अमोल गायकवाड
अहमदनगर : असाध्य ते साध्य करिता सायास तुका म्हणे... एखादी गोष्ट करताना कितीही अडचणी आल्या तरीही योग्य निर्णय, व्यवस्थापन, मेहनत या गोष्टींच्या जोरावर माणूस काहीही करू शकतो. याचाच प्रत्यय अहमदनगर जिल्ह्यात आला आहे. कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्याने नापीक जमिनीत कलिंगड लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. एवढंच नाही तर ही कलिंगडे पश्चिम बंगालला देखील पोहचली आहेत.
कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील शंकर निकम याने खळगट नापीक जमिनीवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पाण्याचे व औषध फवारणीचे योग्य नियोजन करून ३० गुंटेत प्रती रोप दोन रुपये साठ पैसे या प्रमाणे एकूण पाच हजार चारशे रोपांची लागवड करण्यात आली होती. कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल, याचा विचार करून या युवा शेतकऱ्याने ड्रीपचा वापर करून कलिंगडाला पाणी दिले. यातूनच आवश्यक खते सोडण्यात आली. काही औषधांची फवारणी केली. जवळपास २ महिन्यांनी हे कलिंगड तोडण्यास आले. सर्व साधारणपणे एक कलिंगड पाच ते सहा किलो वजनाचे आढळून आले. बाजारात प्रती किलो साडे बारा किलो भाव मिळाला. एकूण २३ टन कलिंगडाचे दोन लाख बहात्तर हजार रुपये मिळाले. खर्च जाता एक लाख ऐंशी हजार रुपये एवढा नफा मिळाला.
दरम्यान कलिंगड उच्च दर्जाचे असल्याने या कलिंगडास पश्चिम बंगालमधील मालदा मार्केटने मागणी केली आहे. महाराष्ट्राचे कलिंगड थेट पश्चिम बंगाल मध्ये पोहोचले आहे. या युवा शेतकऱ्यांना चांगल्या युवा शेतकऱ्याची संगत मिळाली. त्याचे गुण आत्मसात करून कलिंगडाचे उत्पन्न घेण्याचे ठरवले. या कलिंगड उत्पन्नाला कृषी अभ्यासक सतीश देशमुख वैजापूर यांचे सहकार्य लाभले. महत्वाचे म्हणजे योग्य नर्सरीची निवड करणे महत्त्वाचे असते. व योग्य कंपनीच्या रोपांची लागवड करणे महत्त्वाचे असते. तेव्हाच अधिक उत्पन्न घेणे सोयीचे होते. शंकर निकम हा युवा शेतकरी भाव मिळत नाही. पीक नीट येत नाही असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यास एक सकारात्मक उदाहरण आहे.
मागील वर्षी देखील कलिंगडाचे पिक घेतले होते, पण योग्य नर्सरी निवडली गेली नव्हती, म्हणून मला नुकसान झाले होते. यावेळेस कृषी अभ्यासक यांच्या सहकार्याने योग्य नर्सरी निवडली व कलिंगडाचे पीक घेतले. यात मला चांगला नफा मिळाला. सगळ्यांनीच एकच उत्पन्न घेतले तर भाव मिळणारच नाही, पणं आपण काही नवीन करू या आशेने हे पीक घेतले, मला इतर पिकापेक्षा जास्त नफा मिळाला.
- शंकर निकम, युवा शेतकरी उक्कडगाव