मेहरून नाकाडे
रत्नागिरी : नाट्य व्यवसायाचा पेशा असला, तरी गावाशी नाळ बांधलेली होती. शेतीची आवड असली, तरी वेळेअभावी शक्य नव्हते. मात्र, कोरोनाकाळात लॉकडाउनमुळे वेळच वेळ होता. त्यामुळे ताम्हाणे (ता. संगमेश्वर) येथील श्रीकांत शिवराम तटकरे यांनी गावाकडे प्रस्थान ठोकले.
वडिलोपार्जित जागेची मशागत केली. पीक लागवडीचा अभ्यास केला व इस्त्राइल तंत्राचा अवलंब करीत केशर आंबा लागवडीचा निर्णय घेतला, केवळ आंबा नाही, तर एक एकर क्षेत्रात त्यांनी नियोजनबद्ध काजू, चिकू, अननस, नारळ आंतरपीक लागवड केली आहे.
लागवडीला सहा वर्षे झाली असून, तिसऱ्या वर्षापासूनच उत्पन्न सुरू झाले आहे. त्यांचा आंतरलागवडीचा जिल्ह्यात एकमेव यशस्वी झालेला प्रयोग आहे.
व्यावसायिक नाटकांमुळे श्रीकांत यांचे ठिकठिकाणी दौरे, तालीम यामुळे शेतीकडे लक्ष देता येत नसे. कोरोनामुळे त्यांना शेतीची आवड जपता आली.
हवामानातील बदलामुळे आंबा पीक दिवसेंदिवस धोक्यात येत आहे, शिवाय हापूस उत्पादन एक वर्षाआड मिळते. तसेच, झाड उंच वाढली की, आंबा काढणीसाठी मनुष्यबळ मिळणेही अवघड झाले आहे. त्यामुळे इस्त्राइल पद्धतीने लागवडीचा निर्णय घेतला.
लागवडीसाठी त्यांनी केशर आंब्याची निवड केली. इस्त्राइल पद्धतीमुळे एक एकर क्षेत्रात ९०० केशर झाडे लावता आली. वेळोवेळी छाटणी केल्यामुळे झाडांची उंची मर्यादित राहते.
लागवडीनंतर तिसऱ्या वर्षापासूनच उत्पन्न सुरू झाले आहे. केशर आंब्यासोबतच त्यांनी ५० काजू, ३५ चिकू, ३५ नारळ व ५०० अननस मिळून एकूण १४०० झाडे लावली आहेत. मिश्र लागवडीचा त्यांना फायदा झाला आहे.
जनार्दन यांचे मार्गदर्शन
निव्वळ आंबा लागवड न करता आंतर पीक लागवडीतून उत्पन्न कसे मिळविता येईल, याचा अभ्यास करत असताना श्रीकांत यांना नाशिक येथील जनार्दन वाघिरे यांनी आंतर लागवड केल्याची माहिती मिळाली. त्यांनी त्यांच्या बागायतीला भेट देऊन त्यांचे मार्गदर्शनाखाली आंतरपिकांची लागवड केली. निव्वळ एका पिकावर अवलंबून न राहता, अन्य उत्पादनातून खर्च काढणे शक्य होते, हे त्यांनी सिद्ध केले आहे.
केशरसाठी मागणी
हापूस प्रमाणे केशरलाही बाजारात चांगली मागणी आहे. योग्य खत, पाणी व्यवस्थापनामुळे केशरसह अन्य झाडांची वाढत उत्तम झाली आहे. लागवडीपासून तिसऱ्या वर्षीच उत्पन्न सुरु झाले आहे. दरवर्षी तर तीन ते साडेतीन टन आंबा उत्पादन घेत आहेत. ३५० ते ४६० ग्रॅम वजनाचे त्यांच्या बागेतून मिळत आहे. केशरसह काजू, नारळ, चिकू, अननस उत्पादन सुरू आहे. दर्जा चांगला असल्यामुळे दरही चांगला मिळत आहे.
पारंपरिक पद्धतीने शेती न करता व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेती करण्याचे निश्चित केले. कोरोनामुळे वेळ मिळाला. इस्त्राइल पद्धतीने आंबा लागवडीसह मिश्र पिकांची लागवड केली. तीन वर्षे खूप मेहनत घेतली उत्पादन सुरू झाले आहे. लागवडीला सहा वर्षे झाली असून, दरवर्षी उत्तम उत्पन्न मिळते. त्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाल्याने आणखी एका रिकाम्या जागेत अशा प्रकारे आंतरलागवडीचा निर्णय घेतला आहे. नर्सरीचा परवाना घेतला असून, आंबा, चिकू, काजू, नारळ, तसेच अन्य विविध फळे, फुलांची कलमे तयार करून विक्री करत आहेत. कोरोना संपल्यानंतर नाट्य व्यवसाय पुन्हा सुरु झाला असला, तरी तो सांभाळून शेतीही उत्तम पद्धतीने करत आहे. - श्रीकांत शिवराम तटकरे, ताम्हाणे