गजानन पाटील
दरीबडची : जत तालुक्यातील दुष्काळी भागातील तरुण शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत नवनवे प्रयोग करत आहेत.
वळसंग (ता. जत) येथील शेतकरी सुभाष मासाळ यांनी फोंड्या माळरानावर कमी पाण्यात, कमी खर्चात मोसंबीची फळबाग फुलवली आहे.
मोसंबीचा अनोखा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. एकरी आठ टन मोसंबीचे उत्पादन घेतले असून, यातून दोन लाख वीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
जत तालुक्यात सततचा दुष्काळ व पाणीटंचाईमुळे पारंपरिक शेती केली जाते. सुभाष मासाळ हे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक होते.
पैठण तालुका मोसंबीचे आगार म्हणून ओळखला जातो. तेथील मोसंबी बागेचा त्यांनी अभ्यास केला. बागेचा देखभाल खर्च, फवारणी खर्चदेखील कमी आहे. कमी पाण्यावर घेतले जाणारे फळपीक म्हणून मोसंबीची ओळख आहे.
वर्षातून मृग, आंबा, हस्त असे तीन बहर घेता येतात. चौथ्यावर्षी बागेचे उत्पादन सुरू होते. मोसंबीत रोगप्रतिकारशक्ती जास्त असते. बागेला उष्ण हवामान पोषक आहे. निचरा होणारी जमीन लागते. फळगळती होत नाही. झाडाला डिंककीड, पानांवरील अळीचा प्रादुर्भाव होतो.
कीटकनाशकाची फवारणी केली जाते. कमी किमतीची औषधे लागतात. जमीन, हवामान यांचा विचार करून तेथील शेतकऱ्यांशी चर्चा करून मोसंबी बाग लावण्याचा निर्णय घेतला.
घरासमोरील डाळींबाची बाग रोगाने वाया गेली होती. तालुक्यात बदली झाल्यावर २०१६ मध्ये खडकाळ माळरानावर एक एकरवर न्यूसेलर वाणाच्या मोसंबीची लागवड केली. मोसंबीची रोपे संभाजीनगर येथील नर्सरीतून ५० रुपयांप्रमाणे आणली.
एकरात १६ बाय १४ फुटावर २१५ रोपांची लागवड केली. लागवडीसाठी चाळीस हजार रुपये प्राथमिक खर्च केला. बागेत भुईमूग, हरभरा, उडीद, मूग आदी आंतरपिके तीन वर्षे घेतली.
झाडांना शेणखत घातले. तीन वर्षातच बाग बहरली. योग्य नियोजनाने झाडांची जोमाने वाढ झाली. साठ टक्के झाडांना फळधारणा झाली. त्यातून पाच टन उत्पादन मिळाले.
त्यामुळे उत्पादन जादा मिळणे शक्य झाले. यासाठी मजुरी व इतर खर्च मिळून फक्त चार हजार रुपये आला. दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
सेंद्रिय पद्धतीने मोसंबी बागेची लागवड
मोसंबी फळबागेला १०० टक्के सेंद्रिय खताचा वापर केला आहे. ठिबक सिंचनद्वारे पाणी दिले जाते. जत तालुक्यात मोसंबी क्षेत्र वाढावे म्हणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. गावातील चार शेतकऱ्यांनी बागेची लागवड केली आहे. लागवडीसाठी पैठण येथील विजय वाघ, विठ्ठल पांढरे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे, अशी माहिती सुभाष मासाळ यांनी दिली.
जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोसंबीचे सौदे सुरू करावेत. शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून मोसंबीचे उत्पादन घ्यावे. व्यावसायिक तत्त्वावर मोसंबी फळबागेतील शेती करावी. - सुभाष मासाळ, शेतकरी, वळसंग
अधिक वाचा: भविष्यात कांद्याला चांगला दर पाहिजे असेल तर साठवणुकीपूर्वी व साठवणुकीत करा हे उपाय