्हा म्हणून नव्याने ओळखला जातोय. मागील दहा वर्षांपासून हजारो शेतकरी या परिसरात पारंपरिक शेतीकडून हळदीकडे वळले आहेत, वळत आहेत. त्यापैकीच हळदीचे एक गाव म्हणजे पानकनेरगाव. सेनगाव तालुक्यातील या गावच्या काही महिला शेतकऱ्यांनी एकत्र येऊन हळद प्रक्रियेचा व्यवसाय सुरू केला असून त्यापासून चांगले उत्पन्नही मिळत आहेत.
प्रक्रियेला कशी झाली सुरूवात? ‘आधी आम्ही पारंपरिक पद्धतीने हळद व्यापाऱ्यांना विकायचो. पण नंतर लक्षात असं आलं की आपल्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. शिवाय त्यातून तोटाच जास्त होत आहे. म्हणून सुमारे चार वर्षांपूर्वी महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांनी हळदीवर प्रक्रिया करायचं ठरवलं आणि मग विक्रीह आम्हीच करू लागलो,’ बचत गटाचे प्रतिनिधी असलेले रामेश्वर आरे सांगत होते. पारकरनेरगावच्या या बचत गटाचे नाव आहे स्वाभिमानी स्वयंसहायता महिला बचत गट. पुरुष शेतकऱ्यांच्या जोडीने बचत गटातील महिला शेतात राबतात, हळद पिकवतात, पण त्यानंतर तयार हळदीवर प्रक्रिया करण्याचे कामही त्या करतात. तर पुरुष शेतकरी त्यांना विक्रीसाठी, ब्रँडींगसाठी मदत करतात.
सेंद्रिय पद्धतीने हळद उत्पादन आणि प्रक्रियापानकनेरगावचे हे शेतकरी सेंद्रीय पद्धतीने हळद पिकवतात. रासायनिक खतांचा वापर केला जात नाही. सर्वप्रथम शेतात लागवडीपूर्वी पुरेसे शेणखत टाकले जाते. त्यानंतर हळदीच्या बेण्यावर बीजप्रक्रिया करून त्याची लागवड केली जाते. पुढे हळदीचे उत्पादन घेतल्यानंतर त्यावर बचत गटाच्या महिला प्रक्रिया करून पावडर तयार करतात आणि मग तिची विक्री होते. मागचे तीन वर्ष हळद उत्पादक शेतकरी या पद्धतीने प्रक्रिया करून संपूर्ण हळदीचे उत्पादन स्वत:च विक्री करत आहेत.
ब्रँड आणि विक्रीरामेश्वर आरे म्हणाले की आम्ही स्वत: हळदीवर प्रक्रिया करायला लागल्यापासून आणि त्याची विक्री करायला लागल्यापासून आमचे उत्पन्न वाढले आहे. आता एक ग्रॅमही हळद आम्ही व्यापाऱ्याला देत नाही. आम्हीच प्रक्रिया करून विकतो. त्यासाठी विविध प्रकारचे प्रदर्शन, स्टॉल या माध्यमातून आम्ही वर्षभर हळद पावडर विक्री करतो. त्यातून येणाऱ्या नफ्याचे प्रमाण पूर्वी पारंपरिक विक्रीपेक्षा जास्त मिळत आहे. मुंबईला महालक्ष्मी सरस हे प्रदर्शन झाले होते, त्यातही आमच्या गटाने भाग घेतला होता. तेथे आमची चांगली विक्री झाली. ‘रानमेवा’ या नावाने आम्ही हळदीचा ब्रँड केला आहे. हिंगोलीची हळद आणि तीही सेंद्रिय म्हटल्यावर तिला एक विशिष्ट प्रकारचा सुगंध येतो. त्यामुळे एकदा हळद विकत घेतल्यानंतर ग्राहक पुन्हा पुन्हा आमच्याशी संपर्क करतो.
तुम्हीच करा शेतमाल विक्रीनाशिक येथे सध्या सुरू असलेल्या विभागीय सरस-गोदा महोत्सव प्रदर्शनात या महिलांच्या स्टॉलला शहरी ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि उमेद अभियानच्या माध्यमातून हे मिनी सरस प्रदर्शन सुरू आहे. या बचत गटांना विक्री आणि प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येते. त्याचा लाभ कृषी प्रक्रिया करून शेतमाल विकणाऱ्या शेतकरी व महिलांना होत असतो. प्रशिक्षणात माकेर्टिंग, पॅकेजिंग आणि ब्रँडींग या गोष्टीवर मार्गदर्शन करण्यात येते. त्याचा उपयोग अनेक बचतगटांना होताना दिसतो. हिंगोलीतील बचत गटही अशा प्रकारे माकेर्टिंग व प्रक्रियेमध्ये अग्रेसर असून शेतकऱ्यांनी स्वत: आपल्या शेतमालाची विक्री केली, तर शेती फायद्याची करता येईल, असा त्यांचा अनुभव सांगतो.