शाहूवाडीत उसात नाचणीचे आंतरपीकशाहूवाडी तालुक्यातील वालूर या गावी नाचणी व पौष्टिक तृणधान्य संशोधन प्रकल्प कोल्हापूर यांच्या मार्फत प्रथमच ऊस व नाचणी आंतरपीक लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा खरीप नाचणी लागवड करण्यात अग्रेसर आहे. नाचणी, वरी व इतर पौष्टिक तृणधान्य पिकांचे आहारातील महत्त्व आणि लागवडीचे महत्त्व लक्षात घेऊन या पिकांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी गतवर्षी 'आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष' म्हणून साजरे केले गेले.
या पिकांचे लागवड क्षेत्र आणि उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी भात आणि ऊस या पिकासोबत नाचणी पिकाचेदेखील शाहूवाडी तालुक्यातील वालूर या गावी लागवडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. प्रथमच ऊस व नाचणी आंतरपीक लागवड करण्याच्या हेतूने शाहूवाडी तालुक्यात 'ऊस व नाचणी आंतरपीक लागवड प्रयोग' वालूरमधील शेतकरी मिलिंद सबनीस यांच्या शेतात राबविण्यात आला. त्यासाठी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले 'फुले कासारी' या वाणाची जानेवारी महिन्यात साडेचारफूट सरीमध्ये उसासोबत लागवड करण्यात आली.
रोपवाटिकेत नाचणीची डिसेंबर महिन्यात पेरणी करून जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नाचणीची रोपे प्रत्येक वरंब्यावर तीन ओळीमध्ये मलचिंग पेपरमध्ये छिद्र पाडून लागवड केली. सद्या नाचणीची कापणी सुरू असून, या भागातील डोंगर उताराच्या लालसर जमिनीतील उसाची सरासरी उत्पादकता कमी आहे. या प्रयोगाच्या निमित्ताने उन्हाळी हंगामात पौष्टिक धान्य आणि चारा उत्पादनासाठी ऊस पिकाबरोबर एक पर्यायी पीक म्हणून भविष्यात शेतकरी बांधवांना नाचणीकडे वळता येईल.
मूळ पीक पद्धतीत बदल न करता ऊस पिकामध्ये सुरुवातीला कमी क्षेत्रावर प्रायोगिक पद्धतीने नाचणी आंतरपीक सुरू हंगामात लागवड केल्यास या पिकांची वाढ उत्तम प्रकारे होते. चांगले उत्पादन मिळू शकते. त्याचबरोबर उन्हाळी हंगामात पौष्टिक हिरवा चारा जनावरांसाठी उपलब्ध होऊ शकतो. - डॉ. योगेश बन, प्रमुख, नाचणी संशोधन प्रकल्प कोल्हापूर